जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित, संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ हा चित्रपट दाखवण्यात आला. जगभरातील दर्दी प्रेक्षक आणि मान्यवर या महोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. उपस्थितांचे लक्ष वेधत अलोट गर्दीत ‘दशक्रिया’ या चित्रपटाने बाजी मारीत आपले ठसठशीत वेगळेपण सिद्ध करीत सर्वांची वाहवा मिळविली. फ्रान्स येथील ग्रे – ४ या प्रेक्षागृहात हा विशेष खेळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचा ‘आँखो देखा हाल’ पाहण्यासाठी या चित्रपटाची टीम उपस्थित होती. जभरातील प्रेक्षकांची पसंती पाहून भारावून गेल्याची प्रतिक्रिया देत, असेच प्रेम आपल्या मायदेशातील सर्वसामान्य प्रेक्षकही देतील अशी खात्री या टीमने याप्रसंगी व्यक्त केली.

जगप्रसिद्ध ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेने चित्रपट निर्मितीत आपले दमदार पदार्पण करीत निर्माण केलेल्या संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या चित्रपटाचे खास प्रदर्शन ‘कान’मध्ये होत आहे. हा चित्रपट दुसऱ्यांदा २३ मे रोजी दाखवण्यात आला असून आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेचे वेगळे दर्शन या कलाकृतीद्वारे जगभर पोहचत आहे. ‘दशक्रिया’ या चित्रपटास आधी ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ राज्य शासन पुरस्कार, संस्कृती कला दर्पणचे ४ पुरस्कार आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २ पुरस्कार अशा विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या नवव्या ‘निफ’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘दशक्रिया’ चित्रपटाला तब्बल १३ विभागांमध्ये नामांकन जाहीर झाले आहे. यामध्ये बेस्ट अनरिलीज फिल्म निर्मिती व दिग्दर्शन तसेच दिग्दर्शकाचे पदार्पण, प्रमुख अभिनेता, सहाय्यक अभिनेता, बालकलाकार, सर्वोत्कृष्ठ कथा, पटकथा, गीते, छायाचित्रण, संगीत, गायक, गायिका तसेच आपली वेगळी ओळख तयार करण्यात यशस्वी झाल्याबद्दल ‘विशेष पुरस्कार’ अशा १३ विभागांचा समावेश आहे.

दर्जेदार चित्रपट निर्मितीची कास धरून कल्पना यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले. अभिनय आणि निर्मिती करीत नाट्यसृष्टीत दर्जेदार बालनाट्यकृती आणि व्यावसायिक नाट्यनिर्मिती करून वेगळी चुणूक दाखविली आहे. ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या निर्मितीद्वारे पदार्पणात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवीत आपल्या निर्मिती कौशंल्याची पुसटशी कल्पना त्यांनी दिली आहे. ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ सारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांची पटकथा, संवाद, गीते सोबतीला साहित्यिक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही बहुचर्चित साहित्यकृती, संदीप भालचंद्र पाटील याचे ताज्यादमाचे दिग्दर्शन आणि सोबतीला अनुभवी सकस कलावंत तंत्रज्ञांची फौज या जमेच्या बाजूंमुळे ‘दशक्रिया’चा कॅनवास अधिक फुलून आला आहे.

या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, प्रशांत तपस्वी, अनिल रबाडे, उमेश बोलके, संस्कृती रांगणेकर, बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर यांच्यासोबत जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

साहित्यिक बाबा भांड यांच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या ‘दशक्रिया’ या साहित्यकृतीवर प्रख्यात लेखक – कवी संजय कृष्णाजी पाटील यांनी पटकथा, संवाद आणि गीत लेखनासोबत चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. ‘रंगनील क्रिएशन्स’ च्या सौ.कल्पना विलास कोठारी यांची ही पहिली निर्मिती असून संदीप भालचंद्र पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी ‘दशक्रिया’चा कॅनव्हास जिवंत करून या चित्रपटाच्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे. अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे.

नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवेलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, मिलिंद जोशी यांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे.

कान या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे ‘दशक्रिया’ हा आमचा चित्रपट निवडला गेल्याने हा आमचा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रीया निर्मात्या सौ. कल्पना विलास कोठारी यांनी व्यक्त केली आहे. या सोहळ्यासाठी ‘दशक्रिया’ चित्रपटाची टीम फ्रान्सला गेली असून आपला हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना कसा वाटतो आहे? हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.