‘पद्मावती’ सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा वाद ताजा असतानाच आता ‘दशक्रिया’ या मराठी सिनेमाला ब्राह्मण महासंघाने विरोध केला. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी या महासंघाने केली. या चित्रपटात ब्राह्मण आणि हिंदू परंपरांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला.

महासंघाचे पदाधिकारी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे निवेदन देणार असून, सिनेमागृहाच्या मालकांना हा सिनेमा प्रदर्शित करू नये, असेही सांगणार आहेत.

ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींवर, सामाजिक विषमतेवर या सिनेमातून भाष्य करण्यात आले.

वाचा : छोट्या पडद्यावरील ‘पद्मावती’ तुम्हाला आठवते का?

दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांची मुख्य भूमिका असलेला ‘दशक्रिया’ हा सिनेमा १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे पुरस्कार देखील मिळाले आहेत.