मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या विषय हाताळले आहेत. यामध्ये प्रेम, कुटुंब, मैत्री या साऱ्यांचा समावेश होतो. मैत्री म्हणजे सुख-दु:खांचा सोबत. ही मैत्री कोणासोबतही होऊ शकते. मग ती एखादी व्यक्ती असो किंवा एखादा मुका जीव. अशाच एका अबोल मैत्रीवर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गिरीश विश्वनाथ यांची निर्मिती असलेला ‘व्हॅनिला, स्टॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक कुटुंब आणि एका श्वानाची मैत्री दाखविण्यात येणार आहे. निसर्गरम्य माथेरानमध्ये राहणाऱ्या घोडेस्वार बाबू पवार त्याची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात‘व्हॅनिला’चं आगमन होतं. व्हॅनिला हा एक श्वान असून त्याच्या येण्याने या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.

‘अआइई एन्टरटेंन्मेंट निर्मित’ ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ या चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी गिरीश विश्वनाथ यांनी सांभाळली आहे. माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करणारा ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा पहिलाच चित्रपट आहे.

‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ या चित्रपटाद्वारे जानकी पाठक ही नवोदित अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. यासोबत ज्येष्ठ अभिनेते रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव आदि कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाचे संकलन सागर भाटिया तर छायांकन सचिन खामकर यांचे आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांचे असून जावेद अली, उपग्ना पंड्या, ऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सहदिग्दर्शन निलेश देशपांडे यांचे आहे.