News Flash

प्राईम टाईम मिळूनही अपुऱ्या प्रेक्षकसंख्येअभावी ‘कोर्ट’चा खेळ रद्द

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना 'प्राईम टाईम' देण्याची घोषणा केली असताना शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या निरूत्साहापायी 'कोर्ट' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या

| April 18, 2015 10:54 am

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना ‘प्राईम टाईम’ देण्याची घोषणा केली असताना शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या निरूत्साहापायी ‘कोर्ट’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा खेळ रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. ठाण्याच्या इटरनिटी मॉलमधील आयनॉक्स या चित्रपटगृहात काल हा प्रकार पहायला मिळाला. चित्रपटगृहात संध्याकाळी ‘कोर्ट’ चित्रपटाचा खेळ होता. मात्र प्रेक्षक नसल्याने हा खेळ रद्द करावा लागला. गेले अनेक दिवस मल्टिप्लेक्सधारकांकडून मराठी चित्रपटांना डावलले जात असल्याची ओरड करणाऱ्यांसाठी हा प्रकार डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. मराठी चित्रपटांवर अशाप्रकारची नामुष्की ओढवण्याची ही परिस्थिती फक्त याच चित्रपटगृहापुरती मर्यादित नसून अनेक मल्टिप्लेक्सेसमध्ये थोड्याफार फरकाने असेच चित्र दिसत होते. तीन स्क्रीनवर प्राईम टाईमचा स्लॉट देऊनही एकाही मराठी चित्रपटाला गर्दी नव्हती.
काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देण्यावरुन मोठा वाद झाला होता. शायना एनसी, आमीर खान यांच्यासह अनेकांनी अशाप्रकारच्या सक्तीला विरोधही केला होता. प्रेक्षकांना स्वत:हून चित्रपट बघावासे वाटले पाहिजेत, निव्वळ सक्तीने काही साध्य होणार नाही, असे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे ‘कोर्ट’च्या बाबतीत झालेल्या या प्रकराने ही भीती काही प्रमाणात सार्थ ठरताना दिसत आहे.

प्राईम टाईमचा विषय निघाल्यापासून मी सांगत आहे की, प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. जेव्हा आपण मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देण्याची मागणी करतो, तेव्हा आपलीही काहीतरी जबाबदारी असते. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे हादेखील त्या चित्रपटाचा एकप्रकारे सन्मान असतो. तेव्हा आपणच आपल्या चित्रपटांचा सन्मान केला पाहिजे. याशिवाय , मराठी चित्रपट प्रदर्शित करताना निर्मात्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे. जेणेकरून, त्यांची आपापसांत स्पर्धा होणार नाही आणि प्रेक्षकांनाही जास्तीत जास्त चित्रपट पाहता येतील. 
आदेश बांदेकर, शिवसेना नेते

आपल्याकडे प्राईम टाईमपेक्षा मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची असणारी उपस्थिती ही मुख्य अडचण आहे. चित्रपट बघताना प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या काही कल्पना असतात, त्या सध्या मोठ्या प्रमाणावर हिंदी चित्रपटांकडून पूर्ण होतात. याउलट सध्या मराठीत येणारे चित्रपट समांतर वळणाचे किंवा पठडीबाहेरील विषयांवर आधारित असतात. असे वैचारिक चित्रपट पाहणारे बहुतांश प्रेक्षक दैनंदिन जीवनात आपल्या कामात व्यग्र असतात, त्यामुळे प्राईम टाईमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र, ‘कोर्ट’सारखे सुवर्णकमळ आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट प्रेक्षकांनी हटकून पाहिले पाहिजेत. तेव्हा वेळ मिळत नाही किंवा अन्य कारणे प्रेक्षकांनी पुढे करू नयेत. मराठी चित्रपटांना थेटपणे प्रतिसाद मिळाल्यास मल्पिप्लेक्सचे मालकही तितकासा विरोध करणार नाहीत.
गणेश मतकरी, समीक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 10:54 am

Web Title: marathi movie court show cancelled due to low audience response
टॅग : Court,Marathi Movie
Next Stories
1 पाहाः शशांक केतकरचा गायनाचा श्रीगणेशा!
2 ‘सामना’ची चाळिशी
3 अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेन्ट प्रा. लि. भारतात प्रमोट करणार मराठी थ्रीडी सिनेमे
Just Now!
X