20 September 2019

News Flash

‘कंडीशन्स अप्लाय’ संगीत अनावरण सोहळा संपन्न

अभय आणि स्वरा यांची फुलत जाणारी प्रेमकहाणी सिनेमात दाखवण्यात येणार

कंडिशन्स अप्लाय- अटी लागू

सतत नव्या ट्रेंड आणि फॅशनच्या शोधात असणारी आजची युवा पिढी लिव्ह इन रिलेशनचा ट्रेंड स्वखुशीने स्वीकारताना दिसत आहे. तरुणांच्या याच मानसिकतेवर भाष्य करणारा ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘कंडिशन्स अप्लाय- अटी लागू’ या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सुबोध भावे, दीप्ती देवी, संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्यासह चित्रपटाच्या संगीत विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ‘कंडीशन्स अप्लाय- अटी लागू’ हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘अविनाश-विश्वजीत यांचं संगीत नेहमीप्रमाणेच श्रवणीय आहे, अविस्मरणीय गीते त्यांनी चित्रपटाला दिली आहेत, असं सांगत सुबोध भावे यांनी संगीतकार अविनाश-विश्वजीत यांचं कौतुक केलं. तर चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या दिप्ती देवीने ‘चित्रपटाचा प्रवास एन्जॉय करत असताना मी अविनाश-विश्वजीत यांच्यासोबतचं कामही एन्जॉय केलं,’ अशा भावना व्यक्त केल्या. चित्रपटाचे संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी प्रेमाचे रंग उलगडून दाखवणारी गोष्ट आणि त्याला अनुसरून असलेली गाणी कंपोज करण्याची संधी मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमचे आभार मानले.

कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या अभय आणि स्वरा यांची फुलत जाणारी प्रेमकहाणी आणि त्याला साजेशी गीतं या चित्रपटात आहेत. या चित्रपटात चार वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आहेत. विश्वजीत जोशी यांनी शब्दबद्ध केलेलं ‘काही कळेना’ हे गीत तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने गायले आहे. ‘तुझेच भास’ हे गाणे फराद भिवंडीवाला आणि प्रियंका बर्वे यांनी गायले आहे. जय अत्रे लिखित ‘मै तो हारी’ हे विरह गीत फराद भिवंडीवाला, आनंदी जोशी आणि विश्वजीत जोशी यांनी गायले आहे. तरुणीला ज्या रॅप संगीताने वेड लावले आहे असं एक रॅप गीत ‘मार फाट्यावर’ ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून आनंद शिंदे आणि गंधार कदम यांनी ते गायले आहे.

लिव्ह इनच्या ट्रेंड वर भाष्य करणाऱ्या ‘कंडीशन्स अप्लाय- अटी लागू’ या चित्रपटात सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, विनीत शर्मा, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, डॉ. उत्कर्षा नाईक, अतिशा नाईक या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित कंडीशन्स अप्लाय- अटी लागू या चित्रपटाची कथा, पटकथा, आणि संवाद संजय पवार यांचे असून सचिन भोसले व अमोल साखरकर यांनी सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाच्या कथेला आणि पार्श्वभूमीला साजेसं संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. प्रसाद पांचाळ हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

First Published on May 18, 2017 8:24 pm

Web Title: marathi movie conditions apply ati lagu music launch