एकदा एखादी गोष्ट क्लिक् झाली की तिच्या झेरॉक्स प्रती काढायचं, हा फंडा नाटक-सिनेमावाल्यांच्या बाबतीत नेहमीच अनुभवास येतो. ‘चला, हवा येऊ द्या’मध्ये सागर कारंडे साडीत हिट् झाले म्हणताना त्यांना सतत साडीत गुंडाळायची टुमच आता निघालीय. ते पुन्हा नाटकाकडे वळले तरी साडीने त्यांचा पाठलाग सोडलेला नाही. श्रीचिंतामणी निर्मित ‘सैरावैरा’ या नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या नव्या नाटकातही त्यांना लोचामावशीच्या रूपात पुन्हा साडीत पेश करण्यात आलेलं आहे. त्यांचं हे उठवळ रूप त्रासदायी आहे. तशात नटाला एकदा का प्रेक्षकानुनयी अभिनय करण्याची सवय लागली की मग बघायलाच नको. सागर कारंडे हे एक उत्तम अभिनेते आहेत. त्यांनी असं वाहवत जाणं त्यांच्या करीअरच्या दृष्टीनं हानीकारक ठरू शकेल. (याबाबतीत वैभव मांगले वेळीच सावध झाले. आपल्यावर विनोदी नटाचा शिक्का बसतोय, हे ध्यानी येताक्षणी त्यांनी ‘वाडा चिरेबंदी’मधील गंभीर भूमिका स्वीकारून आपण केवळ विनोदी(च) नट नाही, तर एक चतुरस्र अभिनेते आहोत, हे त्यांनी जाणीवपूर्वक रसिकांच्या ध्यानी आणून दिलं.) तर ते असो. हे काहीसं विषयांतर झालं. तरी मुद्दा विनोदी नाटकांचाही आहेच. टीव्हीवरील कॉमेडी शोज्च्या प्रभावात नाटकांनी वाहवत जाणं कितपत योग्य? मराठी रंगभूमीला तर पावणेदोनशे वर्षांचा प्रागतिक इतिहास आहे. आज देशातील एकमेव आधुनिक रंगभूमी म्हणून तिच्याकडे आदरानं पाहिलं जातं. अशा रंगभूमीनं टीव्हीवरील सवंग मालिकांच्या प्रभावाखाली येण्यानं तिचा दर्जा खालावला तर नवल नाही. ‘सैरावैरा’ किंवा तत्सम नाटकं हे याचं उदाहरण आहे.
खरं तर लेखक ऋषिकेश परांजपे यांनी यापूर्वी ‘गंमतजंमत’, ‘हलकंफुलकं’सारखी चांगली करमणूकप्रधान नाटकं लिहिलेली आहेत. शब्दांशी, घटना-प्रसंगांशी खेळण्याचा नाद आणि त्यावरील त्यांची हुकुमत त्यांतून दिसून येते. त्याच पठडीतलं हेही नाटक आहे, परंतु या नाटकाची बांधणी काहीशी विसविशीत झाली आहे. याचं कारण- त्याचं बेतीव, क्षीण कथानक. मोहित नावाच्या एका पस्तिशीच्या तरुणाचं त्याच्या मनाविरुद्ध लग्न जमवण्याचा चाललेला खटाटोप, अशा लग्नाला असलेला त्याचा विरोध, त्यातून त्याला लग्नाला राजी करण्यासाठी त्याचे (आडनावाशी साधम्र्य असलेले) वडील- जनार्दन जमदग्नी आणि जिच्या घरात मोहित पेइंग गेस्ट म्हणून गौतमसह (मित्र) राहतो, त्या लोचामावशीने केलेले नाना उपद्व्याप म्हणजे ‘सैरावैरा’ हे नाटक होय. या कथानकावरूनच त्यात काय काय घडू शकतं याची साधारण कल्पना यावी. निरनिराळी सोंगं घेऊन लोचामावशी मोहितला राजी करू पाहते आणि तिला काटशह देण्याच्या नादात मोहित आणि गौतम हे दोघे कसे तिच्या सापळ्यात अडकत जातात, हे ‘सैरावैरा’त दाखवलेलं आहे. लेखक ऋषिकेश परांजपे यांनी अनेक पात्रांचं हे ‘घोळ’दार नाटक रचलं आहे. चित्रविचित्र स्वभावविभावांची पात्रं हे त्यांच्या नाटकांचं एकूणात वैशिष्टय़. यातही ते आहेच. त्यामुळे अंत्यसंस्कारांचं सामान विकणारा पेटवे, पिठाची गिरणी चालवणारा पितांबर ठकसेन, सदान्कदा शिकारीची बंदूक घेऊन फिरणारा माथेफिरू फॉरेस्ट ऑफिसर नंगा तथा नंदकिशोर गाढवे, त्याची तितकीच चमत्कारिक लेक- गोल्डी, मिचमिच्या डोळ्यांची मोहिनी, मोहितचे शीघ्रसंतापी वडील जनार्दन जमदग्नी, उच्छृंखल घरमालकीण लोचामावशी, धांदरट गौतम.. आणि या सर्वानी घातलेल्या नाना घोळांतून बाहेर पडू पाहणारा (परंतु उलट त्यांत जास्तच खोल रुतत चाललेला) मोहित अशा एकापेक्षा एक अर्कचित्रांची मोट लेखक ऋषिकेश परांजपे यांनी यात बांधलेली आहे. त्यांच्या परस्परविरोधी हितसंबंधांतून हे नाटक आकाराला येतं. शब्दांशी आणि चमत्कारिक व्यक्तिमत्त्वांशी सतत खेळत राहण्याचा लेखकाचा नाद ‘सैरावैरा’मध्ये प्रकर्षांनं प्रत्ययाला येतो. त्यातूनच त्यांची पात्रं जन्माला येतात. एक वेगळी भाषा यानिमित्तानं ते नाटकात आणू बघतात. परंतु हा अट्टहास गंमत म्हणून काही एका मर्यादेपर्यंत सुसह्य़ असला तरी त्यानंतर मात्र तो डोकं पिकवतो. दिग्दर्शक गणेश पंडित यांनी या संहितेवर काम करणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनासुद्धा भाषा आणि पात्रं-चमत्कृतीची भूल पडली असावी. शिवाय निर्मात्याची व्यावसायिक गणितंही यात असावीत. त्यामुळे नाटाकत काही प्रसंग उत्तम जमले असले तरी पूर्ण नाटकाचा म्हणून जो एक परिणाम अपेक्षित असतो, तो ‘सैरावैरा’मध्ये होत नाही. ‘व्हरायटी एन्टरटेन्मेंट’ एवढय़ापुरतंच ते सीमित राहतं. काही पात्रं चांगली आकारली आहेत, तर काहींत मात्र ‘सोस’ जास्त जाणवतो. येनकेन प्रकारेण प्रेक्षकांना हसवायचंच असं ठरवून प्रसंगांची हाताळणी केलेली आढळते. कधी ती यशस्वी झालीय, तर कधी फसलीय.
सागर कारंडे हे लोचामावशी आणि श्रीयुत पेटवे या दोन रूपांत डोक्यात जातात. तथापि त्यांचा जनार्दन जमदग्नी मात्र फर्मास! या तिहेरी रूपांमध्ये त्यांनी संवादोच्चाराच्या शैलींचं वेगळेपण छान दाखवलंय. रमेश वाणी यांनी सरळमार्गी मोहित, गावंढा, इरसाल गिरणीवाला पितांबर ठकसेन आणि माथेफिरू फॉरेस्ट ऑफिसर नंगा या तीन भूमिकांचे वेगवेगळे सूर नेमकेपणानं पकडले आहेत. वैभव सातपुते (गौतम) आणि दीपाली जाधव (गोल्डी, मोहिनी आणि कोयल पोपटकर) यांनी त्यांना चांगली साथ केली आहे. बाकी तांत्रिक अंगं ठीकठाक.