सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक दिग्दर्शक वेगवेगळे विषय हाताळताना दिसत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक विविधांगी विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. यातच आता आणखी एका नव्या धाटणीच्या चित्रपटाची भर पडली आहे. पहिल्यांदाच अरेंज-मॅरेंज या विषयावर एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दिनेश विजय शिरोडे दिग्दर्शित ‘तुझं माझं अॅरेज मॅरेज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून या चित्रपटाच्या माध्यमातून दिनेश शिरोडे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

अरेंज मॅरेजचा विषय अतिशय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने या चित्रपटातून मांडला जाणार आहे. चित्रपटाची कथा-गीतलेखन मयूर परदेशी यांनी केलं असून प्रतिक-प्रथमेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे गायक अवधूत गुप्ते यांचा सुमधूर आवाज या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

षष्ठीज फिल्म अँण्ड एंटरटेन्मेंटचे अमित ललित तिळवणकर आणि अमोल कागणे फिल्म्सचे लक्ष्मण कागणे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अमोल कागणे फिल्म्सच्या लक्ष्मण कागणे यांनी अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेल्या ‘हलाल’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसंच ‘लेथ जोशी’, ‘परफ्युम’ या चित्रपटांचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. नेहमीच वेगळा विषय त्यांनी चित्रपटातून मांडला असल्याने ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ या चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.