परस्परांत समन्वय नसल्यामुळे पुरस्कारप्राप्त ‘कासव’, ‘हलाल’च्या वाटय़ाला कमी खेळ

मराठी चित्रपटांची वाढती संख्या, निर्माते-वितरक-दिग्दर्शक यांच्यात चित्रपट प्रदर्शनासाठी अपेक्षित असलेला सहकार्य आणि संवादाचा अभाव यामुळे चांगले मराठी चित्रपट येऊनही ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. अगदी राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटांनाही प्रदर्शनासाठी वर्ष-दोन वर्षे वाट पाहूनही तिकीटबारीवर आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. सध्या असा फटका एकाच वेळी सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्याने राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या ‘कासव’ या चित्रपटाला बसला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा असूनही मुंबईत एकच शो असल्याने प्रेक्षक चित्रपटापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ‘कासव’प्रमाणेच ‘हलाल’ आणि ‘द सायलेन्स’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवातून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या चित्रपटांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे.

‘कासव’ हा राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट असल्याने साहजिकच या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. मात्र गेल्या शुक्रवारी ‘कासव’, ‘हलाल’, ‘द सायलेन्स’, ‘निर्भया’, ‘भविष्याची ऐशीतैशी’, ‘आदेश’ आणि ‘लादेन आला रे’ असे सात मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. त्याच वेळी हिंदीतही चित्रपटांची संख्या जास्त असल्याने ‘कासव’ला मुंबईत शो मिळाले नाहीत. मुंबईत फक्त ‘सिटीलाईट’ चित्रपटगृहात ‘कासव’चा एकच शो उपलब्ध होता. एकाच वेळी इतके मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्याने तुम्हाला शोज देता येणार नाहीत, असे वितरक-प्रदर्शकांकडून सांगण्यात आले, अशी माहिती ‘कासव’चे दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी दिली.

मात्र ‘कासव’च्या मुंबईसह पुणे आणि उर्वरीत महाराष्ट्रातील खेळांनी हाऊसफुल्ल गर्दी गाठल्यानंतर ‘सिटीलाइट’मध्ये या चित्रपटाला दोन शो देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारपासून हा चित्रपट जास्त खेळांसह मुंबईत प्रदर्शित होईल, असा विश्वास सुकथनकर यांनी व्यक्त केला.

असाच अनुभव ‘हलाल’चे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनाही आला. ‘आम्ही खरे म्हणजे २९ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र चित्रपटाला झालेला विरोध आणि प्रदर्शनासाठी पोलीस संरक्षण मिळवेपर्यंत वेळ लागल्याने ६ ऑक्टोबर ही तारीख निवडावी लागली. पण तेव्हाही त्या तारखेला ‘कासव’ वगळता अन्य मराठी चित्रपट नव्हते. चित्रपट प्रदर्शनाच्या आठवडय़ाआधी मात्र अचानक सगळेच चित्रपट आले. त्याचा फटका सर्वानाच बसला,’ असे पाटील म्हणाले.हिंदीत मोठमोठे निर्माते, कलाकार चित्रपटाच्या धंद्याची खात्री देऊ शकतात.

आमच्यासारख्या लहान चित्रपटांच्या दिग्दर्शकाला ते करता येत नाही. अशावेळी  पुरस्कार मिळवण्यासाठी दिग्दर्शक चित्रपट करतात, असा प्रेक्षकांचा गैरसमज होतो. वस्तुस्थिती तशी नाही. ‘कासव’ला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्यानंतर वितरक-प्रदर्शकांनी शोज वाढवू असे सांगितले. पुरस्कारविजेत्या चित्रपटांसाठी मनोरंजन वाहिन्या किंवा वितरक का प्रयत्न करत नाहीत, असा सवाल सुकथनकर यांनी केला.