मराठी चित्रपटांमधून अनेक नवे प्रयोग होताना दिसत आहेत. ‘दुनियादारी’, ‘बीपी’, ‘टाईमपास’ आणि ‘फॅंण्ड्री’ इत्यादी वेगळी वाट चोखळणाऱ्या चित्रपटांच्या यशाने हे नवे प्रयोग प्रेक्षकांनादेखील तितकेच भावत असल्याचे दिसते. ‘बायोस्कोप’ नावाचा असाच एक वेगळ्यावाटेचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चार कवी, चार कविता आणि चार दिग्दर्शक असलेल्या या अनोख्या चित्रपटात चार अतिशय भिन्न प्रकृतीच्या कवितांचं सादरीकरण कथेच्या रुपाने रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. रवी जाधव, विजू माने, गिरीश मोहिते आणि गजेंद्र अहिरे हे परस्परभिन्न शैलीचे आणि प्रकृतीचे चित्रपट बनवणारे चार नामवंत दिग्दर्शक या अनोख्या चित्रपटाच्या रुपाने एकत्र आले. एकाहून अधिक दिग्दर्शकांनी एकत्र येऊन वेगवेगळी कथानकं एकाच चित्रपटात सादर करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. मात्र, कवितेला केंद्रस्थानी ठेवून चार लघुपट मिळून एक चित्रपट करण्याचा हा प्रयोग केवळ मराठीतच नव्हे, तर भारतीय चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच होत आहे. हे चारही दिग्दर्शक केवळ व्यावसायिक गणितं न मांडता निव्वळ कवितेवरील प्रेमापोटी एकत्र आले आहेत. या अनोख्या प्रयोगाचं शिवधनुष्य उचलतानाच प्रत्येकाने आजवरच्या आपल्या चित्रपटीय प्रवासापेक्षा विरुद्ध टोकाचे कथाविषय निवडून आपल्यातल्या कलात्मकतेलाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘बीपी’ आणि ‘टीपी’च्या अतुलनीय यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव याने विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्रा’ या लघुकथेला ‘बायोस्कोप’मधून रुपेरी पडद्यावर आणलंय. आधीच्या दोन्ही चित्रपटांत टीनेजर्सचं भावविश्व हाताळल्यानंतर रवीने ‘मित्रा’मधून समलैंगिक व्यक्तींची घुसमट मांडण्याचा प्रयत्न केलाय. संदीप खरेची कविता आणि विजय तेंडुलकरांची कथा यांची अचूक सांगड घालत, कथेतला १९४७चा काळ उभा करण्यासाठी आपल्या कथेचं सादरीकरण ब्लॅक अँड व्हाइटमध्ये करण्याचा अनोखा प्रयोगही रवीने केला आहे. याकामी त्याला छायालेखक वासुदेव राणे यांनी समर्थ साथ दिली. स्वतः संदीप खरे, वीणा जामकर आणि मृण्मयी देशपांडे ‘मित्रा’च्या केंद्रस्थानी असून संगीत सलील कुलकर्णीचे आहे.

प्रत्येक चित्रपटात वेगळा जॉनर हाताळणारा विजू माने याने प्रथमच शुद्ध प्रेमकथा सादर करण्याचं आव्हान पत्करलंय. किशोर कदम ऊर्फ सौमित्रची कविता, त्यावर आधारित स्वतः विजूने लिहिलेली कथा आणि विजू व शिरीष लाटकर यांची पटकथा यांतून विजूचा ‘एक होता काऊ’ साकारला आहे. गोरीपान सुंदर मुलीवर प्रेम करणाऱ्या कृष्णवर्णीय मुलाच्या प्रेमकहाणीतून विजूने न्यूनगंडाच्या मुद्द्यावरही नेमकं बोट ठेवलं आहे. त्यासाठी कावळ्याचा प्रतिकात्मक वापर मोठ्या खुबीने करण्यात आला आहे. स्पृहा जोशी आणि कुशल बद्रिके यांची जोडी या निमित्ताने प्रथमच जुळून आली असून, त्यांना विद्याधर जोशी, संपदा जोगळेकर आणि अंगद म्हसकर यांची साथ लाभली आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या रचनेला सोहम पाठक या तरुण संगीतकाराने संगीतबद्ध केलंय.

विजूप्रमाणेच विषयाचं वैविध्य जपणारा गिरीश मोहिते याने ‘बैल’ या कथेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची भावनिक आंदोलनं मांडली आहेत. त्यासाठी त्याने लोकनाथ यशवंत यांच्या याच नावाच्या कवितेचा आधार घेतला आहे. गरिबीने पिचलेला शेतकरी आणि त्याचा बैल यांच्या भावबंधातून भारत आणि इंडियातील रुंदावत चाललेली दरी, शेतकऱ्याला भेडसावणारी असुरक्षितता, समाजव्यवस्थेचं शेतकरी वर्गाकडे होणारं दुर्लक्ष आणि या सगळ्या नकारात्मक वातावरणातही जमिनीशी टिकून असलेलं शेतकऱ्याचं इमान असा व्यापक पट ‘बैल’मधून गिरीशने उभा केला आहे. स्क्रीन पुरस्कार विजेता मंगेश देसाई आणि ‘72 मैल’सारख्या चित्रपटातून आपला ठसा उमटवणारी स्मिता तांबे यांनी गिरीशला भक्कम साथ दिली आहे. सागर कारंडे आणि उदय सबनीस यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या तिन्ही दिग्दर्शकांनी आजच्या काळातल्या कवींच्या कविता निवडल्या असताना गजेंद्र अहिरेने थेट शायरों का शायर मिर्झा गालिबला आवतण दिलंय. गालिबच्या ‘दिले-ए-नादान तुझे हुआँ क्या हैं’ या प्रसिद्ध गझलेवर आधारित त्याच नावाची कथा रचताना त्याने गतकाळातील वैभवशाली स्मृतींवर जगणा-या दोघा वयोवृद्ध, खानदानी कलावंतांच्या सांध्यकालीन आयुष्यातील ठहराव पडद्यावर मांडलाय. नीना कुलकर्णी आणि सुहास पळशीकर यांसारख्या कसलेल्या कलावंतांनी आपल्या अभिनयाने या कथेला सुवर्ण किनार लावली असून संतोष फुटाणे यांचं कलादिग्दर्शन आणि कृष्णा सोरेन यांचं छायालेखन यांनी या वृद्ध कलावंतांच्या आठवणीतला भरजरी नवाबी काळ चोखपणे उभा केला आहे. स्वतः गजेंद्रने लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांचं संगीत लाभलं आहे.

‘अथांश कम्युनिकेशन्स’, ‘विजू माने प्रॅाडक्शन्स प्रा. लि.’, ‘प्री टू पोस्ट फिल्म्स’ आणि ‘गोदा टॅाकीज’ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘गोल्डन ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ची निर्मिती असलेला ‘बायोस्कोप’ हा आगळावेगळा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.