बॉलीवूडमध्ये संजय लीला भन्साळी यांचे मोठे नाव आहे. ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. त्यांच्या चित्रपटातून जणू इतिहासच पुन्हा जिवंत होतो असे म्हणतात. पण, काल याच दिग्दर्शकाला मारहाण करण्यात आली. भन्साळींच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाचे जयपूर येथे चित्रीकरण सुरु असताना राजपूत करणी सेनेकडून सेटवर तोडफोड करण्यात आली. या घटनेविरोधात सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलीवूडकरही या विरोधात एकत्र आले आहे. आपल्या इथे अशा घटना घडत असतील, तर अशा लोकशाहीचा काय उपयोग? असा सूर बॉलीवूडने लावला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनीही संजय लीला भन्साळी यांना पाठिंबा देत लोकसत्ता ऑनलाईनकडे त्यांचे मत व्यक्त केले.

चंद्रकांत कुलकर्णी
सगळीकडेच आता प्रकरण वाढत चाललं असून आता दहशतवादाचं वातावरण निर्माण झालं आहे. कलेच्या क्षेत्रात काम करणा-या माणसाला काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही. कोणीही उठेल आणि कुठलीही माहिती न घेता काहीही करेल. म्हणजे गडकरींचा पुतळाही तोडून टाकेल, मारहाण करेल,  उद्या आक्षेप घेईल, नाटकं बंद पाडतील, असं काहीतरी विचित्र वातावरण निर्माण झालं आहे. यात शासकीय यंत्रणेचा मोठं काम आहे. त्यांनी यात सहभाग घेऊन तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. नाहीतर हा एकप्रकारचा सांस्कृतिक दहशतवादच झाला. कशावरच काही करायचं नाही. त्यांना काही संदर्भ माहित होते किंवा त्यांनी वेगळी माहिती होती का? चित्रिकरण चालू आहे असं ही नाही की चित्रपट पूर्ण झालायं आणि त्यात आक्षेपार्ह आहे किंवा त्यांच्या हातात स्क्रिप्ट लागलीय त्यात आक्षेपार्ह आहे. याला आपण गुंडशाहीच म्हणायला हवी. आमच्या मनात आलं आम्ही थांबवणार. कलाक्षेत्रातील लोकांनी याचा निषेध करायलाच हवा. पण, लोकांनीही याविरुद्ध एकजूट व्हायला हवे. तसेच, शासनाने यावर काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी.

स्वप्ना वाघमारे
जे काही घडलंय त्याला मला प्रचंड राग आला आहे. तुम्हाला स्क्रिप्ट किंवा सीन्स काय आहेत, याची माहिती आहे का? त्यांच्या बाकीच्या क्रूलाही पुढचा स्क्रिनप्ले काय आहे याची माहिती नसेल. कोणत्या अधिकाराने तुम्ही तेथे जाऊन मारहाण करताय. तुम्हाला काही पटत नसेल तर तुम्ही ते सांगा. तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. तुमच्याकडे माध्यमं आणि न्यायालय आहे. एखादा नट एखाद्या फोटोग्राफरवर हात उगारतो, तेव्हा तुम्ही जगभर बोंबा मारता. त्याला शिक्षा झाली पाहिजे. आज आमच्या एका प्रख्यात दिग्दर्शकावर हात उगारला जातोय तर त्याविरोधात कारवाई नको का करायला. यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी. मी जर एखादा विनोदी चित्रपट बनवतेय, त्यात तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही. तर तुम्ही मला सांगा, फोन करा, टीका करा किंवा माझ्यावर केस करा…. पण तुम्ही मला येऊन मारू नाही शकत. कलात्मक अभिव्यक्तिवर घाला घालणं म्हणजे तुम्ही लोकशाहीवरच आक्रमण केलं आहे.

सतीश राजवाडे
आपल्या देशात अजूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखादा दिग्दर्शक किंवा लेखक इतिहासाच्या घटनेवर किंवा महत्त्वाच्या पात्रांवर काही कलाकृती करण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा जो पर्यंत त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अशा घटना घडणं डिस्टर्बिंग आहे. मला जर ती कलाकृती बनल्यानंतर काही आक्षेप किंवा शंका असतील आणि तुमच्या लक्षात येतं की हे बरोबर किंवा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलं आहे. तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं किंवा व्यक्त होण बरोबर आहे. तसेच, आपल्याकडे एक सेन्सॉर बोर्ड आहे. जो बरोबर आणि चूक हे निर्णय व्यवस्थित घेऊ शकतो. त्याच्या आधीच आपण कायदा हातात घेऊन अशा गोष्टी करणार असू तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्यासारखं होतं. मला असं वाटतं की, खरोखर त्या चित्रपटामध्ये आक्षेपार्ह आहे का, हे संपूर्ण चित्रपट झाल्यानंतर, बघितल्यानंतर अशा रिअॅक्शन आल्या असत्या तर समजू शकलो असतो की काही घटकांना ते पटत नाही. जे अगदीच असू शकतं. कारण इतिहास म्हटल्यानंतर काही व्यक्तिंबद्दल लोकांचे काही विचार असू शकतात. त्यामुळे चित्रपट बनल्यानतंर त्यांच्या प्रतिक्रिया येणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. पण चित्रपट पूर्ण होण्याआधीच शूटींग सुरु असताना असं काही केलं तर प्रत्येक गोष्टीवर संशय येऊ लागतो. नक्की आम्हाला काही स्वांतत्र्य आहे का? आपल्याकडे एक सेन्सॉर बॉडी असताना लोक जर न्यायव्यवस्था हातात घेणार असतील तर ते चुकीचं आहे.

गजेंद्र अहिरे
आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असताना अशा संघटनांचे सेन्सॉर बोर्ड कशाला हवयं आपल्याला. दुसरं म्हणजे इतिहासाचं काय केलंय हे तुम्हाला चित्रपट पाहिल्याशिवाय कसे कळेल. तुम्ही आधीच अशा प्रकारे व्यक्त कसे होऊ शकता. मारहाण करणे हा काही यावरील मार्ग नाही. तुम्ही संजय लीला भन्साळींना फोन करू शकता, त्यांच्याशी चर्चा करु शकता. आणि एखाद्या राजकीय संघटनेला चित्रपटाची स्क्रिप्टच का दाखवावी? हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. ही लोकं आहेत तरी कोण? कुठलीही संघटना येते आणि तोडफोड, मारहाण करते याला काय अर्थ आहे. या सर्व गोष्टींना माझा पूर्णपणे निषेध आहे.

शब्दांकन- चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com