चौकटीबाहेरचे चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या झी स्टुडीओज् चा नवीन चित्रपट, ‘पुष्पक विमान’चा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आला. ‘आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त’ याच ओळीने सुरुवात होणाऱ्या या टीझरमध्ये आजोबा आणि नातू यांतील नात्याची झलक पाहायला मिळते आहे. मुख्य म्हणजे ही ओळ कानांवर पडल्यानंतर प्रेक्षकही त्यांच्या आजोबांसोबतच्या नात्यात कुठेतरी रममाण होत आहेत.
नात्यांची व्याख्या बदलत आहे, अशी तक्रार हल्ली केली जाते. पण, त्यातच प्रदर्शित झालेला हा टीझर सध्या याच नात्यांची व्याख्या एका नव्या पद्धतीने रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी सज्ज झाला आहे हे खरं. पुष्पक विमान या चित्रपटाच्या अवघ्या काही सेकंदाच्या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात बऱ्याच प्रश्नांचा काहूर माजला असून, आता या विमानाचं उड्डाण कधी होणार आणि ते कोण करणार, याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत
दरम्यान, या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराच्या लूकवरुन पडदा उचलला नाहीये. पण, तरीही सुरुवातीला आपल्या कामांवर पडणारा आवाज हा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशीं यांचा असल्याचं लगेचच लक्षात येत आहे. त्यामुळे या अशाच कारणांमुळे ‘पुष्पक विमान’ चा टीझर लक्षवेधी ठरतोय.
या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे यांचे निर्मिती क्षेत्रात, तसेच वैभव चिंचाळकर यांचे दिग्दर्शनातील पदार्पण आहे. हा चित्रपट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 22, 2018 6:20 pm