आपलं स्वत:चं मूल हवं असणं ही संकल्पना आजच्या काळातही समाजात खोलवर रुजलेली आहे. किंबहुना, याआधी मूल होत नाही म्हणून एखादे मूल दत्तक घेऊन त्याचे आईवडील होणारी कित्येक जोडपी दिसायची. आता वैद्यकशास्त्रात इतकी प्रगती झाली आहे की टेस्ट टय़ूब बेबी, सरोगेट मदर अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्वत:चं मूल जन्माला घालणं सहज शक्य झालं असल्याने आपलंच, आपल्या रक्तामांसाचं मूल हवं ही आसही वेगाने वाढत चालली आहे. पण, प्रयत्न करूनही एखाद्या स्त्रीची मातृत्वाची आस जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा तिच्या जाणीव-नेणिवेच्या पातळीवरची उलाघाल मांडणारा ‘ध्यानीमनी’ हा एका अर्थाने वेगळ्या विषयावरचा नाटय़पट आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

लेखक प्रशांत दळवी यांनी ‘ध्यानीमनी’ची कथा लिहिली तेव्हा तो काळ वेगळा होता. मात्र आज इतक्या वर्षांनंतर हाच विषय चित्रपटातून आणताना काळाच्या ओघात आजही त्याचं वैश्विकपण टिकून आहे हेच खरं आहे. सदानंद पाठक (महेश मांजरेकर) आणि त्यांची पत्नी शालू (अश्विनी भावे) या जोडप्याच्या घरी अचानक समीर आणि अपर्णा (अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे) दाखल होतात. सुट्टीसाठी म्हणून चार दिवस बाहेर फिरायला आलेलं हे जोडपं सदानंद पाठक यांच्या रिसॉर्टमध्ये न राहात त्यांच्या घरी राहणं पसंत करतं. त्यांचं घरी राहणं सदानंदला फारसं रुचत नाही. मात्र त्या दोघांच्या येण्याने शालू आनंदी होते. शालू त्या दोघांनाही आपल्या मुलाबद्दल सांगते. त्यांचा मुलगा मोहित शाळेच्या पिकनिकला गेला आहे आणि उशीर झाला आहे तरी तो परतलेला नाही म्हणून शालू अस्वस्थ होते. कोणत्याही घरात वरवर दिसणाऱ्या या नेहमीच्या घटना. मात्र त्याच्या मांडणीत दिग्दर्शकाने एक रहस्य दडवून ठेवलं आहे, याची जाणीव प्रेक्षकांना पहिल्याच भागात होते. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दíशत ‘ध्यानीमनी’ हा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून तो खेळवत ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. विशेषत: शालूची अखंड बडबड आणि सदानंदची अस्वस्थता, त्याच्या चेहऱ्यावर सतत बदलत राहणारे भाव यातून या जोडप्याची खरी गोष्ट वेगळी आहे हे जाणवून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

‘ध्यानीमनी’ या चित्रपटाचे कथाबीज नाटकातील असल्याने ते तसे छोटेखानीच आहे. त्यामुळे एकंदरीतच चित्रपटात फापटपसारा न ठेवता त्याला कात्री लावून दिग्दर्शकाने पूर्णपणे विषयावर केंद्रित असा चित्रपट केला आहे. एखाद्याचं अस्तित्वच नसताना त्याचं असणं मांडून रंगवलेला संसाराचा खेळ, त्या खेळात पत्नीला साथ देणारा सदानंद आणि एका वळणावर हा खेळ आपल्यावरच उलटतोय हे लक्षात आल्यानंतर डाव वाचवण्यासाठी सदानंदचे प्रयत्न अशी एक वेगळी नाटय़मय कथा या चित्रपटात पाहायला मिळते. पूर्वार्धापेक्षा चित्रपट उत्तरार्धात जास्त पकड घेतो. महेश मांजरेकर यांनी सदानंद पाठकची भूमिका जीव ओतून केली आहे. विशेषत: उत्तरार्धात होणारी सदानंदची ससेहोलपट आणि त्यानंतरचे त्याचे प्रयत्न असोत सगळ्या छटा मांजरेकरांनी अस्सल रंगवल्या आहेत. शालूच्या भूमिकेत अश्विनी भावे यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे. मात्र पूर्वार्धाचा सुरुवातीचा भाग हा नाटकात घडल्यासारखाच वाटत असल्याने थोडासा भडक वाटतो. अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे या दोघांनीही आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. एक वेगळा नाटय़मय विषय चित्रपट माध्यमातून पोहोचवणारा ‘ध्यानीमनी’ हा प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरेल.

ध्यानीमनी

  • निर्माता – द ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट
  • दिग्दर्शन – चंद्रकांत कुलकर्णी
  • कलाकार – महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे.