‘शोला जो भडके दिल मेरा धडके… दर्द जवानी का सताये बढबढ के’ म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर चित्रपट येऊ घातला आहे. भगवान आबाजी पालव म्हणजेच भगवान दादा यांचा जीवनपट ‘एक अलबेला’… गेले कित्येक दिवस विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे. या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन… ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

बऱ्याच यशस्वी हिंदी चित्रपटांचे यश गाठीला घेऊन ‘दगडी चाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मंगलमूर्ती फिल्म्स ही चित्रसंस्था ‘एक अलबेला’ हा जीवनपट घेऊन येत आहे. प्रसिध्दीपासून लांब असलेल्या या नटाची जादू प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल असा आशावाद मंगलमूर्ती फिल्म्स च्या संगीता अहिर यांनी व्यक्त केला. तर भगवान दादांसारख्या दिग्गज कलाकाराचा जीवनपट आताच्या पिढीसमोर उलघडण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदी असल्याचे त्या म्हणाल्या. शेखर सरतांडेल यांच्या दिग्दर्शनाने सजलेला ‘एक अलबेला’ चित्रपट येत्या २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.