वर्षांचे शुक्रवार आणि त्यात सरासरी किती चित्रपट प्रदर्शित होऊ शकतील, याची गणितं मांडण्यात हिंदीतील अनेक बडे निर्माते दिवस-रात्र खपत असतात. किमान वर्षभर आधी चित्रपट प्रदर्शनाचे नियोजन करूनही त्यांची फसगत होते आणि चित्रपटाचा तिकीटबारीवरचा धंदा गडबडतो. गेल्या वर्षीपासूनच फरहान अख्तर, शाहरूख खान यांच्यासह अनेक कॉर्पोरेट निर्मात्यांनी याचा गांभीर्याने विचार सुरू केला असताना मराठीत मात्र तारखा आणि एकाच वेळी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची गर्दी हे चित्र काही बदलायला तयार नाही. जुलै महिन्यातील चार आठवडय़ात मिळून ११ मराठी चित्रपटांची तौबा गर्दी झाली आहे. हिंदीचा आठवडय़ाला एक किंवा दोन असे चित्रपट असताना मराठी चित्रपट मात्र दर आठवडय़ाला दोन ते तीन या गणिताने प्रदर्शित होत आहेत..

दोन मोठे किंवा एक मोठा आणि दुसरा छोटा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तरी व्यवसायाचं गणित बिघडतंच हा धडा आता मोठा मार खाऊन हिंदीतील कलाकारांनी घेतला आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटांसाठी फक्त सणावारांच्या मुहूर्तावर अवलंबून न राहता र्सवकष विचार करून नियोजन करण्यावर त्यांचा भर वाढतो आहे. त्यामुळेच गेल्या महिन्या-दोन महिन्यात शाहरूखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटापासून ते बोनी कपूर निर्मित ‘मॉम’, श्रद्धा कपूरचा ‘हसीना’ अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल केले गेले आहेत. हिंदीतील हा अनुभव ताजा असताना मराठीत मात्र यापैकी कसलाही विचार न करता, चित्रपट तयार झाला की कर प्रदर्शित या एकाच विचाराने प्रदर्शन सुरू आहे. जूनमध्ये सलमानचा ‘टय़ुबलाईट’ प्रदर्शित होणार या भीतीने एक आठवडा आपल्या नियोजनातून काढून टाकत तब्बल ११ चित्रपट जुलैमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हातघाईवर आले आहेत.

गेली दोन वर्षे राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही प्रदर्शित होऊ न शकलेला मकरंद मानेचा ‘रिंगण’ या जूनच्या अखेरीस शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. सुदैवाने त्याला हिंदी चित्रपटाची स्पर्धा नाही. मात्र त्याच दिवशी ‘अंडय़ाचा फंडा’ हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे. पाठोपाठ ७ जुलैला विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘कण्डिशन्स अप्लाय’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. गमतीचा भाग म्हणजे या दोन्ही चित्रपटांचा नायक सुबोध भावे आहे. याच दिवशी हिंदीत ‘मॉम’ आणि हॉलीवूडचा ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने तिकीटबारीवर चांगलेच युद्ध रंगणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘काय रे रास्कला’ आणि ‘लपाछुपी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असून हिंदीत कतरिना-रणबीरचा बहुप्रतीक्षित ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाय, ‘वॉर फॉर द प्लॅनेट अ‍ॅप्स’ हा हॉलीवूडचा यशस्वी फ्रँचाईझीपटही त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यातल्या त्यात तिसऱ्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘मांझा’ आणि ‘बसस्टॉप’ला हिंदी ‘मुन्ना मायकेल’ची एकमेव स्पर्धा असणार आहे. शेवटच्या आठवडय़ात तर ‘शेंटिमेंटल’, ‘मला काही प्रॉब्लेम नाही’ आणि ‘तू भेटली पुन्हा’ या तीन मराठी चित्रपटांची तिकीटबारीवर मारामारी असताना हिंदीत ‘मुबारकान’ हा बिग बजेट, विनोदी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

एकाच वेळी तिकीटबारीवर होणारी ही गर्दी टाळता येणे शक्य आहे का? यावर ते शक्य असूनही कित्येकदा निर्मात्यांकडून त्याचा विचार केला जात नाही, असे जनसंपर्क अधिकारी विनोद सातव यांनी सांगितले. अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘शेंटिमेंटल’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार हे आधीच जाहीर झाले होते. मात्र त्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे आधी १४ तारखेला प्रदर्शित होणारा ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला. आणि २८ जुलै हीच त्याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर ‘तू भेटलीस पुन्हा’चीही यात भर पडली. हे चित्रपट पुढे ढकलायचे तर त्यांना ऑगस्टच्या तिसऱ्या-चौथ्या आठवडय़ापर्यंत थांबावे लागले असते. कारण ४ ऑगस्टला शाहरूखचा चित्रपट आणि ११ ऑगस्टला अक्षयकुमारचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ असल्याने निर्मात्यांनी     थांबण्यापेक्षा २८ जुलैलाच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. एकीकडे हिंदीत फरहान अख्तरने ‘रईस’ला चांगली ओपनिंग मिळावी म्हणून सहा महिने चित्रपट पुढे ढकलला होता आणि तरीही त्यांना चित्रपटांची टक्कर टाळता आली नाही. पण मराठीमध्ये चित्रपटांच्या प्रदर्शनाबद्दल पुरेसे नियोजन केले जात नाही, त्याच्या व्यवसायाबद्दल गांभीर्याने विचार केला जात नाही, हाच मुद्दा वितरकांकडून वारंवार पुढे येतो.

मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये सामोपचाराने निर्णय घेण्यापेक्षा ‘माझ्या चित्रपटापेक्षा दुसरा कोणी मोठा नाही’ ही वृत्ती जास्त दिसून येते. त्यामुळे चित्रपटाचे नुकसान समोर दिसत असूनही कित्येकदा निर्णय बदलले जात नाहीत, अशी माहिती वितरक सनी चंद्रमणी यांनी दिली. अनेक चित्रपट निर्माते जे नवीन आहेत त्यांना चित्रीकरणाची बाजू माहिती असते. मात्र पोस्ट प्रॉडक्शनला किती वेळ लागतो, त्यानंतर वितरणाची व्यवस्था कशी आहे, याबद्दल काहीच माहिती नसते. अभ्यास करायचीही त्यांची तयारी नसते. जुलैचाच विचार केला तर १४ तारखेला ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र प्रियांकाने ‘काय रे रास्कला’ १४ जुलैला प्रदर्शित करणार हे जाहीर केल्यानंतर समीरचा चित्रपट २८ जुलैला आला. समीर पाटील, समीर विद्वांस, चंद्रकांत कणसे ही मराठीतील मातबर दिग्दर्शक मंडळी असतानाही ते आपल्या निर्मात्यांना समजावू शकत नाहीत आणि हे एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करतात, असेही चंद्रमणी यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी, हिंदीप्रमाणे मराठी निर्मात्यांनीही चित्रपटाची पूर्वनोंदणी करतानाच प्रदर्शनाची तारीखही द्यावी, अशी सक्ती करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने घेतला होता. मात्र तो अजून अमलात आणलेला नाही. दुसरं म्हणजे हिंदीत काही साइट्स नियमितपणे वर्षभरातील हिंदी चित्रपटांच्या तारखा सातत्याने उपलब्ध करून देतात. तशी कोणतीही सोय मराठी चित्रपट निर्मात्यांकडे नसल्याने अशी व्यवस्थाच विकसित झालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कधी कधी मोठा चित्रपट असूनही तो चालला नाही, तर तो काढून अन्य चालणाऱ्या चित्रपटांना शोज वाढवून मिळतात. मात्र अर्थात मार्केटच्या या घडामोडींवरही लक्ष ठेवावे लागते, असे या व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या असा फायदा जूनच्या पहिल्या आठवडय़ाच प्रदर्शित झालेल्या वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘मुरांबा’ या चित्रपटाला मिळतो आहे. ‘टय़ुबलाईट’ सलमानचा चित्रपट असल्याने त्याची चित्रपटगृहांवरची मक्तेदारी पाहता अन्य कोणत्याही चित्रपटाला स्क्रीन्स मिळाल्या नसत्या. ‘मुरांबा’ या चित्रपटाचा चौथा आठवडा सुरू झाला आहे पण सलमानच्या चित्रपटामुळे आमचा चित्रपट चौथ्या आठवडय़ातच उतरवावा लागेल, अशी भीती वाटत होती. प्रत्यक्षात, ‘टय़ुबलाईट’ला अपेक्षित प्रतिसाद नसल्याने आम्हाला शोज वाढवू का? अशी विचारणा चित्रपटगृहांकडून झाली. आता ‘मुरांबा’चे २५ शोज वाढले असून पुढच्या आठवडय़ात हाच आकडा शंभपर्यंत जाण्याची शक्यता असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते निनाद वैद्य यांनी दिली. चित्रपटाचा आशय चांगला असेल तर त्याच्यासमोर कितीही मोठा चित्रपट आला तरी त्याचा प्रेक्षकवर्ग कमी होत नाही. पण त्यासाठी वितरणाची ही गणितं समजून घेऊन त्यानुसार प्रदर्शनाचे नियोजन करणे हा एकमात्र उपाय आहे. मराठी चित्रपटांच्या बाबतीत हा उपाय माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याबाबतीत ठोस नियोजनाचे भिजते घोंगडे आजही तसेच असल्याने मराठी चित्रपटांच्या नफ्यापेक्षा नुकसानीचाच आकडा वाढता आहे.