चाकोरी बाहेरचा वेगळेपणा हे बंगाली आणि मराठी कलाकृतीचे खास वैशिष्ट्य, म्हणूनच शज्जानो बागान या मनोज मित्रलिखित गाजलेल्या कादंबरीवर आधारित ‘नारबाची वाडी’ हा मराठी चित्रपट साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्यासाठी लवकर चित्रपटगृहात येत आहे.
कोकणची निसर्गरम्य पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभली आहे. त्याचबरोबर तांबड्या मातीतील एक-एक इरसाल नमुने प्रेक्षकांसाठी खोचक हास्याची बरसात करणार आहेत. अभिनेते दिलीप प्रभावळकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला मनोज जोशी, निखिल रत्नपारखी, अतुल परचुरे, किशोरी शहाणे, विकास कदम, ज्योती मालशे, भाऊ कदम, कमलाकर सातपुते ही मंडळीदेखील चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आदित्य सरपोतदार. तांबड्या मातीतल्या आणि हिरव्यागार डोंगरातल्या सौंदर्याबरोबरच सर्व व्यक्तींचा माणूसपणा नेमका टिपलाय छायाचित्रकार राहुल जाधव यांनी.
मधुर विनोदाची लज्जतदार मेजवानी घेऊन येणारा ‘नारबाची वाडी’ मराठी प्रेक्षकांना वेगळ्या हास्याची लज्जत खात्रीने देईल.
कलर्स वाहिनीवर गेली साडेचार वर्ष यशस्वीरीत्या उतरन या मालिकेची निर्मिती करणारे निर्माते कल्याण गुहा आणि रुपाली गुहा आणि त्यांच्या फिल्म फार्म या निर्मिती संस्थेची ही पहिली कलाकृती आहे. ‘नारबाची वाडी’ हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे.