इंदूर ‘मुक्त संवाद’ संस्थेद्वारे देवपुत्र मासिकाच्या सहकार्याने इंदूर येथे आयोजित बालनाटय़ महोत्सवात तिसऱ्या दिवशी लागोपाठ १६ बालनाटय़ एकांकिकांचे विक्रमी सादरीकरण करण्यात आले. बालनाटय़ महोत्सवाच्या आयोजनाचे हे पाचवे वर्ष. मराठी व िहदी भाषेत होणाऱ्या या महोत्सवाची अनेक वैशिष्टय़े आहेत. या महोत्सवात कुठलीही स्पर्धा नसते. ५ ते १५ वष्रे वयोगटातील कुणालाही या महोत्सवात मोफत प्रवेश असतो. सर्व कलाकारांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू दिल्या जातात. संहितेपासून तर दिग्दर्शनापर्यंत सर्वतोपरी सहाय्य करण्यात येते. मोठे रंगमंच व उत्तम ध्वनीव्यवस्थेसह रंगभूषा, भोजन, नाश्ता व सर्व व्यवस्था निशुल्क असतात. या वर्षी दिग्दर्शकांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. पुण्याचे प्रसिद्ध लेखक व निर्देशक प्रकाश पारखी यांनी ४२ सहभागींना मुलांना नाटक कसे शिकवावे? याचे प्रशिक्षण दिले.
तीन दिवसीय बाल नाटय़महोत्सवाचा शुभारंभ इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी केला. अध्यक्षस्थानी होते भाजप प्रदेश प्रवक्ता गोिवद मालू. या प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी संतश्री आण्णा महाराज उपस्थित होते. अतिथींचे स्वागत प्रशांत बडवे, विकास दवे व अनिल दामले यांनी केले. संस्था परिचय सचिव मदन बोबडे यांनी दिला. स्मृतिचिन्ह आनंद झारे, संजय मुळे व चित्रा खिरवडकर यांनी दिले. संचालन समीर पानसे यांनी केले. सर्व पाहुण्यांनी आयोजनाचे कौतुक केले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. उद्घाटनानंतर सहा एकांकिका सादर करण्यात आल्या. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे होते इंदूर नगरपालिका निगमचे सभापती अजयसिंह नारुका व बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर राजेंद्र श्रीवास्तव. त्यांचे स्वागत केले स्मिता सराफ, रुपाली जोशी व भावना सालकाडे यांनी. दुसऱ्या दिवशी १३ एकांकिका सादर करण्यात आल्या. मराठी समाज इंदूरचे सचिव चंद्रकांत पराडकर यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर लागोपाठ १२ एकांकिका सादर करण्यात आल्या. सन्मान व समापन समारोहाचे अध्यक्ष होते कृष्णकुमार अस्थाना. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे टी.व्ही. कलाकार मंदार चांदवडकर (आत्माराम तुकाराम भिडे-तारक मेहता का उल्टा चष्मा फेम) यांना आमंत्रित करण्यात आले होते. चांदवडकर यांना भेटण्यासाठी बालगोपाल व तरुण-तरुणींची गर्दी उसळली होती. चांदवडकर यांनी सांगितले की, मीसुद्धा बालरंगभूमीच्या माध्यमातूनच या क्षेत्रात आलो आहे. त्यांनी बालकलाकारांना अभ्यासाबरोबरच नाटक पण करा, असा सल्ला दिला. या प्रसंगी ज्येष्ठ कलावंत राजन देशमुख व डॉ. संजय जैन यांचा त्यांच्या प्रदीर्घ नाटय़सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मत्रेयी महाजनने केले. संस्था परिचय संयोजक तृप्ती महाजन यांनी करून दिला. पाहुण्यांचे स्वागत सुनील धर्माधिकारी, प्रकाश पानसे व प्रकाश अग्निहोत्री यांनी केले. आभार प्रदर्शन मोहन रेडगांवकर यांनी केले. त्यानंतर चार एकांकिका सादर करून या सोहळ्याचे समापन झाले.
माई मंगेशकर सभागृह इंदूर येथे आयोजित या स्मरणीय सोहळ्यात एकूण ३५ एकांकिका सादर करण्यात आल्या. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या संरक्षणाखाली गठित आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी तीन महिने अथक परिश्रम करून हा सोहळा सफल केला. या तीन दिवसांत व्यवस्था चोख राखली तरुण मंचच्या तरुण कार्यकर्त्यांनी. प्रेक्षकांना व बालकलाकारांना हा सोहळा दीर्घकाळ स्मरणीय राहील.
– रेखा गणेश दिघे
rekhagdighe@gmail.com