मराठी चित्रपट आता आपल्या कक्षा विस्तारत आहे. जागतिक स्तरावर उत्तमोत्तम दर्जाच्या कलाकृती आपला ठसा उमटवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मराठी चित्रपट सन्मानास पात्र ठरत आहेत. अजून एका चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे.

‘पुगळ्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत. आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ४५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या सन्मानाबद्दल माहिती दिली आहे.

दोन शाळकरी मुलांच्या आयुष्यात जेव्हा एक कुत्रा येतो, तेव्हा त्याच्यामुळे त्या दोघांच्या आयुष्यात मनात होणारे भावनिक बदल दाखवणारा हा चित्रपट आहे. ‘पुगळ्या’ या चित्रपटाने कॅलिफॉर्नियामध्ये झालेल्या वर्ल्ड प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च सन्मानाचे जवळपास सगळे पुरस्कार पटकावले.

गणेश शेळके याने सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून तर पूनम चांदोरकर हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनही काही चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, संगीत या विभागांमधलेही पुरस्कार या चित्रपटाने प्राप्त केले आहेत.