आशयविषयांच्या वेगळेपणासोबतच मराठी चित्रपटांची नावंही आजकाल वेगळी पाहायला मिळत आहेत. ‘परफ्युम’ हा चित्रपट त्यापैकीच एक आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा ‘परफ्युम’ चित्रपटगृहांमध्ये दरवळणार आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही नवी जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर ‘हलाल’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या तसेच आगामी ‘लेथ जोशी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच ‘परफ्युम’ची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

वाचा : जे भल्याभल्या अभिनेत्यांना जमलं नाही ते या काकांनी करून दाखवलं – गोविंदा

‘परफ्युम’ या नावामुळे या चित्रपटाच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहेच. मात्र, चित्रपटाविषयी अधिक माहितीसाठी अजून थोडीच वाट पाहावी लागणार असून सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.