मराठी चित्रपटसृष्टीत अनोख्या विक्रमाची नोंद करीत संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाने केवळ ४५ दिवसांत २२ कोटी रुपयांचा गल्ला गोळा करण्याचा विक्रम नोंदविला आहे. गल्ल्याच्या बाबतीत या चित्रपटाने ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाशी मंगळवारी बरोबरी केली आहे.
सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ याच नावाच्या कादंबरीवरील हा चित्रपट आणखी महिनाभर चालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता व्हिडिओ पॅलेसचे नानुभाई ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, दुनियादारीने अवघ्या ४५ दिवसांत २२ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला ही आनंदाचीच बाब आहे. परंतु, आणखी ३०-३५ कोटी किंवा त्याहूनही जास्त गल्ला गोळा करणारे चांगले चित्रपट मराठीत यायला हवेत. एकूणच मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांची उलाढाल वाढली आणि आमच्या चित्रपटाचा विक्रम भविष्यात मराठी चित्रपटांनी मोडला तर नक्कीच आनंद होईल. मराठी चित्रपट दर्जेदार बनविणे, चांगली कथानके मांडणे हे महत्त्वाचे आहेच; परंतु,
चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीकडेही बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. ‘दुनियादारी’च्या प्रदर्शनाच्या सहा महिने आधीपासून आम्ही प्रसिद्धीस सुरुवात केली होती, असेही ते म्हणाले.