चित्रपट तुफान गाजला की, तो चित्रपट हिंदीतही आणला जाईल, असे त्या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक हमखास सांगतात. कालांतराने त्या चित्रपटानंतर आणखी चित्रपट येतात आणि जातात. मात्र हिंदीत प्रदर्शित होणाऱ्या त्या मराठी चित्रपटाचे काय झाले, याविषयी कोणीच बोलत नाही. पण अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ठसा उमटवणारा ‘आयना का बायना’ हा चित्रपट मात्र त्याला अपवाद ठरला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत ‘डब’ करण्यात आला असून तो जस्साच्या तस्सा हिंदीतून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क सोनी मॅक्स या बडय़ा वाहिनीने विकत घेतले आहेत. मराठी चित्रपटांसाठी ही नवीन बाजारपेठ ठरणार आहे.
बालसुधारगृहात राहणाऱ्या मात्र नृत्यात उत्तम गती असलेल्या मित्रांच्या त्याच नृत्यासाठीच्या संघर्षांची कहाणी ‘आयना का बायना’ या चित्रपटातून मांडली होती. हिंदीच्या तोडीची हिप हॉप नृत्ये, सचिन खेडेकर यांच्यासह सर्वाचा दमदार अभिनय आणि बालसुधारगृहातील एका वेगळ्या विश्वाची ओळख या चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. या चित्रपटाला तिकीटबारीवर चांगले यश तर मिळालेच, पण या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतही आपला ठसा उमटवला. जर्मनीतील स्टूटगार्ट, अमेरिकेतील सिएटल आणि कॅनडातील टोरांटो येथील चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने आपली छाप पाडली.
चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर दिग्दर्शक समित कक्कड यांनी हा चित्रपट संपूर्ण देशभरात पोहोचवण्याचे ठरवले. त्या दृष्टीने त्यांनी हा चित्रपट सर्व कलाकारांच्या आवाजातच हिंदीत डब केला. अक्षर फिल्म्स डिव्हिजन या संस्थेच्या या चित्रपटाचे हिंदीतील सर्व सॅटेलाइट हक्क सोनी मॅक्स या मोठय़ा वाहिनीने विकत घेतले आहेत. ‘आयना का बायना’ या चित्रपटाचा विषय कोणत्याही एका भाषेपुरता मर्यादित नाही. हा चित्रपट देशभरातच नाही, तर जगभरात पोहोचावा, या उद्देशाने तो आपण हिंदीतूनही प्रदर्शित करणार आहोत. त्यासाठी सोनी मॅक्ससह करार झाला असून लवकरच देशभरातील चित्रपटप्रेमींना हा चित्रपट पाहता येईल, असे दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.मराठी चित्रपट खूपच दर्जेदार आहेत. सशक्त कथानकाबरोबरच आजकाल या चित्रपटांचे निर्मिती मूल्यही उत्तम असते. त्यामुळे या चित्रपटांना हिंदीत चांगली बाजारपेठ आहे. ‘आयना का बायना’ या चित्रपटाच्या हिंदीतील पदार्पणाद्वारे मराठीतील इतर निर्मात्यांना एक नवीन दिशा मिळणार आहे. अधिकाधिक मराठी चित्रपट हिंदीत रूपांतरित होऊन देशभरात पोहोचले पाहिजेत, असे कक्कड म्हणाले.