निलेश अडसूळ

ज्ञान आणि वित्त यांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ या जगविख्यात कार्यक्रमाचे मराठी पर्व लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल सहा वर्षांनी खेडेकर यांनी ही धुरा स्वीकारली आहे. कार्यक्रमाचे पहिले आणि दुसरे पर्व त्यांच्याच बहारदार शैलीने रंगले होते.

करोडपती होण्याची आशा प्रत्येकालाच असली तरी ती सत्यात उतरतेच असे नाही. पण आपल्याला अवगत असलेल्या ज्ञानाचा आधार घेऊन ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमातून प्रत्येक सामान्याला देण्यात आली. परदेशातून आलेला हा खेळ भारतात हिंदी भाषेतून रूढ झाला. पुढे त्याची प्रादेशिक भाषांतील गरज लक्षात घेऊन तितक्याच वेगाने तो प्रसारित झाला. मराठी प्रेक्षकांनीही या कार्यक्रमावर भरभरून प्रेम केले. पहिले दोन पर्व तर आजही स्मरणीय आहेत. असाच स्मरणीय सोहळा घडवण्यासाठी सोनी मराठी वाहिनीने पाऊल टाकले आहे. जूनच्या सुरुवातीला ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना अनुभवता येईल. पूर्वतयारीची लगबग आता सुरू झाली आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप तेच असले तरी यंदाचे पर्व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक अद्ययावत असणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते सचिन खेडेकर यांनी स्वगृही परतल्याची भावना व्यक्त केली आहे. ‘मी स्वत: या कार्यक्रमाचा प्रेक्षक आहे. हा केवळ खेळ नसून ज्ञानाचा गौरव आहे. अफाट बुद्धिमत्तेचे लोक आपल्यापुढे बसलेले असतात. त्यांचे ज्ञान पाहून रोज नवी शिकवण मिळते. नट म्हणून समृद्ध करणारा हा अनुभव असतो. सहा वर्षांनी पुन्हा एकदा ती खुर्ची भूषवताना आनंद नाही तर अत्यानंद होत आहे,’ अशी भावना खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

‘कोण होणार करोडपती’ हा १२० देशांमध्ये होणारा खेळ भारतातच १० भाषांमध्ये होतो. त्यामुळे असा यशस्वी कार्यक्रम सोनी मराठी साकारतेय हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. संशोधन, प्रश्न निर्मिती यासाठी मोठा अभ्यास करावा लागतो. यंदाच्या पर्वात मूळ संकल्पनेला धक्का न लावता अनेक बदल केलेले आहेत. तंत्रज्ञानाने आपण बरेच पुढे गेलो आहोत, त्याचे प्रतिबिंब नक्कीच कार्यक्रमात दिसेल.

– अजय भाळवणकर,  व्यवसाय प्रमुख, सोनी मराठी

या खेळाचा मी प्रचंड आदर करतो. आपल्याकडे असे म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत. पण त्यांना एकत्र आणणारा हा मंच आहे. अनेक नव्या गोष्टी आहेत ज्या हळूहळू उलगडतील. प्रेक्षकांची पसंती काळानुरूप बदलत असल्याने आव्हानेही आहेत. सध्या ‘मिस्ड कॉल म्हणजे एक करोड’ असे ब्रीद आम्ही आचरले आहे. कारण या खेळात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी मिस्ड कॉल देणे गरजेचे आहे, जो एक करोडपर्यंत घेऊन जाणारा असेल.

– सचिन खेडेकर, सूत्रसंचालक