|| रेश्मा राईकवार

सध्या मराठी घराघरांतून एक विचित्र युद्धसदृश परिस्थिती रिमोट कंट्रोल नामक यंत्राच्या ताब्यावरून सुरू असते. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे प्राइम टाइमच्या पहिल्या ठोक्याला मालिकेच्या शीर्षकगीताची सुरुवात होते तिथपासून ते अगदी रात्री साडेदहा वाजले तरी रोजच्या पाहायच्या मालिकांचा अंक संपत नाही. हल्ली तर संध्याकाळी एक वाहिनी, मग त्या वेळी दुसऱ्या वाहिनीवरील ज्या मालिका हुकतायेत त्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाहीतर रात्री उशिरा पाहायच्या अशी घरोघरी वेगवेगळ्या वाहिन्यांच्या कार्यक्रमांची वेगवेगळी वाटणी झालेली पाहायला मिळते. या सगळ्याचा अर्थ एकच सध्या मराठी मनोरंजन वाहिन्यांचा दर्जाही उत्तम आहे आणि त्यांना प्रेक्षकांचाही तितकाच प्रतिसाद मिळतो आहे. आजघडीला दूरदर्शनसह तीन प्रस्थापित खासगी जीईसी वाहिन्या आणि एक युवा वाहिनी असा पाच मराठी वाहिन्यांचा संसार आहे. त्यात आजपासून सहाव्या वाहिनीची ‘सोनी मराठी’ या नव्या वाहिनीची भर पडली आहे. या नव्या वाहिनीच्या येण्याने मराठी मनोरंजनाची मात्रा आणखीन वाढली असून यामुळे मराठी मनोरंजन विश्वाचा दबदबा अजून वाढेल, असा विश्वास मनोरंजन उद्योगातून व्यक्त होत आहे.

सध्या मराठीत ‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’ आणि ‘स्टार प्रवाह’ या तीन खासगी मनोरंजन वाहिन्या आहेत. या चमूत अगदी मागून दाखल झालेली ‘झी युवा’सारखी तरुण वाहिनीही स्थिरावली आहे. या प्रत्येक वाहिनीचा आपला स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. सध्या एकटय़ा बंगाली भाषेत दहा वाहिन्या आहेत. त्या तुलनेत आपल्याकडे पाचच वाहिन्या असल्याने अजूनही या क्षेत्रात वाव आहे. आणि जेव्हा नवीन वाहिनी येते तेव्हा प्रेक्षकसंख्या आणि बाजारपेठ या दोन्ही गोष्टींचा विस्तारच होतो, असा ठाम विश्वास ‘सोनी मराठी’चे व्यवसायप्रमुख अजय भालवणकर यांनी व्यक्त केला. अर्थातच नवीन वाहिनी आणायची तर इतर वाहिन्यांवर जे कार्यक्रम सुरू आहेत त्यापेक्षा काहीतरी वेगळा आशय प्रेक्षकांना दाखवला गेला पाहिजे. तरच प्रेक्षक आपसूक नवीन काही पाहण्यासाठी उत्साह दाखवतील, हा विचार करून जाणीवपूर्वक मालिकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातही सोनी पिक्चर्स नेटवर्क समूहातील मनोरंजन वाहिन्यांचा चेहरा हा शहरी असल्याने त्याचाही विचार करून शहरी विषयांवर जास्त भर देत, ग्रामीण भागाचाही नवा चेहरा कसा दाखवता येईल, याचाही अभ्यास करून त्यादृष्टीने मालिकांची निवड केली असल्याचेही भालवणकर म्हणाले.

नवीन वाहिनी सुरू झाल्यावर मराठी प्रेक्षक विभागला जाईल, ही भीतीच नाही. उलट मराठीत पूर्णपणे नवी कोरी वाहिनी येते आहे ही चांगली गोष्ट आहे आणि त्याचे स्वागत झाले पाहिजे, असे मत झी मराठीचे व्यवसायप्रमुख नीलेश मयेकर यांनी व्यक्त केले. एक काळ असा होता की, मराठी प्रेक्षक हा पूर्णपणे हिंदी मालिकांकडे झुकलेला होता. मराठी मनोरंजन लयाला जाईल की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्या काळात ‘झी मराठी’सारखी खासगी वाहिनी आली. आज मराठी मनोरंजन वाहिन्या प्रस्थापित होऊन २० वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर का होईना एका मोठय़ा समूहाने मराठी वाहिनी सुरू करण्याचा विचार केला हा खरोखरच स्तुत्य निर्णय आहे. याचाच अर्थ मराठीत सध्या चांगलं मनोरंजन होतं आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद सातत्याने वाढता आहे. आणि आता केवळ दूरचित्रवाणीपुरते मर्यादित न राहता चित्रपट, बालनाटय़, साहित्य अशा विविध अंगाने मराठी मनोरंजन विश्व सर्वार्थाने विस्तारतं आहे. अशा वेळी प्रेक्षकांना फक्त सासू-सुनांच्या मालिकारंजनात अडकून न ठेवता सातत्याने नवनवे विषय, साहित्य, मांडणी याचे प्रयोग अनुभवता यायला हवेत. मराठीत प्रेक्षक आहेतच त्यांना दर्जेदार आशय मिळत राहिला तर ही प्रेक्षकसंख्या वाढतीच राहणार, असे स्पष्ट प्रतिपादनही मयेकर यांनी केले.

मराठी मनोरंजन विश्व हे स्वबळावर उभं राहिलेलं असून कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना स्वत:च्या क ल्पकतेवर, सर्जनशीलतेवर मोठं झालेलं आहे, असं मत निर्माता नितीन वैद्य यांनी व्यक्त केलं. मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या सुरुवातीच्या काळात त्या वेळच्या ‘अल्फा मराठी’ वाहिनीबरोबर नितीन वैद्य यांनी काम केलं होतं. मराठी वाहिन्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या नितीन वैद्य यांनी हिंदी वाहिन्यांची धुराही सांभाळली आहे. पूर्वी मुंबईत बाजारपेठ होती. जाहिरातीचं सगळ्यात मोठं उत्पन्न मुंबईतून मिळत होतं मात्र यात मराठी कुठेच नव्हती. मराठीत आलेल्या खासगी वाहिन्यांनी पहिल्यांदा बाजारातील पैसा आणि मराठी आशय यांची सांगड घातली. मराठी वाहिन्यांमुळे बाजारातील पैसा मराठी निर्मात्यांकडे वळला. त्यातून निर्मितीसंस्था सुरू झाल्या, कलाकार-तंत्रज्ञ-लेखकांची एक फळीच्या फळी तयार झाली. मराठी मनोरंजन विश्वाच्या अर्थकारणाची घडी बसवण्यात या सुरुवातीच्या खासगी मनोरंजन वाहिन्यांचा मोठा असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.

२००३ मध्ये झी मराठी, ई टीव्ही मराठी आणि स्टार प्रवाह या तिन्ही वाहिन्यांची मिळून प्रेक्षकसंख्या ८ टक्के एवढीच होती. आणि या तिन्ही वाहिन्यांची आर्थिक उलाढाल ७० ते ८० कोटींच्या पलीकडे गेली नव्हती. त्या वेळी ‘सारेगमप’, ‘होम मिनिस्टर’सारखे प्रेक्षकांचा सहभाग वाढवणारे कार्यक्रम सुरू केले. याचा खूप मोठा फायदा झाला. २००६ पर्यंत या तिन्ही वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग २१ टक्क्यांपर्यंत पोहोचला. याचाच अर्थ मनोरंजन वाहिन्या वाढत गेल्या, स्पर्धा वाढत गेली तसा दर्जाही आपोआप वाढत गेला. आज केवळ जाहिरातीच्या रूपातून मिळणारे उत्पन्न हे सातशे-आठशे कोटींच्या घरात आहे. शिवाय, सशुल्क वाहिन्या झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचं साधनही वाढलं असल्याने आता मराठी वाहिन्यांना खूप वाव आहे, अशी माहिती वैद्य यांनी दिली.

‘सोनी मराठी’ वाहिनी नवीन असली तरी त्याला सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या वाहिन्यांचा चेहरा आहे. मराठी प्रेक्षक गेली अनेक र्वष ‘सोनी’च्या वाहिन्यांशी जोडलेला आहे. हा प्रेक्षक नक्कीच मराठी वाहिनीकडे वळेल. शिवाय या वाहिनीसाठी ‘सोनी’च्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून जाहिरात करण्यात येत असल्याने हिंदूीत प्रसिद्ध असलेल्या वाहिनीचा मराठी चेहरा बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच ‘सोनी मराठी’कडे वळतील, अशी खात्री अजय भालवणकर यांना वाटते.

सध्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर मराठी वाहिन्यांशिवाय पर्याय नाही हे शाहरूख, आमिर खान, अक्षयकुमार सारख्या हिंदीतील कलाकारांनाही चांगलंच लक्षात आलं आहे. त्यामुळे ते स्वत: आपल्या हिंदी चित्रपटांच्या जाहिरातीसाठी मराठी वाहिन्यांवर हजेरी लावतायेत. ही गोष्ट जाहिरातदारांनीही हेरलेली असल्याने मराठी वाहिन्यांना जाहिरातदारांकडूनही तितकाच मोठा प्रतिसाद आहे, अशी माहिती नीलेश मयेकर यांनी दिली.

दिल्ली, बंगळूरु, गुरगाव अशा कुठल्याही शहरांतून उत्पादन होत असलं तरी कंपन्यांना मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी वाहिन्यांचाच आधार घ्यावा लागतो आहे. मराठी वाहिन्यांची प्रेक्षकसंख्याही तितकीच जास्त असल्याने साहजिकच उद्योजकांनाही मराठी वाहिन्यांवर जाहिरातीचे स्लॉट खरेदी करणं हे व्यवसायाच्या दृष्टीने बंधनकारकच झालं आहे. शिवाय, मराठी वाहिन्यांमुळे स्थानिक उद्योजक, बँका, ज्वेलर्स यांचाही व्यवसाय वाढत गेल्याने त्यांच्यासाठीही या वाहिन्या महत्त्वाच्या ठरल्या असल्याचे नितीन वैद्य यांनी सांगितले.

या सगळ्या पाश्र्वभूमीवर मराठीत नवीन वाहिनी आली तर व्यवसाय विस्ताराबरोबरच मराठी मनोरंजन विश्वाचा दबदबाही आणखी वाढेल, असा उत्साहाचा आणि विश्वासाचा सूर मराठी मनोरंजन उद्योगातून व्यक्त होतो आहे. मराठी वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग वाढला आणि तोच प्रेक्षक मराठी चित्रपटांमागेही उभा राहिला. त्यामुळे मराठी वाहिन्या केवळ दूरचित्रवाणी विश्वापुरत्या उरल्या नाहीत तर त्यातून चित्रपटनिर्मितीही होऊ लागली, मराठी चित्रपट उभे राहिले. त्यातून मराठी मनोरंजन विश्वाचा विस्तार वाढत गेला आणि यापुढेही तो असाच वाढत राहील, असाच विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.