News Flash

भावगीतांची नव्वदी

मराठी संगीतातील अमूल्य ठेवा असलेले भावसंगीत अर्थात मराठी भावगीत या प्रकाराला याच एप्रिल महिन्यात नव्वद वर्षे पूर्ण झाली.

मराठी संगीतातील अमूल्य ठेवा असलेले भावसंगीत अर्थात मराठी भावगीत या प्रकाराला याच एप्रिल महिन्यात नव्वद वर्षे पूर्ण झाली. १९२६ पासून सुरू झालेला मराठी भावसंगीताचा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. कवी/गीतकार, गायक आणि संगीतकार यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे समृद्ध झालेल्या मराठी भावगीताच्या नव्वदीनिमित्ताने..

चित्रपटगीत नसलेले किंवा कवितेचे झालेले गाणे म्हणजे भावगीत असा सर्वसाधारणपणे समज असला तरी तो चुकीचा आहे. म्हटले तर चित्रपटगीत आणि भावगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी भावगीतामध्ये भाववृत्तीला जास्त महत्त्व असते. गेयता आणि शब्द यांच्या सहजसुंदर मिलाफातून भावगीत तयार होते. साधे-सोपे, पण मनाला हळुवार स्पर्श करणारे शब्द आणि कोणालाही सहज गुणगुणता येईल व मनात घर करून राहील अशी सुंदर चाल यामुळे मराठी भावगीत हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

मराठीतील भावगीतांचा हा ठेवा मोरेश्वर पटवर्धन व वामन देशपांडे यांनी ‘गाणी गळ्यातली गाणी मनातली’च्या माध्यमातून पुस्तकरूपाने रसिकांपुढे काही वर्षांपूर्वी आणला. ‘साहित्य प्रसार केंद्रा’ने याचे ११ भाग प्रकाशित केले होते. या सर्वच भागांना रसिक श्रोते व वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. गिरगाव येथील रायकर यांनीही ‘गोड गोड भावगीते’ तसेच काही अन्य प्रकाशकांनीही मराठी भावगीते प्रकाशित केली आहेत.

आत्ताआत्तापर्यंत कवी ना. घ. देशपांडे यांनी लिहिलेली आणि जी. एन. जोशी यांनी गायलेली व संगीतबद्ध केलेली ‘रानारानात गेली बाई शीळ’ ही कविता पहिले मराठी भावगीत समजले जात होते. १९३२ मध्ये ही कविता/गाणे ध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात लोकांपुढे आले आणि लोकप्रिय ठरले. ध्वनिमुद्रिका येण्याअगोदर जी. एन. जोशी यांनी या कवितेचे वाचन करून/गाऊन ती लोकप्रिय केली होतीच; पण या गाण्यापूर्वी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले आणि रंगभूमीवरील अभिनेते-गायक तसेच ‘ललित कला दर्श’ कंपनीचे चालक-मालक व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर (गायक व अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांचे वडील) यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भावगीत असल्याची माहिती अभ्यास व संशोधनातून नंतर समोर आली.

‘रानारानात गेली बाई शीळ’च्याही अगोदर म्हणजे १९२६ मध्ये ‘एचएमव्ही’ने या गाण्याची ध्वनिमुद्रिका काढली होती, असे ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड्स कलेक्टर्स’ संस्थेचे सुरेश चांदवणकर यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितले. १९२६ पासून सुरू झालेली मराठी भावगीतांची स्वरयात्रा आजही अव्याहतपणे सुरू असून मराठी भावगीतांच्या सुमारे दीड ते दोन हजार ध्वनिमुद्रिका निघाल्या असल्याचेही ते म्हणाले. हाच मुद्दा अधिक पुढे नेताना गायक व इंदूर येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मराठी भावगीतांच्या ‘स्वरभावयात्रा’ या  कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची होती त्या विनायक जोशी यांनी सांगितले, ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला’ या कवितेची ध्वनिमुद्रिका एप्रिल १९२६ मध्ये निघाली. मराठीत यापूर्वी ज्या ज्या ध्वनिमुद्रिका निघाल्या होत्या त्यावर ‘नाटय़पद’ असेच लिहिलेले असायचे. मात्र ‘राजहंस माझा निजला’च्या ध्वनिमुद्रिकेवर पहिल्यांदा ‘लिरिक’ (गीत) असे लिहून आले. ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर तसा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच हे गीत मराठीतील पहिले भावगीत ठरते. हे गाणे ‘पिलू’ रागात बांधण्यात आले होते. एप्रिल महिन्यात ही ध्वनिमुद्रिका निघाल्याने यंदाच्या एप्रिल महिन्यात मराठी भावगीताला नव्वद वर्षे झाली आहेत.

मराठी भावगीताचा हा प्रवास पुढे गजाननराव वाटवे यांनी समर्थपणे चालविला. मराठीतील कवितांना वाटवे यांनी चाली लावून ती गाणी लोकांपर्यंत पोहोचविली. त्या कार्यक्रमांना रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गजाननराव वाटवे आणि भावगीत हे एक अतूट समीकरण झाले. गणेशोत्सवातही वाटवे यांनी भावगीत गायनाचे अनेक कार्यक्रम केले. वाटवे यांनी गायलेली ‘कुणीही पाय नका वाजवू’, ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘झुंजुमुंजु झालं चकाकलं’, ‘ती पाहा बापूजींची प्राणज्योती’, ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’, ‘मैत्रिणींनो सांगू नका’, ‘मोहुनिया तुजसंगे नयन’, ‘यमुनाकाठी ताजमहाल’, ‘राधे तुझा सैल अंबाडा’, ‘रानात सांग कानात’, ‘वारा फोफावला’ आदी भावगीते लोकप्रिय झाली आणि आजही ती श्रोत्यांच्या ओठावर आहेत. बापूराव पेंढारकर, जी. एन. जोशी यांच्यापासून सुरू झालेल्या मराठी भावगीताच्या या सुरेल स्वरयात्रेत गायक, संगीतकारांसह कवी-गीतकार यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. यात ना. घ. देशपांडे, कवी बी, ग. दि. माडगूळकर, पी. सावळराम, आ. रा. देशपांडे ऊर्फ अनिल, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, यशवंत देव, मधुकर जोशी, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, अशोक परांजपे, सुधीर मोघे, सौमित्र हे कवी, तर संगीतकारांमध्ये अगदी श्रीनिवास खळे, स्नेहल भाटकर, हृदयनाथ मंगेशकर, पं. यशवंत देव, अनिल-अरुण, अनिल मोहिले, अरुण पौडवाल, अशोक पत्की, कमलाकर भागवत, गोविंद पोवळे, सुधीर फडके, श्रीधर फडके, दशरथ पुजारी, श्रीकांत ठाकरे आदी संगीतकारांचा खूप मोठा सहभाग होता. त्यांना तेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, सुधीर फडके, श्रीधर फडके, अरुण दाते, मालती पांडे, सुधा मल्होत्रा, साधना सरगम, देवकी पंडित, सुरेश वाडकर, वसंत आजगावकरांसारख्या गायक-गायिकांचीही तितकीच चांगली साथ मिळाली.

मराठी भावगीताच्या नव्वद वर्षांच्या या वाटचालीतील काही कवी, संगीतकार व गायक-गायिकांचा धावता उल्लेख केला आहे. त्यात काही नावे अनवधानाने राहूनही गेली असतील. उत्तम संगीतावर प्रेम करणारे मराठी रसिक श्रोते जोपर्यंत आहेत तोपर्यंत मराठी भावगीत टिकून राहील हे नक्की.

‘स्वरभावयात्रा’

इंदूरच्या ‘सानंद न्यास’चे जयंत भिसे, सुधाकर काळे यांनी इंदूर येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काही तरी वेगळा कार्यक्रम करण्याची विनंती गायक विनायक जोशी यांना केली आणि जोशी यांच्या संकल्पनेतून ‘स्वरभावयात्रा’ हा मराठी भावगीतांचा प्रवास उलगडणारा कार्यक्रम साहित्य संमेलनात सादर झाला. रात्री साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास सुरू झालेली ही मैफल पहाटे अडीच-तीनपर्यंत चालली होती. पंधरा ते वीस हजार रसिकांच्या उपस्थितीत रंगलेल्या या स्वरभावयात्रेत रवींद्र साठे, श्रीधर फडके, अरुण दाते या दिग्गजांसह विनायक जोशी, सुचित्रा भागवत, नीलाक्षी पेंढारकर, मृदुला दाढे-जोशी हे गायक सहभागी झाले होते. ठाणे व डोंबिवलीतील दहा नामवंतांची संगीतसाथ या गायकांना लाभली होती. मंगला खाडिलकर यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले होते. कार्यक्रमाचे खास वैशिष्टय़ म्हणजे ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव हे प्रेक्षकांत रसिक श्रोते म्हणून उपस्थित होते; पण जेव्हा आता अरुण दाते गाणे सादर करतील असे जाहीर झाले तेव्हा देव प्रेक्षकांतून उठून व्यासपीठावर आले आणि त्यांनी स्वत: दाते यांना हार्मोनियमवर संगीतसाथ केली.

‘स्वर आले दुरुनी’

आकाशवाणीच्या संगीत विभागाचे निर्माते आणि ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांनीही ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘स्वर आले दुरुनी’ या लोकप्रिय भावगीताची आठवण सांगताना देव म्हणाले, ‘‘मी तेव्हा आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर होतो. गाण्याचे संगीतकार प्रभाकर जोग यांनी मला मुंबईहून इनलॅण्ड पत्रावर टपालाने गाण्याची चाल पाठविली होती. मला त्यांनी या चालीवर मला गाणे लिहून पाठवायला सांगितले. काही केल्या मला काय लिहायचे ते शब्द सुचत नव्हते. मी नागपुरात व जोग मुंबईत, त्यामुळे प्रत्यक्ष भेट किंवा चर्चाही होऊ शकत नव्हती. विचार करता करता मनात आले की, जोगांनी मला लांबून म्हणजे दुरून मुंबईहून गाण्याची चाल-स्वर पाठवले आहेत आणि मला पटकन ‘स्वर आले दुरुनी’ हे शब्द सुचले आणि पुढे हे अजरामर गाणे तयार झाले. सुधीर फडके यांनी त्यांच्या आवाजात ते लोकप्रिय केले. या गाण्याचे खास वैशिष्टय़ म्हणजे या गाण्यासाठी  मी (गीतकार), जोग (संगीतकार) आणि फडके (गायक) असे तीनही संगीतकार वेगवेगळ्या रूपांत एकत्र आलो होतो. ज्या गाण्यातून केवळ मनोरंजन न होता भावसंकेत निर्मिती होते ते गाणे किंवा कविता म्हणजे भावगीत होय, अशी माझी भावगीताची व्याख्या आहे. चांगली भावगीते सातत्याने ऐकणे हे रसिकश्रोत्यांचे पहिले कर्तव्य आहे. चांगले संगीत शेवटपर्यंत टिकून राहायचे असेल तर चांगली गाणी ऐकली पाहिजेत. आकाशवाणीतील ३० वर्षांच्या नोकरीत मला सार्थ स्वरांची सोबत लाभली. ‘शुक्रतारा मंद वारा’ हे गाजलेले भावगीत आकाशवाणीच्या ‘भावसरगम’ कार्यक्रमातच पहिल्यांदा सादर झाले. नंतर त्याची ध्वनिमुद्रिका निघाली. आज ५०-५५ वर्षांनंतरही या गाण्याची गोडी व लोकप्रियता कमी झालेली नाही. गजाननराव वाटवे हे ‘गेट वे ऑफ मराठी भावगीत’ आहेत,’’ असेही देव यांनी सांगितले.

भावसंगीत अमर राहील

मराठी भावसंगीताला नव्वद वर्षे पूर्ण झाली यावर खरे तर विश्वासच बसत नाही. बापूराव पेंढारकर, जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे या दिग्गज मंडळींनी मराठी भावसंगीतासाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी घातलेल्या पायामुळे पुढे आम्ही सगळे भावसंगीत गाऊ शकलो. मी आज भावगीत गायक म्हणून ओळखला जातो त्याचे सर्व श्रेय या मंडळींना आहे. कविता किंवा गाणे अर्थात भावसंगीत हे श्रोत्यांपुढे कसे साकारायचे, आपल्या गळ्यातून त्या गीतातले भाव श्रोत्यांपर्यंत कसे पोहोचवायचे हे मी सुधीर फडके यांच्याकडून शिकलो. भावसंगीत लोकप्रिय करण्यात गायक-गायिका व संगीतकारांबरोबरच कवींचेही महत्वाचे योगदान आहे. ना. घ. देशपांडे यांच्यापासून ते आजच्या सौमित्रपर्यंतचे कवी तसेच श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर ते आजच्या मिलिंद इंगळे या सर्व संगीतकारांचाही यात वाटा आहे. भावसंगीत हे कवीचे माध्यम आहे. माझे भाग्य थोर की, मला शांता शेळके, वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य,  सुरेश भट यांच्यासारखे कवी लाभले. भावकविता जोपर्यंत चांगली लिहिली जात राहील तोपर्यंत भावसंगीत अमर राहील.

– अरुण दाते

 

आकाशवाणीचाही मोठा सहभाग

आकाशवाणीवरील ‘भावसरगम’ या कार्यक्रमातून अनेक उत्तमोत्तम मराठी भावगीते सादर झाली. तेव्हा नवोदित असलेले कवी-गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिकांना ‘भावसरगम’ म्हणजे हक्काचे व्यासपीठ होते. तेव्हाचे नवोदित पुढे दिग्गज झाले, पण त्यापैकी काहींची सुरुवात आकाशवाणीवरील ‘भावसरगम’मुळे झाली, तर काही दिग्गजांनीही खास आकाशवाणीवरील या कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 3:57 am

Web Title: marathi evergreen bhavgeet songs complete 90 years
Next Stories
1 नृत्य..ऑनलाइन!
2 मॅच फिक्सिंगमधील दडलेल्या गोष्टींचा पट..
3 जागीच घुटमळणारे ‘स्ट्रॉबेरी’  
Just Now!
X