27 May 2020

News Flash

जळजळीत वास्तव..

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण, निर्भयाचा मृत्यू, मुंबईतील शक्ती मिल प्रकरण आणि यांसारख्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

| December 7, 2014 06:04 am

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण, निर्भयाचा मृत्यू, मुंबईतील शक्ती मिल प्रकरण आणि यांसारख्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. लेखक-दिग्दर्शकांनी ‘कॅण्डल मार्च’ या चित्रपटाद्वारे आपली प्रतिक्रिया नोंदविण्याबरोबरच जळजळीत वास्तव प्रेक्षकांसमोर प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे.
एका कॉलेज तरुणी, एक विवाहित गरीब स्त्री, एक शिकलेली मध्यमवर्गीय स्त्री आणि एक प्रसारमाध्यमांची प्रतिनिधी अशा चार वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-कौटुंबिक स्तरांतील महिलांवरील अत्याचाराच्या घटना, एका घटनेने त्यांचे एकत्र येणे आणि लढा देणे यावर बेतलेला हा चित्रपट आहे.
सखी या कॉलेज तरुणीला बसस्टॉपवर काही रोडरोमिओ त्रास देतात आणि त्यातल्या एकाला ती मुस्काटात मारते. यावरून चिडून जाऊन सखीवर सूड उगवण्याच्या हेतूने सादिक या टॅक्सीड्रायव्हरच्या साथीने चारही रोडरोमिओ तिच्यावर बलात्कार करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकतात. सखीला प्रा. अनुराधा जोगळेकर वाचविते आणि रुग्णालयात दाखल करते. या घटनेचे पडसाद विद्या सावंतच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांमध्ये उमटतात आणि हे पाहून सादिक घाबरतो, सादिकची बायको शबाना या घटनेमध्ये सादिकचा हात असल्याचे समजल्यावर हादरते.  गर्दीचा फायदा घेऊन पुरुषांकडून महिलांचा विनयभंग होण्याचे प्रकार, रोडरोमिओंचा जाच, नवऱ्याकडून होणारा लैंगिक-शारिरीक अत्याचार ते सामूहिक बलात्कार एकूणच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्याचा सक्षम प्रयत्न दिग्दर्शकाने या चित्रपटातून केला आहे.
चार प्रमुख स्त्री व्यक्तिरेखांची ओळख करून देण्याचा उत्तम प्रयत्न लेखक-दिग्दर्शकांनी कल्पकतेने करतानाच फिल्मी पद्धतीने मांडणी केली आहे. महिला, मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये त्यांच्या कुटूंबीयांच्या भीडस्तपणामुळे, बदनामी होईल या कारणामुळे पोलीस तक्रारच केली जात नाही. समाजाची ही मानसिकता सखीचे आई-वडील, अनुराधा जोगळेकरचे आई-वडील, सखीची छेडछाड केली जात असताना बसस्टॉपवर उभे असलेले लोक यांच्या वागण्यातून उत्तम पद्धतीने दाखवली आहे. गर्दीचा आधार घेत केले जाणारे चोरटे स्पर्श दाखविण्याबरोबरच दिग्दर्शकाने महिलांवरील अत्याचाराचे वेगवेगळ्या तऱ्हा प्रकर्षांने मांडून या प्रकारांची तीव्रता, भयावहता आणि गांभीर्य प्रेक्षकांसमोर मांडले आहे. प्रत्येकवेळी लोकांनी आंदोलने करून दबाव आणला की मगच सरकार आणि न्यायालये जागी होणार का, प्रत्येक वेळी मेणबत्ती मोर्चा काढून देशभरातील लोक एकत्र आलेले दिसले की मगच अपेक्षित न्याय मिळणार का असा सवाल चित्रपट उपस्थित करतो.
सखीच्या भूमिकेतील सायली सहस्त्रबुद्धे, अनुराधा जोगळेकरच्या भूमिकेतील तेजस्विनी पंडित, विद्या सावंत या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीच्या भूमिकेतील मनवा नाईक आणि शबानाच्या भूमिकेतील स्मिता तांबे या चौघींनीही चोख अभिनय केला आहे. या चौघींचा अभिनय हे चित्रपटाचे प्रमुख बलस्थान आहेच. त्यातही सर्वात आव्हानात्मक अशा शबाना या भूमिकेत जीव ओतून अभिनय करणाऱ्या स्मिता तांबेने निश्चितच बाजी मारली आहे. प्रमुख व्यक्तिरेखांमधील शबाना सोडली तर उर्वरित तिघीजणी या थेट लैंगिक अत्याचाराच्या बळी आहेत. परंतु, सखीवरील अत्याचाराच्या घटनेत अन्य नराधमांच्या साथीने सहभागी झालेला सादिकची बायको म्हणून शबाना या सगळ्या घटनेकडे कशी पाहते, कशी व्यक्त होते, स्वत:चे दारिद्य््रा, नवऱ्यावरचे प्रेम, नवऱ्याकडून होणारा शारिरीक, लैंगिक छळ याची बळी तीसुद्धा आहेच. परंतु, तरीसुद्धा सुरुवातीला सादिकला सोडवण्यासाठी शबाना प्रयत्न करते आणि सत्य उमगल्यावर त्याच्या विरोधात जाते. हा सगळा अभिनयाला आव्हान देणारा भाग स्मिता तांबे यांनी समर्थपणे पेलला आहे. या भूमिकेतून अनेक पदर दिग्दर्शकाने उलगडले आहेत.
वेगवेगळ्या स्तरांतील महिलांना अत्याचार कसा सहन करावा लागतो याचे नेमके दर्शन घडविण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. हे प्रभावीपणे दाखविण्यासाठी फिल्मीपणा केला असला तरी तो इथे संयुक्तिक वाटायला हरकत नाही. चित्रपटाच्या कथा-पटकथा व मांडणीला पूरक ठरणाऱ्या संगीताची साथ मात्र चित्रपटाला मिळालेली नाही. छायालेखनाची चांगली साथ मिळाली आहे. सादिक ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नीलेश दिवेकर या कलावंतानेही उत्तम अभिनय केला आहे. पुरुषी अहंकारासह दारूच्या नशेत केला जाणारा मस्तवालपणा आणि बहकणे असे पदर नीलेश दिवेकरने आपल्या अभिनयातून दाखविले आहेत. या चित्रपटातील पुरुष व्यक्तिरेखा मग सखीचे वडील असोत की अनुराधा जोगळेकरचे वडील, विद्या सावंतचा नवरा, सखीचा मित्र या पुरुष व्यक्तिरेखा कमकुवत, कचखाऊ वृत्तीच्या दाखविल्या आहेत, हे काहीसे खटकणारे आहे. हा चित्रपट जळजळीत वास्तवाचे प्रत्ययकारी दर्शन मात्र नक्कीच घडवतो.

कॅण्डल मार्च
निर्माते – अंजली गावडे, नीलेश गावडे
दिग्दर्शक – सचिन देव
पटकथा – सचिन दरेकर, सचिन देव
कथा-संवाद – सचिन दरेकर
छायालेखक – राजा सटाणकर
संगीत – अमितराज
कलावंत – तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक, सायली सहस्त्रबुद्धे, आशिष पाथोडे, नीलेश दिवेकर, राजेंद्र शिसटकर व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2014 6:04 am

Web Title: marathi movie candle march 2
टॅग Marathi Movie
Next Stories
1 ठो ठो आणि डोक्याचा भुगा
2 ‘अंगूर’चा बहादूर
3 सितारादेवींचे संगीत सूर
Just Now!
X