विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

मुंबई : लहान मुलांचे भावविश्व रेखाटणाऱ्या विनोद सॅम पीटर दिग्दर्शित ‘पगल्या’ या चित्रपटाची ‘मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. गेल्या काही वर्षांत नानाविध विषय हाताळणारे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत आपली मोहोर उमटवत आहेत. ‘पगल्या’ या चित्रपटाचीही आत्तापर्यंत अमेरिका, इटली, यूके , स्वीडन अशा १९ वेगवेगळ्या देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाली आहे. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबरोबरच कॅलिफोर्निया येथे झालेल्या महोत्सवातही या चित्रपटाने पुरस्कार मिळवले आहेत.

‘मराठी चित्रपटाला एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकणे ही माझ्यासाठी आणि माझ्या चमूसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे’, अशा शब्दांत दिग्दर्शक विनोद सॅम पीटर यांनी आपल्या भावना व्यक्त के ल्या. डॉ. सुनील खराडे यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. त्यांनी खरेतर एका लघुपटासाठी ही कथा लिहिली होती, मात्र कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर त्यावर एक चांगला चित्रपट होऊ शकतो असा विचार त्यांच्या मनात आला. यातूनच पुढे या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

लहान मुलांच्या निरागस भावना, पाळीव प्राण्यांबद्दल त्यांना वाटणारी ओढ लक्षात घेऊन या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. एकाच वयाची दोन मुले, एकमेकांशी काही संबंध नसलेली ही दोन मुले एका कु त्र्याच्या पिल्लामुळे एकत्र जोडली जातात, अशी कथाकल्पना घेऊन बेतलेल्या या चित्रपटात शहरी आणि ग्रामीण वातावरणात वाढलेली मुले, त्यांची मानसिकता असे वेगवेगळे पैलूही पाहायला मिळतात. करोनाच्या संकटकाळात चित्रीकरण पूर्ण करून विविध चित्रपट महोत्सवांमधून जगभर प्रवास के लेल्या या चित्रपटाने पुरस्कार मिळवत आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.