चुंबक

चांगली संगत चुंबकासारखी चिकटली तर वाईटातूनही चांगलेच बाहेर पडते, असे साधे-सरळ तत्त्व सांगितले जाते. पण सध्या वाईटातूनच आपले चांगले होत असेल तर ती संधी सोडायची नाही, ही भावना अगदी लहान वयापासूनच माणसांमध्ये इतकी भिनली आहे की आपल्याचसारख्या असाहाय्य माणसांचा जीव गेला तरी चालेल. त्याचा सोस न करता त्यांचाच बळी घेऊन आपल्या यशाचे इमले रचायची स्वप्ने मानवी मन पाहत असते. अशा मनाला जेव्हा चांगूलपणाची संगत मिळते तेव्हा अगदी पावलापावलावर त्याचा जो संघर्ष सुरू होतो त्याचा निखळ अविष्कार संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ चित्रपटात पाहायला मिळतो.

अचपळ, अस्वस्थ मनाची घालमेल जशी महत्त्वाची असते, त्याचा संघर्ष जसा महत्त्वाचा असतो. तितकाच किंबहुना फसवल्या जाणाऱ्या व्यक्तीचा विश्वास, त्याचा चांगूलपणाही लक्षात घेण्यासारखी गोष्ट असते. पण अनेकदा मांडणी करताना एकाचे स्थित्यंतर दाखवताना दुसऱ्याची बाजू तितक्या स्पष्टपणे येत नाही. इथे ती ‘प्रसन्ना’च्या (स्वानंद किरकिरे) रूपाने ठळकपणे जाणवते. आणि तिथेच हा चित्रपट जिंकतो. चित्रपट सुरू होतो तेव्हा ती बाळू ऊर्फ भालचंद्र शेवाळे (साहिल जाधव) आणि डिस्को ऊर्फ धनंजय मोरे (संग्राम देसाई) या दोन मित्रांची गोष्ट असते. बाळू एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो आहे तर डिस्को मोबाइल रिपेअरिंगचे काम करतो. डिस्कोच्या तुलनेत बाळू खूपच सरळसाधा आहे. मेहनतीने पैसे कमवून गावी एसटी स्टँडवर उसाच्या रसाचे गुऱ्हाळ थाटायचे बाळूचे स्वप्न आहे. त्यासाठी बाळूला गावी पैसे पाठवायचे आहेत मात्र त्याच्याकडची रक्कम कमी पडते. पैसे जमवण्याच्या नादात बाळूची फसगत होते आणि मग लोकांनाही असेच फसवून पैसे गोळा करायची कल्पना त्याला डिस्को देतो. या दोघांच्या जाळ्यात फसणाऱ्या प्रसन्नाच्या येण्याने बाळू आणि डिस्कोची दमछाक होते. एका क्षणानंतर मात्र ती फक्त बाळू आणि प्रसन्नाची गोष्ट ठरते अगदी शेवटापर्यंत..

बाळू किंवा डिस्को हे दोघेही निष्णात गुन्हेगार नाहीत. सरळ पैसे मिळवायचे मार्ग संपतात तेव्हा मग नाइलाजास्तव बाळू फसवणुकीचे उद्योग करायला तयार होतो. मात्र शारीरिक व्याधी असलेल्या किंवा आपल्याचसारखी परिस्थिती असलेल्याला फसवायला त्याचा धीरही होत नाही आणि हाच बाळू एका क्षणाला रागाने का होईना प्रसन्नाच्या पत्नीला पैशासाठी धारेवर धरतो. त्याच्या अगदी उलट प्रसन्न ऑटिझमग्रस्त आहे. तो जितका निरागस आहे तितकाच आपल्याला कोणी फसवू नये यासाठी तो सावध आहे. ही दोन्ही टोके परिस्थितीमुळे एकत्र येतात आणि एका वेगळ्याच बदलाची सुरुवात होते. दिग्दर्शक म्हणून या सरळ साध्या भावना तितक्याच वास्तवपणे संदीप मोदी यांनी चितारल्या आहेत. सौरभ भावे आणि संदीप मोदी दोघांनीही क था लिहिली आहे. इथे कथेचा उल्लेख महत्त्वाचा वाटतो, कारण अत्यंत साध्या-सोप्या घटनांमधून आपल्याला हवे ते वाचकांपर्यंत आणि इथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहे.

प्रसन्नाच्या व्यक्तिरेखेतून चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांचे दर्शन घडते. आणि क्षणाक्षणाला हा विश्वास पायदळी तुडवला जाणार असे वाटत असतानाच एका क्षणी त्याचा विश्वास जिंकतो. एका अर्थी काहीही न मिळवलेला प्रसन्ना चांगुलपणावरचा त्याचा हा विश्वास खरा ठरतो तेव्हाच जिंकतो. स्वानंद किरकिरे यांनी अगदी सहजपणे प्रसन्ना

ठोंबरेच्या व्यक्तिरेखेत प्रसन्नता आणली आहे. त्याचा हट्ट, त्याचा वेडेपणा, त्याचा शहाणपणा याचा सुंदर कोलाज त्यांच्या अभिनयातून पाहायला मिळतो. तर बाळूच्या भूमिकेत साहिल जाधवनेही त्यांना उत्तम साथ दिली आहे. संग्राम देसाईनेही डिस्को चांगल्या पद्धतीने उभा केला आहे. उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय आणि वास्तव छायाचित्रण या सगळ्यातून हा अगदी साध्या वाटणाऱ्या भावभावनांचा निखळ अविष्कार ‘चुंबक’च्या निमित्ताने पाहायला मिळतो.

* दिग्दर्शक – संदीप मोदी

* कलाकार – स्वानंद किरकिरे, साहिल जाधव, संग्राम देसाई