रवींद्र पाथरे

मराठी रंगभूमी ही गेली पावणेदोनशे वर्षे वैभवशाली आणि प्रागतिक रंगभूमी म्हणून भारतभरात ख्यातनाम आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती सतत काळाबरोबर राहिली, हे तर आहेच, परंतु त्याचबरोबर सभोवताली घडणाऱ्या घटना-घडामोडींची तात्काळ दखल घेण्याचं भान आणि त्याचं दर्शन घडवण्याचं, तसंच त्यावर स्वच्छ, सुस्पष्ट भाष्य करण्याचं धाडस आणि प्रगल्भताही तिने कायम दाखवलेली आहे. भोवती घडणाऱ्या घटना-प्रसंगांना तिने प्रतिसाद दिला नाही असं सहसा कधी घडलं नाही. प्रत्येक वेळी अगदी नाटकांतूनच जरी नाही, तरी एकांकिकांमधून, दीर्घाकांतून माणसाच्या जगण्याशी संबंधित समकालीन विषय इथले रंगकर्मी अत्यंत सशक्ततेनं मांडताना दिसतात. त्यात ते कुणाचीही भीडभाड ठेवताना दिसत नाहीत. म्हणूनच मराठी रंगभूमी नित्यनूतन आणि प्रवाही राहिली आहे. भवताल कवेत घेण्याचं सामथ्र्य तिच्यात ठासून भरलेलं आहे. म्हणूनच गेले जवळजवळ वर्षभर जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महासंकटावर ती कशी व्यक्त होईल, हे पाहण्याची उत्सुकता मनात दाटून आलेली आहे.

आजवर जगभरात अनेक निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटं कोसळलेली असली तरी त्यांची व्याप्ती जगाच्या विशिष्ट भूभागांतच बऱ्याचदा सीमित राहिलेली आहे. अगदी दोन भयंकर महायुद्धांनीही जगाला मोठाच तडाखा दिलेला असला तरी त्यांचीही झळ काही देशांपर्यंत पोहोचली नव्हती. साथींचेही तेच म्हणता येईल. भारतीयांना -त्यातही महाराष्ट्रीयांना आठवणाऱ्या १९व्या शतकाच्या अखेरच्या पर्वातील प्लेगच्या साथीने काही विशिष्ट प्रांतांना महाभयंकर तडाखा दिला होता. ‘प्रलय’ नामक पृथ्वीवर जे काही उत्पात घडल्याचे भूगर्भशास्त्रीय इतिहास सांगतो त्या वेळी मानव जन्मालाच आलेला नसल्याने त्याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो (ज्याचं दर्शन चित्रपटांतून आपण घेतलेलं असलं तरी तेही कल्पनेवर आधारित आहेत.). तर ते असो. करोना महासंकटाचं तसं नाहीए. या साथीने जगभरात कुणालाच सोडलेलं नाही. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, नेते-सामान्यजन, देश, खंड अशा कुणाचीच करोनाने तमा बाळगली नाही. आजवर उदात्त, उन्नत, आदर्श मानवी मूल्यांचे जे गोडवे आपण गात होतो, त्या मूल्यांचं फोलपण करोनामुळे आज आपण अनुभवतो आहोत. माणूस आज कमालीचा स्वार्थी, संकुचित, व्यक्तिवादी, आपमतलबी झालेला असला तरी किमान सकृद्दर्शनी तरी तो आपल्या कौटुंबिक नात्यांतलं पावित्र्य, त्यातली आत्मीयता, प्रेम, नि:स्वार्थ वृत्ती, निरपेक्षता वगैरे गोष्टी जगाला दाखविण्याकरता का असेना किंवा मनापासूनही असेल; पण अंगी वागवत होता. मात्र करोनाने या नात्यांनाही सुरुंग लावला. घरातल्या एखाद्याला करोना झाला की त्याच्यापासून घरचेच तुटताना दिसले. एकमेकांना टाळणं (अगदी नाइलाजानं असेल, तरीही) अपरिहार्य बनलं. करोनाने घरातलं कुणी गेलं तर त्याला अंतिम निरोप देणंही दुरापास्त झालं. शासकीय यंत्रणा ते काम करू लागल्या. सांत्वनासाठी कुणी अशा घरी जाऊ शकू नये, इतकी माणुसकी या साथीने मारून टाकली. हे सारंच भीषण आहे. करोनाशी लढणाऱ्या आरोग्यसेवकांना स्वत:च्याच घरी येऊ न देण्यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्या माणसांतून त्याचं सैतानी रूप दिसून आलं. स्थलांतरितांचं रेल्वे रुळावर क्षणभर विश्रांती घेणं त्यांच्यासाठी जीवघेणं ठरलं; मात्र याबद्दलचा दोष त्यांच्याच माथी मारून आपल्यातल्या मेलेल्या माणुसकीचं हिडीस दर्शन माणसानं घडवलं. या लक्षावधी स्थलांतरितांची, त्यांच्या अकाली मृत्यूंची नोंदही सरकारदरबारी नसणं, याहून सरकारच्या पशुत्वाचं वेगळं परिमाण काय असू शकतं? माणसाचं माणूसपण काढून घेऊन त्याला पुरता हतबल करणारा हा आजार एक नागवं सत्य सांगून गेला : कुणीही कुणाचं नसतं!

तथापि याच भीषण काळात काही ठिकाणी मुस्लीम बांधवांनी करोनाने मृत्यू झालेल्या हिंदू बांधवांवर अंत्यसंस्कार करण्याची ‘माणुसकी’ दाखवली. करोनाच्या जीवघेण्या सावटात डॉक्टर, आरोग्यसेवक, स्वच्छताकर्मी, पोलीस, बेस्ट कर्मचारी यांनी आपले जीव धोक्यात घालून करोनाग्रस्तांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. अनेकांनी स्थलांतरितांच्या, फूटपाथवर राहणाऱ्यांच्या पोटात चार घास जावेत म्हणून त्यांना रस्तोरस्ती अशांचा शोध घेऊन, वाडय़ा-वस्त्यांमध्ये जाऊन त्यांना या काळात तगवलं. जगवलं. अशा माणुसकीच्या काही कथाही या संकटकाळातच प्रत्ययाला आल्या.

त्याउलट, करोनातही राजकारण करणाऱ्या मुर्दाड राजकारण्यांचे भीषण चेहरेही या महामारीत आपल्यासमोर आले. करोनाच्या कहरात बिहारी जनता होरपळत असताना दुर्गम गावांतून झाडावर टीव्ही टांगून त्याद्वारे गरीब, वंचित, शोषितांना ‘आम्हालाच मतं द्या’ म्हणून ‘डिजिटल’ भीक मागणाऱ्या राजकारण्यांची बेशरमी किती टोकाला गेलेली आहे हेही दिसून आलं.

जग ठप्प झालेलं आजवर कुणीच अनुभवलेलं नव्हतं. परंतु करोनाने ते करून दाखवलं. विमानं, रेल्वे, रस्ते, जलमार्ग रोखून समस्त पृथ्वीवासीयांना आपल्या घरांतच कोंडण्याची किमया करोनाच करू जाणे. या घरकोंडीने माणसांचे खरे ‘चेहरे’ कधी नव्हे ते परस्परांना कळले. नातीगोती, त्यांतले ताणेबाणे, नात्यांतली क्षीण वीण अशा अनेक गोष्टी उघडय़ा पडल्या.

जगाचे सगळे व्यवहार थांबविण्याची पाशवी करामत करोनाने करून दाखवली. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, मानसिक, भावनिक अशा सगळ्यांचीच धूळधाण करून माणसाला स्वच्छ आरसा दाखवण्याचं काम करोनाने केलं. पर्यावरणविनाश, जागतिक तापमानवाढ वगैरेंवर कितीही शिखर परिषदा झडल्या तरी जे आजपर्यंत साध्य झालं नव्हतं ते करोनाने साध्य केलं. याच काळात निसर्गाचं निवळशंख स्वरूप काही क्षणांसाठी का होईना, माणसाला पाहता, अनुभवता आलं. विकृत विकासाची ओढ लागलेल्या माणसाला त्यातलं वैय्यथ्र्य करोनाने दाखवून दिलं.

असं बरंच बरंच काही घडलं.. अद्यापि घडतंय.. घडत राहील.

या साऱ्याची दखल मराठी रंगभूमी घेईल का? घेतली तर ती कशी असेल? त्यात या जगड्व्याळ करोनाची अगणित रूपं, बिंबं-प्रतिबिंबं नेमकेपणानं उमटतील का? त्यांचं कलात्मक रूप कसं असेल? ..अशा असंख्य प्रश्नांची ‘अखंड वीणा अजुनि करते दिडदा दिडदा..’

की असं काहीच घडणार नाही? ‘नर्मदेतल्या गोटय़ां’प्रमाणे आपणसुद्धा जराही बदललेलो नसू? नकोशा वाटणाऱ्या या भूतकाळावर चक्क पडदा टाकून आपण प्रवाहपतितांसारखंच पूर्वीचंच आयुष्य जगत राहू?

संवेदनाहीन!

काय असेल चित्र मराठी रंगभूमीवरचं?