कलाविश्वामध्ये सध्या स्टारकिड्सची चलती आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलांचं कलाविश्वामध्ये पदार्पण झालं आहे. इतकंच नाही तर अनेकांना आपल्या मुलांच्या डेब्युसाठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. परंतु पहिल्यांदाच एका मुलाने आपल्या वडिलांसाठी चित्रपटाची निर्मिती केल्याचं पाहायला मिळालं.

‘खिचिक’ चित्रपटाचे निर्माता सचिन धकाते यांनी वडील अनिल धकाते यांच्यासाठी चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटामध्ये अनिल धकाते यांची महत्वाची भूमिका असणार आहे. विशेष म्हणजे केवळ वडिलांची इच्छा आणि आवड जोपासण्यासाठी सचिन धकाते यांनी हा निर्णय घेतला. अनिल धकाते हे शासकीय सेवेमध्ये नोकरीस होते. मात्र कलाविश्वाप्रतीचं प्रेम आणि उत्सुकता असल्यामुळे या क्षेत्रात काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती. त्याची ही इच्छा सचिन यांनी पूर्ण केली. सचिन यांच्या ‘खिचिक’ चित्रपटामध्ये अनिल यांनी एका अशिक्षित आजोबांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

‘आपल्याकडे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे. मात्र, मुलाने माझ्यातील अभिनय गुण किंवा या क्षेत्राविषयीची आवड ओळखली होती. त्यामुळे माझ्यासाठी चित्रपट निर्मिती करण्याची त्याची इच्छा होती. ‘खिचिक’ची संहिता त्याच्याकडे आल्यावर त्यातल्या आजोबांच्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. व्यक्तिरेखा फार उत्तम आहे. त्याला संवेदनांचे विविध पदर आहेत. व्यक्तिरेखा अशिक्षित असताना माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाने ही व्यक्तीरेखा जिवंत वाटण्यासाठी त्यात जीव ओतणे महत्त्वाचे होते. त्यामुळे माझ्यासाठी ही व्यक्तिरेखा आव्हानत्मकच होती. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी मोठा अनुभव देणारी कार्यशाळाच होती, असं अनिल धकाते यांनी सांगितलं.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण , यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. योगेश कोळी यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून गुरु ठाकूर आणि दत्ता यांनी लिहिलेल्या गीतांना अभिषेक-दत्ता यांचे संगीत लाभले आहे. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.