मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृतींवर आधारित चित्रपट याआधीही प्रदर्शित झाले आहेत. शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपटही ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार दिवंगत जयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचे  वैशिष्टय़ म्हणजे हा चित्रपट कृष्णधवल असून चित्रपटाशी संबंधित तीनजण वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाइमपास’ या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव, दूरचित्रवाहिन्यांवरील ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ व अन्य लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेता प्रसाद ओक या तिघांनीही त्यांच्या भूमिका ‘कच्चा लिंबू’साठी बदलल्या आहेत. रवी जाधव यांनी अभिनेता, मंदार देवस्थळी यांनी निर्माता तर प्रसाद ओक यांनी दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे.

आपल्या नव्या खेळीविषयी बोलताना प्रसाद ओक म्हणाले, खरे सांगायचे तर मी मुंबईत दिग्दर्शक होण्यासाठी आलो होतो. अभिनयाची संधी मिळाली आणि पुढची काही वर्षे नाटक, मालिका आणि चित्रपटांतून अभिनयातच व्यग्र राहिलो. नाही म्हणायला मी व पुष्कर श्रोत्री आम्ही दोघांनी ‘हाय काय नाय काय’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नंतर मात्र पुन्हा एकदा अभिनयातच गुंतलो. पण दिग्दर्शक व्हायचा विचार डोक्यातून गेला नव्हता.  ती संधी मंदार देवस्थळीमुळे चालून आली. निर्मिती क्षेत्रात यायचा विचार करतो आहे. काही चांगली संहिता आहे का?, असे त्याने विचारले. माझ्याकडे ‘कच्चा लिंबू’ तयार होतेच. त्याला त्याविषयी सांगितले आणि त्यालाही ‘कच्चा लिंबू’ची कथा आवडली.

दळवी यांच्या साहित्यकृतीवर चित्रपट तयार करावा, असे का वाटले? यावर ओक यांनी सांगितले, काही वर्षांपूर्वी दळवी यांचे सुपुत्र गिरीश यांची भेट झाली होती तेव्हा त्यांनी ‘ऋणानुबंध’ कादंबरीविषयी सांगितले. या कादंबरीवर चित्रपट झाला तर मला आवडेल असे सांगून त्यांनी ही कादंबरी मला वाचायला दिली. कादबंरी वाचली आणि पूर्णपणे झपाटून गेलो. चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी एका निर्मात्याने उचलली होती. चित्रपटाच्या पटकथेवर मी आणि चिन्मयने काम केले. पण काही कारणाने तो निर्माता चित्रपट निर्मितीपासून दूर झाला. पुढे मंदारने निर्मितीच्या क्षेत्रात उतरणे, मला विचारणा करणे आदी सर्व योग जुळून आले आणि यातून आमच्या सगळ्याचा ‘कच्चा लिंबू’ साकारला.

रवी जाधव यांनी सांगितले की, मी कधी अभिनेत्याच्या भूमिकेत शिरेन असे वाटले नव्हते. प्रसादचा मला दूरध्वनी आला आणि तुला एक गोष्ट ऐकवायची आहे असे म्हणाला. ती  संपूर्ण गोष्ट ऐकली, मलाही आवडली. यात मी कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो? असे प्रसादला विचारले असता त्याने तुला या चित्रपटात अभिनय करायचा आहे, असे तो म्हणाला. मला वाटले चित्रपटातील एखाद्या छोटय़ा भूमिकेसाठी त्याने विचारले असेल. पण चित्रपटातील ‘मोहन काटदरे’ ही मुख्य भूमिका तू करायची आहेस असे सांगून त्याने धक्काच दिला. मी विचार करून सांगतो असे त्याला सांगितले. त्या दहा दिवसांत मी स्वत:ला चाचपून पाहिले. अभिनय करणे आपल्याला जमेल व पेलेल का? या भूमिकेला न्याय देऊ शकू का?, असे प्रश्न स्वत:लाच विचारले सुरुवातीला भीती वाटत होती. पण अभिनयाचे हे आव्हान पेलण्याचे ठरविले आणि माझा होकार कळविला.

‘कच्चा लिंबू’ची निर्मिती ज्यांनी केली ते निर्माता मंदार देवस्थळी म्हणाले, २०१३ मध्ये मी स्वत:ची निर्मिती संस्था सुरू केली. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका आमच्याच निर्मिती संस्थेची. जानेवारी २०१६ मध्ये चित्रपटाची निर्मिती करावी, असा विचार मनात आला. प्रसाद माझा चांगला मित्र आहे. एकदा गप्पांमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार मी त्याला बोलून दाखविला आणि एखादी चांगली गोष्ट, पटकथा असेल तर पाहा, असे त्याला सांगितले. त्यावर प्रसादने त्याच्याकडे चांगली पटकथा असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी थेट ती ऐकवली. पटकथा-संवादासह संहिताही तयार होती. जयवंत दळवी यांच्या साहित्यकृतीवरील ती गोष्ट ऐकल्यानंतर मलाही ती आवडली आणि माझ्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ‘कच्चा लिंबू’ निश्चित केले.

चित्रपटाची पटकथा व संवाद अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचे असून संगीतकार राहुल रानडे आहेत. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, अनंत महादेवन आदी कलाकार चित्रपटात आहेत.

कुठलीही निर्मिती करताना माझा भर हा गुणवत्तेवर असतो. जयवंत दळवी यांच्यासारख्या कसदार लेखकाच्या साहित्यकृतीवर असलेला हा चित्रपट चांगला होईलच याची खात्री होती. चित्रपट निर्मितीकडे केवळ गल्ला किंवा व्यवसाय म्हणून मी पाहात नाही. तुम्ही जर कसदार आणि चांगली कलाकृती सादर केली तर विषय कोणताही असला तरी सुजाण मराठी प्रेक्षक त्याला चांगला प्रतिसाद देतात हा विश्वास होता. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना सामाजिक बांधिलकी या नात्याने एक संवेदनशील विषय समाजापुढे यावा, या उद्देशाने व्यवसाय म्हणून न पाहता गंभीर विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले.

मंदार देवस्थळी

चित्रपट कृष्ण-धवल रंगात असून तो केवळ गंमत किंवा काहीतरी वेगळे करायचे म्हणून केलेला नाही. तर त्यामागे ठोस विचार आहे. चित्रपटाचे नायक-नायिका असलेल्या ‘त्या’ आई-वडिलांचे आयुष्य रंगहीन झालेले आहे. त्या रंगहीन आयुष्यासाठी  चित्रपट कृष्ण-धवल रंगात केला आहे. चित्रपटातील त्यांचा भूतकाळ (फ्लॅश बॅक) फक्त रंगीत दाखविला आहे. दिग्दर्शनाचा अनुभव खूपच छान होता. गेल्या अनेक वर्षांपासून जे स्वप्न उराशी बाळगले होते ते आज पूर्ण झाले आहे. माझ्याकडून मी सर्वतोपरी प्रयत्न आणि मेहनत घेतली आहे.

प्रसाद ओक

दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही वेगळ्या व तेवढय़ाच आव्हानात्मक गोष्टी आहेत. इथे माझ्याऐवजी प्रसाद ‘अ‍ॅक्शन’ म्हणणार होता आणि मला फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करायचे होते. अभिनेता असलेल्या प्रसादसाठी आणि दिग्दर्शक असलेल्या माझ्यासाठी या नव्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. ‘कच्चा लिंबू’च्या निमित्ताने उत्तम गोष्ट आणि एक चमू जुळून आला. यापुढे अभिनय करण्याची चांगली संधी मिळाली आणि मला नाही म्हणताच येणार नाही अशी वेळ येईल तेव्हा अभिनय करण्याची ती संधी नक्की स्विकारेन.

रवी जाधव