‘मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्न विचारणारे मास्तर..  ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ ही गीते.. विजय तेंडुलकर यांचे कथा-पटकथालेखन.. डॉ. जब्बार पटेल यांचे चित्रपटातील दिग्दर्शकीय कारकिर्दीतील पदार्पण.. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनय जुगलबंदीने रंगलेल्या ‘सामना’ चित्रपटाने चाळिशी पूर्ण केली आहे. हे औचित्य साधून कलासंस्कृती परिवारने शनिवारी (१८ एप्रिल) ‘सामना : नाबाद ४०’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ज्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचे ‘सामना’ने भेदकपणे चित्रण केले ते वास्तव आजही कायम आहे. या दृष्टिकोनातून ‘सामना’चे पुनरावलोकन करण्याच्या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. जब्बार पटेल, डॉ. श्रीराम लागू, पाश्र्वगायक रवींद्र साठे आणि निर्माते-वात्रटिकाकार रामदास फुटाणे ही मंडळी अनौपचारिक गप्पांतून ‘सामना’च्या निर्मितीमागच्या आठवणी उलगडणार आहेत.  घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल.