डॉक्टरांसमोर बसलेला नायक त्यांना आपली विचित्र मानसिक स्थिती समजावून देतो आहे. आपल्या मानसिकतेची विचित्रता किती खोल आहे हे तो डॉक्टरांना सांगू शकत नाही. आपल्या मनाचा तळ लागू न देता तो डॉक्टरांना आपण काही तरी विचित्र वागतो आहोत हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो आहे. डॉक्टर अर्थातच त्या हातच्या राखलेल्या विचित्रतेशी अवगत नसल्याकारणाने त्याला सामान्य माणसाप्रमाणेच वागवतात. डॉक्टरांचं ‘हे’ उत्तर आपल्यासाठी नाही म्हणून आणखीनच विमनस्क झालेल्या नायकाला आणखी एक माणूस भेटतो. मात्र तो जे सांगतो आहे ते नायकाच्या विचित्र मानसिकतेपेक्षाही भयंकर आहे त्यामुळे तेही नाही.. म्हणून तो तिथूनही धावत सुटतो. अशा गोंधळलेल्या मनाचा ‘कौल’ काय असेल, या विचारापर्यंतही पोहोचू नका कारण दिग्दर्शकाला जो अभिप्रेत आहे तो ‘कौल’चा अर्थ वेगळाच आहे.

[jwplayer zOGMZ9UX]

नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट किंबहुना एक विचारबीज माझ्याकडे आहे. ते सिनेमाच्या भाषेतून मांडताना त्याची नेमकी गोष्ट कशी सांगायची, याचं स्वातंत्र्यही मला आहे. आशय आणि मांडणीचं पुरेपूर स्वातंत्र्य घेत दिग्दर्शक आदिश केळुस्करने ‘कौल’ हा एक वेगळा सिनेमॅटिक प्रयोग केला आहे. ‘कौल’ची ठरावीक एक अशी गोष्ट नाही. त्याचा नायक अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेतून त्याच्या हातून नको ती गोष्ट घडली आहे की, जे घडलं आहे त्यामुळे तो अस्वस्थ आहे. नायकाच्या मनातील हा गोंधळ हळूहळू जाणीवपूर्वक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, यासाठी चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून दिग्दर्शकाने सातत्याने वेगळे अँगल, वेगवेगळी कम्पोझिशन्स आणि त्याच्या जोडीला आवाजांवर असलेला भर यातून कथा पुढे नेली आहे. कथेला अर्थातच कोकणाची जोड असल्याने तिथल्या वातावरणाचाही दिग्दर्शकाने चित्रपटात एखाद्या गूढ व्यक्तिरेखेसारखा वापर करून घेतला आहे. पण असं असूनही ‘कौल’ प्रभावी ठरत नाही. मुळात या चित्रपटाची सुरुवातीची फ्रेम आणि त्यातल्या नायकाचं वागणं पाहिल्यानंतर अनुराग कश्यपच्या याच वर्षी येऊन गेलेल्या ‘रामन राघव’ची हटकून आठवण येते. मात्र इथे रामनची वृत्ती ही मानसिक आजाराच्या रूपात पहिल्यांदा समोर येते. आपल्या विचित्र वागण्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होऊ नये, याची धडपड ‘कौल’चा नायक (रोहित कोकाटे) करतो आहे. त्याच्या सजग मनाचं आणि त्यावर हावी होऊ पाहणाऱ्या या अदृश्य, हिंसक मनाचं द्वंद्व सुरू आहे. याची जाणीव आपल्याला होते, इथपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतर नायकाच्या आयुष्यात येणाऱ्या बाबांच्या निमित्ताने या वृत्तीलाच तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

माझ्या मनातील अस्वस्थता किंवा माझ्या हातून घडणाऱ्या गोष्टी बऱ्या-वाईट ठरवण्याचा अधिकार कोणाचा, मी जी गोष्ट चांगली म्हणून केली त्याचा परिणाम उद्या वाईट होऊ शकतो. आणि ज्याचा वाईट म्हणून विचार केला होता ती मुळात तशी नसूही शकते. त्यामुळे हे बरं की वाईट कसं आणि कोण ठरवणार, हा जगाला सतावणारा चिरंतन प्रश्न आहे. त्यातून अनेक संत-विचारवंत, प्रेषित जगभरात जन्माला आले, त्यांनी आपापल्या पद्धतीने याची उत्तरं शोधली, त्यांच्या उत्तरातून पुढे आलेल्या विचारांचे पंथ झाले आणि ज्याने त्याने आपापल्या मानसिकतेनुसार अमुक एका पंथाचा स्वीकार केला किंवा कुठलाच पंथ न स्वीकारता जे आलं ते आयुष्य जगत राहिले. या वास्तवावर बोट ठेवताना दिग्दर्शकाने ते एका अर्थाने शब्दबंबाळ केलं आहे. त्यामुळे आपल्याच शब्दांच्या जाळ्यात दिग्दर्शक अडकला आहे की काय, असा विचार सतत डोकं वर काढत राहतो. ‘कौल’ हा शब्द इथे परमेश्वराने किंवा निसर्गशक्तीने दिलेला संदेश या अर्थाने चित्रपटात येतो. जगात टोकाचं वागणाऱ्यांना वेडं ठरवून समाज मोकळा होतो. मात्र ते सगळेच वेडे नसतात, मानसिक आजारी नसतात. त्यांना तसे संदेश मिळत असतात, त्यातून ते घ्यायचं की नाही, काय घ्यायचं हा कौल ज्याचा त्याला घ्यावा लागतो.

एक वेगळा विचार म्हणूनच या चित्रपटाच्या मांडणी आणि प्रयोगाकडे पाहायला हवं. दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्या प्रयत्नात आदिश केळुस्कर यांनी इतकं मोठं आव्हान स्वीकारलं या धाडसाचं कौतुकच आहे. पण प्रत्येक गोष्ट वेगळी करायची या अट्टहासाने हे कथेपासून मांडणीपर्यंतचं तंत्र स्वीकारलं आहे हे पदोपदी जाणवत राहतं. त्यामुळे कुठे तरी त्याचा प्रभावी परिणाम न होता कुठे तरी तो एकसुरी, निरस होत जातो. चित्रपटाचं संकलन चांगल्या पद्धतीने झालेले नाही. रोहित कोकाटे आणि दीपक परब या दोन व्यक्तिरेखा सोडल्या तर डॉक्टर आणि नायकाची पत्नी यांचे निर्विकार चेहरे आणखीनच रसभंग करतात. दिग्दर्शकाच्या कल्पनेनुसार अनेक वेगळे अँगल कॅमेरामन अमेय चव्हाणने वापरले आहेत. उलटा कॅमेरा ठेवून वेगाने पुढे सरकणारी वरची दृश्ये असतील किंवा ज्या ठिकाणी बाबा नायकाला पहिल्यांदा भेटले त्या डोंगराला चित्रपटाचा भाग बनवण्याची किमया त्याने कॅमेऱ्यातून साधली आहे. मात्र या फ्रेम्स किती काळ पाहणाऱ्याच्या समोर असाव्यात, एकच एक दृश्य कि ती मिनिटांचं असावं याचं फारसं गणित दिग्दर्शकानं बांधलेलं नाही. ते जाणूनबुजून वापरलेलं नसेल तरी चित्रपटाचा अपेक्षित परिणाम यातून साधला गेलेला नाही हेही तितकंच खरं आहे. हा आवाजांचा चित्रपट आहे. त्यामुळे आवाजाच्या तंत्राचा चांगला वापर चित्रपटासाठी केला गेला आहे. पण कथाविषयातला गोंधळ आणि कुठे तरी सगळीच मांडणी प्रायोगिक करण्याचा अतिरेक यामुळे पाहणाराही साहजिकच हेही नाही आणि तेही नाही.. या संभ्रमापर्यंत पोहोचतो. अर्थात, दिग्दर्शकाला हाच कौल अपेक्षित असू शकतो.

‘कौल’

दिग्दर्शक– आदिश केळूस्कर

कलाकार– रोहित कोकाटे, दीपक परब, मकरंद काजरेकर, सौदामिनी टिक ले, अभय खडपकर, मंगेश केळुस्कर.

[jwplayer kDLYstr7]