‘व्हिडीओ पॅलेस’चे नानुभाई सिंघानिया यांची निर्मिती असलेला समीर कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ हा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. दोन लहान भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाचे भावविश्व यात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तामिळ चित्रपट ‘काका मुथाई’चा हा रिमेक असला तरी चित्रपटाची संपूर्ण कथा आणि वातावरण मराठी संस्कृती, भावविश्वाशी निगडित आहे. ‘हाफ तिकीट’चे निर्माते नानुभाई सिंघानिया, दिग्दर्शक समीर कक्कड, प्रमुख अभिनेत्री प्रियांका बोस आणि हा संपूर्ण चित्रपट ज्या दोन लहान मुलांवर आधारित आहे ते बालकलाकार शुभम मोरे, विनायक पोतदार यांनी नुकतीच ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटाबाबत चर्चा केली. त्या गप्पांचा वृत्तान्त..

‘प्रेक्षक स्वीकारतील’
‘काका मुथाई’हा तामिळ चित्रपट पाहिला होता. लहान मुलांचे भावविश्व साकारणारा हा चित्रपट मला आवडला. हा चित्रपट मराठीत आला पाहिजे, असा विचार तेव्हाच मनात आला. वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट मराठीत केला तर त्याला सुजाण प्रेक्षकांचा नक्कीच प्रतिसाद मिळेल, याचा विश्वास आहे. सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक होती ती दोन लहान मुले. कारण हा संपूर्ण चित्रपट केवळ आणि केवळ या दोन मुलांना केंद्रस्थानी ठेवूनच तयार करण्यात आला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या किंवा ज्यांचे चेहरे प्रेक्षकांना माहिती आहेत, असे बालकलाकार आम्हाला नको होते. पाचशेहून अधिक मुलांमधून शुभम व विनायक या दोघांची निवड केली. या दोघांनीही खूप छान काम केले आहे. येत्या २२ जुलै रोजी हा चित्रपट मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही प्रदर्शित करत आहोत. त्यानंतर लगेचच हा चित्रपट परदेशात कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई व अन्य ठिकाणीही प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चित्रपट कितीही चांगला व आशयपूर्ण असला तरी तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही तर काहीच फायदा नाही. त्यामुळे चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी आणि विपणन (मार्केटिंग) होणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी चित्रपट निर्मात्यांनी याकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. ‘हाफ तिकीट’ हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित असला तरीही प्रेक्षक त्याचा स्वीकार करतील. -नानुभाई सिंघानिया

‘काम करताना खूप मजा आली’
‘काका मुथाई’ हा तामिळ चित्रपट आम्ही पाहिलेला नाही आणि ‘हाफ तिकीट’ची संपूर्ण कथा काय आहे, तेही आम्हाला सांगितलेले नाही. चित्रपटासाठी आमची निवड झाल्यानंतर जी कार्यशाळा घेण्यात आली त्याचा आम्हाला दोघानाही खूप फायदा झाला. चित्रपटात आम्ही दोघे एकमेकांचे भाऊ आहोत. दोन भावांमधील जवळीक, प्रेम निर्माण करण्यासाठी कार्यशाळेत एकत्र काम केल्याचा फायदा झाला. चित्रीकरणाच्या निमित्ताने मुंबईतील विविध झोपडपट्टय़ा व अन्य काही भागात जाणे झाले. झोपडपट्टीमधील लोक कसे राहतात, त्यांचे जीवन कसे असते हे जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाले. काम करताना खूप मजा आली. समीर काकांनी आमच्याकडून छान काम करवून घेतले आहे. – विनायक व शुभम

मुलांच्या भावविश्वाचे ‘हाफ तिकीट’!
‘चांगल्या विषयाला भाषेचे बंधन नसते’
‘काका मुथाई’हा तामिळ चित्रपट पाहिला आणि भारावून गेलो. लहान मुलांचे भावविश्व रेखाटणारा हा चित्रपट भारतातील विविध प्रादेशिक भाषेत तयार करता येऊ शकतो, असे वाटले. हा विषय मराठीत यावा, असे माझ्या मनात आले. नानुभाई आणि मी चित्रपटाच्या तयारीला लागलो. नानुभाई निर्माते व मी दिग्दर्शन अशी जबाबदारी निश्चित केली. ‘हाफ तिकीट’हा मूळ तामिळ चित्रपटाचा रिमेक असला तरी मराठीत तो आणताना त्यात काही बदल केले आहेत. मराठी वातावरण, संस्कृती त्यात आणली आहे. अर्थात हे करत असताना मूळ चित्रपटाच्या आशयाला व गाभ्याला धक्का लागणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. ही कथा झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कुटुंबाची, विशेषत: कुटुंबातील लहान दोन सख्खे भाऊ, त्यांची आई व आजी यांची आहे. चित्रपटातील दोन बालकलाकारांची निवड, चित्रीकरण स्थळे, अन्य कलाकार आणि अन्य बाबी या सगळ्यात सुमारे चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागला. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली. बालकलाकारांची निवड करण्यासाठी अनेक मुलांचा शोध घेतला व शेवटी शुभम, विनायक यांची निवड केली. अत्यंत नैसर्गिक अभिनय या दोघांनी केला आहे. त्यांची आकलनशक्ती चांगली असल्याने त्यांच्याकडून काम करवून घेणे सोपे गेले. चित्रपटातील दोन मुलांच्या आईच्या भूमिकेसाठी बंगाली अभिनेत्री प्रियांका बोस हिचेच नाव डोळ्यासमोर होते. ‘ओस’या चित्रपटात तिने केलेले काम मी पाहिले होते. त्या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग माझ्या लक्षात होता. त्यामुळे ही भूमिका प्रियांकाच करणार हे नक्की झाले. भूमिकेसाठी प्रियांकाने मराठी भाषेचा अभ्यास केला असून केतकी सराफ यांच्याकडे झालेल्या कार्यशाळेचाही तिला भूमिकेसाठी खूप फायदा झाला आहे. ‘हुप्पा हुय्या’चा निर्माता आणि ‘आयना का बायना’चा दिग्दर्शक म्हणून या अगोदर मराठीत काम केले आहे. आता ‘हाफ तिकीट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. – समीर कक्कड

‘हाफ तिकीट’ माझ्यासाठी आव्हान’
चित्रपटातील आपले काम आणि भूमिका लक्षात ठेवून मराठी चित्रपटासाठी आपल्या नावाचा विचार होतो व ती भूमिका मिळते ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. गेल्या काही वर्षांत मराठीत खूप चांगले चित्रपट तयार होत असून प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘हाफ तिकीट’च्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहे. यानिमित्ताने मला नवीन भाषा शिकायला मिळाली. नव्या संस्कृतीशी ओळख झाली. ‘हाफ तिकीट’ हा चित्रपट माझ्यासाठी एक आव्हान होते. मला मिळालेली संधी मी स्वीकारली. मराठीत काम करण्याचा हा अनुभव खूप छान होता. मलाही खूप शिकायला मिळाले. –प्रियांका बोस
संकलन- शेखर जोशी,