‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे आयोजन
मराठी रंगभूमी आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून दिवंगत विनय आपटे यांनी आपला स्वत:चा वेगळा ठसा उमटवला होता. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा विविध पैलूंचे दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेक्षकांना घडले होते. ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे येत्या १७ जून रोजी ‘जनक’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
‘रायटर्स ब्लॉक’ या संस्थेतर्फे लेखकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेतून ‘जनक’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. ‘रेज थिएटर’ आणि ‘रॉयल कोर्ट’, लंडन यांनी घेतलेल्या नाटय़लेखन कार्यशाळेत या नाटकाचे लेखन झाले आहे. भारतातून सुमारे ३५० नाटककारांमधून १७ जणांची या कार्यशाळेसाठी निवड झाली होती. या घेण्यात आलेल्या नाटय़ लेखन कार्यशाळेतून सात नाटके सादर झाली. या नाटकांचा महोत्सव नुकताच जुहू येथील ‘पृथ्वी थिएटर्स’ येथे पार पडला.
महोत्सवात मराठीसह हिंदी, इंग्रजी, बिहारी, हरयाणवी, तामिळ या भाषेतील नाटके सादर झाली होती. या कार्यशाळेत सादर झालेल्या शार्दूल सराफ लिखित आणि दिग्दर्शित ‘जनक’ या नाटकाचा प्रयोग १७ जून रोजी रात्री आठ वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे.
अनिल रसाळ, अनिता दाते, आरती मोरे, आनंद पाटील, अंकुश काणे आदी कलाकार या नाटकात आहेत. नाटकाचा कालावधी एक तास चाळीस मिनिटे इतका आहे. ‘जनक’ ही एका मध्यमवर्गीय कुटुंबात घडणारी गोष्ट आहे. एके दिवशी या कुटुंबात ६५ लाख रुपये इतके विजेचे देयक येते. हे देयक भरायचे की नाही, या अन्यायाला कसे तोंड द्यायचे, यातून हे नाटक पुढे जाते.