News Flash

आली नाटय़घटिका समीप

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नाटकाने चांगलीच पकड घेतली आणि करोनाकाळाला सामोरे जावे लागले.

नीलेश अडसूळ

गेले नऊ महिने नाटकाला लागलेले टाळे कधी उघडणार यावर चर्चा, कलाकारांच्या अडचणी, निर्मात्यांची अवस्था, रंगमंच कामगारांचे प्रश्न, पैशाअडक्यांचे घोळ अशा नकारात्मक बातम्या वारंवार कानावर पडत होत्या. यातून कलाकार आणि रसिक यांना होणारा त्रास थोडय़ाफार फरकाने सारखाच होता, कारण हृदयाच्या तळाशी असलेले नाटक नावाचे समीकरण बंद पडले होते. अंधाराने व्यापून टाकलेल्या या रंगमंचावर स्पॉटलाइटमधून येणारा तो प्रकाश आणि त्या प्रकाशाखाली नवा जन्म घेणारा कलाकार कधी एकदा अनुभवता येईल, याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते, आणि अखेर ती घटिका आली.. नाटय़घटिका..

व्यासायिक रंगभूमीचा पडदा उघडणार अशा बातम्या झळकल्या आणि आतुरलेल्या प्रेक्षकांनी अक्षरश: दोन तास आधीपासून रांगा लावून तिकिट खरेदी केले. अगदी एकाएका प्रेक्षकाने गठ्ठय़ाने तिकिटे घेतली. यावरून एक गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे जे कलाकार-निर्माते, प्रेक्षक येतील का, ते घाबरलेले आहेत, आमचे नुकसान होईल अशा प्रकारच्या चर्चा करत होते, त्या फोल ठरल्या. त्यांना प्रेक्षकांच्या कृतीतूनच उत्तर मिळाले आहे. आता नाटकाचा पडदा उघडणार असला तरी तो नेमका कुणामुळे उघडला याचा श्रेयवाद अजून काही मिटलेला नाही. मध्यंतरीच्या काळात एका घरात पडलेल्या दोन भिंती आणि एका भिंतीला असलेली अनेक दारे आपापल्या वर्तुळात ही आमचीच कामगिरी असल्याची बतावणी करत आहेत. हा भार नेमका कुणी हलका केला माहीत नाही, पण रसिकांसाठी सांगायचे तर हा भार सर्व रंगकर्मीनी मिळून हलका केला असे म्हणणेच अधिक न्याय्य ठरेल. त्यामुळे कशाने का होईना, रंगभूमी पुन्हा सुरू होत आहे ही एकच आनंदवार्ता पुरे आहे. याच आनंदवार्तेने कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार सर्वजण उत्साहाने कामाला लागले आहेत..

शेवट गोड..

२०२०चा सुरुवातीचा काळ बरा गेला. मार्चमध्ये खीळ बसली. पुढे सबंध वर्षच धुळीला मिळाले, पण जाताजाता मात्र या वर्षांचा शेवट गोड होतो आहे. ११ डिसेंबरला ‘संत तुकाराम’ या व्यावसायिक नाटकाने मराठी रंगभूमीचा पडदा उघडला गेला. १२ डिसेंबरला प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने पुण्यात हजेरी लावली तर संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई यांच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाने कल्याणमध्ये पडदा उघडला. पुढच्या आठवडय़ात १९, २० डिसेंबरला भरत जाधव यांचे ‘सही रे सही’, सागर कारंडे यांचे ‘इशारो इशारो मे’  तर २५, २६ आणि २७ डिसेंबरला मंगेश कदम आणि लीना भागवत यांचे ‘आमने सामने’ येऊ घातले आहे. आता असा शेवट गोड असेल तर सुरुवातही गोडच होणार. त्यामुळे जानेवारी महिन्यात भरघोस नाटकांची मेजवानी प्रेक्षकांपुढे सजणार आहे. ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘व्हॅक्यूम क्लीनर’, ‘ााचं करायचं काय’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘तिसरे बादशाह हम’, ‘ती’ आणि अशा अनेक नाटकांची नावे समोर येत आहेत.

गेल्या वर्षी याच हंगामात ‘आमने सामने’ हे नाटक रंगभूमीवर आले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नाटकाने चांगलीच पकड घेतली आणि करोनाकाळाला सामोरे जावे लागले. गेल्या नऊ महिन्यांचा काळ अत्यंत भावनिक आणि चिंताजनक होता, पण आता मात्र भीतीऐवजी ठामपणा वाटतो आहे. प्रेक्षक नाटकाला येतील याचा विश्वास वाटतो आहे. तालमींना उभे राहिलो की मागच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. करोनाच्या काळात समाजातील विविध घटकांना मदत मिळाली पण कलाकारांनी मात्र कोणत्याही मदतीची अपेक्षा केली नाही. आज प्रेक्षकांनी नाटकांना उदंड प्रतिसाद देण्याची गरज आहे. कदाचित तीच आम्हा कलाकारांची खरी मदत होऊ शकेल.

– लीना भागवत, अभिनेत्री, आमने-सामने

सर्व रसिक आणि कलाकारांमध्ये नाटक सुरू झाल्याने उत्साह आहे, हे अंत्यत आशादायी चित्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडायला हवी. ते एकदा चपखल जमले तर नाटक पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही. आता गर्दी करून चालणार नाही. प्रेक्षकांनीही प्रयोगाच्या अर्धा तास आधी लवकर यायला हवे जेणेकरून तापमान तपासणी आणि अन्य प्रक्रिया सुरळीत होतील. आनंदाची बाब म्हणजे माझे तीनही प्रयोग हाउसफुल्ल आहेत. असे असले तरी पहिल्या प्रयोगाला वाटणारी धडधड आजही जाणवते आहे. विशेष म्हणजे समोर पन्नास टक्केच प्रेक्षक असणार आहेत, त्यामुळे येणारी दाद, विनोदावरचे प्रतिसाद सर्व काही नव्याने उमगणार आहे. त्यानुसार आमच्या प्रतिक्रिया, संवाद ठरतील. म्हणूनच हा आमच्यासाठी ‘प्रयोग’ असणार आहे.   

– प्रशांत दामले, अभिनेते – एका लग्नाची पुढची गोष्ट

११ तारखेला ‘संत तुकाराम’ या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीची तिसरी घंटा वाजली आणि पुन्हा रंगभूमीवर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. आता एकामागोमाग एक प्रयोग येत राहतील. विशेष म्हणजे जानेवारीत प्रेक्षकांना नवनवीन प्रयोग अनुभवता येतील. यात मला नाटय़गृह व्यवस्थापनाचे विशेष कौतुक करावेसे वाटते. कारण लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी ते सुरक्षिततेची उत्तम व्यवस्था करत आहेत. बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाने उभारलेली यंत्रणा तर पाहण्यासारखी आहे. सध्या प्रत्येक नाटकाचा जोर रविवारवर असेल, कारण अजूनही प्रेक्षक प्रतिसादाचा पुरेसा अंदाज आपल्याला मिळाला नाही. तो मिळाला की प्रयोग सुरळीत होतील. त्यामुळे या प्रवासात प्रेक्षक प्रतिसाद निर्णायक ठरणार आहे.  

– गोटय़ा सावंत, निर्मिती सूत्रधार

ज्या दिवसापासून नाटक सुरू होतेय याची खबर आली, त्या दिवशी आम्ही गाव सोडून मुंबईत आलो. नऊ महिने हाताला काम नसल्याने गावची वाट पकडावी लागली होती. परंतु आता सर्व कामगारांसहित आम्ही पुन्हा कामाला लागलो आहोत. सर्व सेट गोदामातून बाहेर काढले. त्यांची डागडुजी, रंगरंगोटी करून ते पूर्ववत केले. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा तर संपूर्ण सेट नवीन घडवण्यात आला. आज सेट लावताना-काढताना आमच्या मनात पूर्वीपेक्षा जास्त उत्साह अंगात संचारल्याचे जाणवते, कारण आमचे नाटक पुन्हा सुरू झाले.  

– सुरेश सावंत, नेपथ्यकार

नाटक सुरू होतेय हे कळताच आम्ही तयारीला लागलो. गेला महिनाभर साफसफाईचे काम सुरू आहे. केवळ झाडलोटच नाही तर कोपरा न् कोपरा धुऊन काढण्यात आला. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठेही कमतरता भासणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. बालगंधर्वमध्ये प्रयोग झाला. त्या वेळी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हीही सुखावलो. नऊ महिन्यांनी माणसांची झालेली दाटी पाहून नाटय़गृह आणि आवार सणासुदीच्या दिवसासारखा वाटतो आहे.   

सुनील मते, व्यवस्थापक, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, कोथरूड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2020 3:11 am

Web Title: marathi drama get good response from theatre lovers zws 70
Next Stories
1 ‘लेट्सफ्लिक्स’ : मराठी मनोरंजनाचा नवीन फलाट
2 चित्ररंजन : ‘चंचल’ भूत
3 ‘करोनाकाळात नायिका किल्ला लढवतायेत’
Just Now!
X