बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणेच आता मराठी कलाकारदेखील सिनेउद्योगातील इतर क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी निर्मिती,दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. यामध्येच लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने दिग्दर्शकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिचं पहिलं दिग्दर्शन असलेला मन फकिरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सायली संजीव, सुव्रत जोशी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून नातेसंबंधांवर भाष्य करण्यात येणार आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून भूषण-रिया या जोडप्यातील नाते आणि त्यांना वेगळ्या व्यक्तीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत आहे. या ट्रेलरमधून चित्रपटातील कथेचा हलकासा खुलासा होतो. तसंच ‘एखाद्या माणसांवर आपलं प्रेम असतं, पण दुसऱ्या एका माणसाबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ शकतो’, ‘हळव्या हाताने सोडवलं तर सुटेलही कदाचित’ यांसारख्या दमदार संवादांचा यात समावेश करण्यात आला आहे.


प्रेमात पडलाय… लग्नासाठी स्थळ आलंय… लग्न ठरलं… लग्न झालंय… अशा प्रकारचा आशय या ट्रेलरमधून समोर येतो. भूषण-रिया यांचं मराठमोळ्या ‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते. त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरु असताना एका रात्री या दोघांचेही भूतकाळ समोर येतात. हे दोघे या सर्व गोष्टीला कसे सामोरे जातात आणि पुढे नक्की काय निर्णय घेतात याचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होईल.

वाचा : ‘हम आप के हैं कौन’मधील ही अभिनेत्री झळकणार वेब सीरिजमध्ये!

‘आजच्या युवकाच्या त्याच्या जोडीदाराबद्दलच्या संकल्पना या वेगळ्या आहेत. तो अधिक प्रॅक्टीकल आणि अधिक मॅच्युअर आहे. त्यांना नुसते आयुष्यभर राहणारे पती किंवा पत्नी नकोत तर खरा मित्र हवा आहे. आज प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांना नक्की आवडेल याचीही मला खात्री आहे,” असं मृण्मयी देशपांडे म्हणाली.

वाचा : अजबच निर्णय! सापांच्या प्रणयक्रिडेसाठी निम्मा पार्क केला बंद

दरम्यान, हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सुव्रत आणि सायलीसोबत अंजली पाटील आणि अंकित मोहन हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे.