News Flash

जुना ‘पिजरा’ नव्याने!

नव्याने सादर होणाऱ्या या चित्रपटाचे एक ठळक वैशिष्टय़ आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ ‘पब्लिसिटी डिझायनर’ श्रीकांत धोंगडे यांनी ४४ वर्षांपूर्वी (१९७२) ‘पिंजरा’ची जाहिरात केली होती आणि आज नवा साज घेऊन सादर होणाऱ्या ‘पिंजरा’ची जाहिरातही धोंगडे यांनीच केली आहे.

तमाशातील स्त्रीच्या नादी लागल्यामुळे एका शिक्षकाची झालेली वाताहात ‘पिंजरा’ चित्रपटात मांडण्यात आली. त्या काळी हा चित्रपट आणि त्यातील सर्व गाणी हिट ठरली. ४४ वर्षांपूर्वी सादर झालेल्या या चित्रपटावर काही तांत्रिक प्रक्रिया करून तो पुन्हा येत्या १८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाला किंवा त्यातील गाण्यांना, मूळ चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी आधुनिक पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. मूळ चित्रपटातील काही प्रसंगाना नव्या ध्वनीचीही जोड देण्यात आली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चित्रपटाच्या मूळ प्रिंटवर तांत्रिक प्रक्रिया करण्याचे हे काम सुरू आहे. मूळ अभिजात कलाकृतीला कुठेही धक्का न लावता ‘पिंजरा’ पुन्हा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता सर्वानाच आहे. त्या निमित्ताने..

व्ही. शांताराम दिग्दर्शित व डॉ. श्रीराम लागू, संध्या, वत्सला देशमुख, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. चित्रपटातील ‘आली ठुमकत नार’, ‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडी’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘मला इष्काची इंगळी डसली’ ही आणि अन्य सर्व गाणी/लावण्या आजही लोकप्रिय आहेत. जगदीश खेबुडकर यांची गाणी आणि राम कदम यांच्या संगीताची जादू कायम आहे. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये सादर होणाऱ्या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमात ‘पिंजरा’मधील काही गाणी हमखास असतातच. चित्रपटातील गाण्यांच्या मूळ चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी आधुनिक पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. मूळ अभिजात कलाकृतीला कुठेही धक्का न लावता ‘पिंजरा’ पुन्हा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.

नव्याने सादर होणाऱ्या या चित्रपटाचे एक ठळक वैशिष्टय़ आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ ‘पब्लिसिटी डिझायनर’ श्रीकांत धोंगडे यांनी ४४ वर्षांपूर्वी (१९७२) ‘पिंजरा’ची जाहिरात केली होती आणि आज नवा साज घेऊन सादर होणाऱ्या ‘पिंजरा’ची जाहिरातही धोंगडे यांनीच केली आहे. या संदर्भात ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना ते म्हणाले, बॉम्बे पब्लिसिटीचे वसंत साठे यांनी माझे नाव व्ही. शांताराम यांना सुचविले. चित्रपटाचे बॅनर, पोस्टर याचे काम ‘राजकमल’च्याच विभागाकडून केले जाणार होते. माझ्याकडे वर्तमानपत्रासाठी ‘पिंजरा’च्या जाहिराती करण्याचे काम सोपविण्यात आले. वर्तमानपत्रासाठी जाहिरात करताना तेव्हा फोटोचा ब्लॉग, हाफटोन फोटोला स्क्रीन टाकणे, फोटोवरून लाइनवर्क असे सर्व सोपस्कार करावे लागायचे. चित्रपटाच्या जाहिरातीसाठी अभिनेत्री संध्या यांचा पदर वाऱ्याने उडतोय अशा नृत्याच्या आविष्कारातील त्यांचे छायाचित्र मला मिळाले. डॉ. श्रीराम लागू यांच्या छायाचित्रावरून लाइन ड्रॉईंग करून झाले पण संध्या यांच्या छायाचित्रावरून लाइन ड्रॉईंग करणे अवघड जात होते. त्यांच्या नाकाची ठेवण अचूकपणे उतरत नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे २८ वेळा प्रयत्न केले. अखेर तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून ‘पिंजरा’ची वर्तमानपत्रासाठीची जाहिरात तयार झाली. व्ही. शांताराम यांना ती जाहिरात दाखविल्यानंतर मी केलेल्या जाहिरातीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

पूर्वी वर्तमानपत्रांसाठी जाहिरात करताना ती कृष्णधवल रंगातच करावी लागत असे. आता जाहिराती रंगीत झाल्या आहेत. जाहिरातीसाठी जे छायाचित्र वापरायचे आहे, त्यात काही दोष असेल तर तो आता संगणकावर दूर करून ते छायाचित्र एकदम छान करता येते. मात्र पूर्वी तशी सोय नव्हती. छायाचित्रात दोष असेल तर त्यात फार काही सुधारणा करता यायची नाही. आता संगणकामुळे सगळे काम झटपट व सोपे झाले आहे. मात्र तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले आणि संगणकावर सर्व काही करता येत असले, तरीही संगणक केवळ ‘ऑपरेट’ करतो तो ‘क्रिएट’ करू शकत नाही. एखादी कल्पना, सर्जनशिलता ही माणसाच्या मेंदूमधूनच बाहेर पडते. त्यामुळे या कलेतसर्जनशीलतेला आणि माणसाच्या हाताला आजही तेवढेच महत्त्व असल्याचे धोंगडे यांनी सांगितले.

हा चित्रपट ज्यांच्यामुळे नव्या पिढीला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे ते पुरुषोत्तम लढ्ढा म्हणाले, ‘पिंजरा’सारखी अजरामर कलाकृती आत्ताच्या पिढीसमोर यावी, या एकमात्र उद्देशाने आम्ही हा सगळा घाट घातला आहे. चित्रपटाच्या मूळ प्रिंटवर तांत्रिक सोपस्कार करून आणि नवे रंगरूप देऊन हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. मूळ प्रिंटचे २ के स्कॅनिंग करून नवी अद्ययावत प्रिंट तयार करण्यात आली आहे. हॅण्ड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, ऑडिओ ग्रॅम्बिंग, कलर ग्रेडिंग आदी तांत्रिक प्रक्रिया करण्यात येऊन चित्रपटाला आधुनिकतेचा साज चढविण्यात आला आहे. या तांत्रिक कामाची जबाबदारी प्रामुख्याने ज्यांनी पाहिली ते ‘लाइन प्रोडय़ुसर’ मंदार खानविलकर यांनी सांगितले, चित्रपटाची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मूळ प्रिंट खूप पुसट झालेली होती. त्यातील रंग एकमेकांमध्ये मिसळले गेले होते. प्रसाद लॅबच्या चेन्नई आणि मुंबई येथील प्रयोगशाळेत त्यावर सर्व तांत्रिक सोपस्कार करण्यात येऊन चित्रपटाच्या प्रिंटला आधुनिक साज चढविण्यात आला. गेले साडेतीन महिने हे काम सुरू आहे.

४४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘िपजरा’ नव्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षक आणि मराठी चित्रपटसृष्टीतही त्याबाबत उत्सुकता आहे.

हे अनुभवण्यासाठी अण्णा हवे होते!

‘पिंजरा’ चित्रपटाला ४४ वर्षांपूर्वी अमाप यश आणि लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील सर्व गाणी तेव्हा लोकप्रिय झाली आणि आजही ती तेवढीच लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा नव्याने ‘पिंजरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आताच्या पिढीकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाटतो. हे सर्व अनुभवण्यासाठी व्ही. शांताराम ऊर्फ अण्णा असायला हवे होते. आज त्यांची प्रकर्षांने आठवण येत आहे. मी आणि संध्या आम्ही दोघीही बहिणी. आमच्या दोघींची एकत्र भूमिका असलेला एखादा चित्रपट असावा, असे संध्याला खूप वाटायचे. ‘पिंजरा’च्या निमित्ताने तो योग जुळून आला आणि अण्णांमुळे चित्रपटातही मी संध्याच्या मोठय़ा बहिणीची ‘आक्का’ची भूमिका साकारली. चित्रपटावर अण्णांनी खूप मेहनत घेतली. चित्रपटातील सर्वच छोटय़ा-मोठय़ा भूमिकेचे त्यांच्या दृष्टीने महत्त्व होते. त्यामुळे चित्रपटातील सर्वच भूमिका ठळकपणे आजही लक्षात राहणाऱ्या ठरल्या. चित्रपटात भूमिका करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला महत्त्व देऊन, त्याच्याशी चर्चा करून, सल्लामसलत करून चित्रपट तयार केला.

वत्सला देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 6:52 am

Web Title: marathi movie pinjara loksatta review
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 ‘अपेक्षित असलेलंच पडद्यावर दिसेलच याची खात्री नसते’
2 अर्जुन कपूरला विश्रांती हवीय..
3 ‘..दुरावा’ संपणार!
Just Now!
X