मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वैविध्यपूर्ण प्रयोग होताना दिसत आहे. वेगळ्या आशयाचे, धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. विशेष म्हणजे केवळ चित्रपटचं नाही तर चित्रपटाचं प्रमोशनदेखील हटके पद्धतीने करताना दिसत आहे. आगामी मन फकीरा या चित्रपटाचंदेखील अशाच आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रमोशन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची टीम दिग्दर्शकांसह रस्त्यावर उतरली आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मन फकीरा हा चित्रफट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी हटके पद्धत वापरण्यात आली आहे. मृण्मयी देशपांडे, सायली संजीव आणि सुव्रत जोशी हे कलाकार रस्त्यावर उतरुन चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत.

मुंबईमधील विलेपार्ले, अंधेरी या ठिकाणी तर पुण्यातील गुडलक हॉटेल आणि डेक्कन जिमखाना येथे जाऊन या तिघांनी चित्रपटाचं प्रमोशन केलं. यावेळी त्यांनी हातात अत्यंत कल्पक आणि लक्ष वेधून घेणारे पोस्टर हातात पकडले होते.

‘आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या…’, ‘आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता’, ‘मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते. लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते.

“आपल्या चित्रपटाबद्दलची त्यांची आत्मीयता त्यांच्या या कृतीतून झळकत होती. “मराठी चित्रपटसृष्टीत आज नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहे. माझ्या भूमिका असलेल्या चित्रपटांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पण माध्यमांच्या भडीमारामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय कमी होते की काय, अशी भिती वाटत आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे यावा आणि आमच्या वेगळ्या प्रयत्नाला त्याने पाठबळ द्यावे, म्हणून आम्ही हा ‘हटके’ मार्ग अवलंबला”, असं मृण्मयी म्हणाली.

वाचा : मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा?

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन फकीरा’ येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.