संगीतातील दोन मातबर घराणी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन सूरश्रींमध्ये रंगलेला गानसंघर्ष १९६७ साली ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर रसिकांना पाहायला मिळाला. या नाटकाची अभिजातता, त्याची गाणी याचे कवतिक पिढय़ान् पिढय़ा ऐकायला मिळाले असले तरी या अस्सल कलाकृतीची जादू तब्बल चार दशकांनंतर नव्या माध्यमातून अनुभवायला मिळेल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. त्यामुळेच की काय एरव्ही दोन-तीन आठवडय़ांपुढे न जाऊ शकणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये शंभर दिवस रसिकांच्या काळजात घर करणारा ‘कटय़ार काळजात घुसली’ हा नव्या काळातील पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
गेल्या वर्षीच्या दिवाळीत प्रदर्शित झालेल्या सुबोध भावे दिग्दर्शित ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाने शंभर दिवस पूर्ण केले आहेत. शास्त्रीय संगीत आणि रागदारीसारखा विषय घेऊन आलेला हा चित्रपट रसिकांनी उचलून धरला. त्यामुळे या चित्रपटाने आज जे यश पाहिले आहे त्याचे श्रेय प्रेक्षकांना जाते, अशी भावना दिग्दर्शक, अभिनेता सुबोध भावे यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली. ‘झी स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाने शंभर दिवस आपले प्रेक्षक टिकवून ठेवले आहेत. अजूनही लोकांना हा चित्रपट वारंवार पाहायची इच्छा आहे. म्हणजे शंभर दिवस चित्रपटगृहांमधून ‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट पाहायला मिळतो आहे याचे जेवढे कौतुक वाटते त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षकांनी या चित्रपटाची कित्येक पारायणे केली आहेत त्याचे नवल वाटते. या चित्रपटाला मिळालेले यश हे मराठी चित्रपटांसाठी अभिमानाचे आणि सकारात्मक संदेश देणारे ठरले आहे, असे सुबोधने सांगितले. साडेतीन वर्षे या चित्रपटावर काम सुरू होते. तुम्ही जेव्हा प्रचंड मेहनतीने, अभ्यासाने असा वेगळा विषय मांडू पाहता तेव्हा प्रेक्षकांकडूनही तुम्हाला तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो हे या चित्रपटाला मिळालेल्या यशाने सिद्ध झाले आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटकच मुळात त्या ताकदीचे होते, पंडित जितेंद्र अभिषेकींचे संगीत असलेली गाणी हे या नाटकाचे बलस्थान आहे. चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय आणि ती गाणी पुन्हा एकदा लोकांसमोर आली.