|| नीलेश अडसूळ

मराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीवरील ‘टिकल ते पोलिटिकल’, ‘पिंपळपान’, ‘सोनियाचा उंबरा’ या मालिका जाणत्या रसिकांच्या मनात आजही घर करून आहेत. याच काही मालिकांमधून नट म्हणून पदार्पण केलेला एक नवखा चेहरा आज अनेक दिग्गज नट-नटय़ांच्या अभिनयाला आपल्या दिग्दर्शनाची दिशा देतो आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातून आलेला मराठवाडय़ाचा हा रंगकर्मी कलाक्षेत्रात कोणतेही लागेबांधे नसताना स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतो. नाटक आणि सिनेमांच्या रजतपटावर आपल्या उत्स्फूर्त शैलीची जादू दाखवत मालिकेतील अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंतची धुरा यशस्वीपणे सांभाळणारा तो चेहरा म्हणजे समीर पाटील. दिग्दर्शकाच्या चष्म्यातून ‘पोस्टर बॉईज’, ‘शेंटीमेंटल’सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देऊन समीर यांनी प्रेक्षकांना भुरळ पाडलीच, पण सहज आणि तितकाच रंजक अभिनय साकारत ‘स्ट्रगलर साला’सारख्या यू टय़ूब शोमधून तरुणांनाही वेड लावलं. सोनी मराठीवर वाहिनीवर ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने समीर पाटील पुन्हा प्रेक्षकांसमोर आले आहेत.

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेच्या प्रोमोमधील ‘आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पहिजे’ हे वाक्य सध्या भलतंच गाजलं आहे. त्यात आपल्या मुलांचे लग्न जमवण्यासाठी आटापिटा करणारी आई आणि तिच्या चार मुलांचीही जोरदार चर्चा आहे. कारण मराठवाडय़ासारख्या ग्रामीण भागात आज सर्व सुविधा आणि शिक्षण असूनही लग्नासाठी मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सुनांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईची आणि तिच्या चार मुलांची गोष्ट या मालिकेत दिसणार आहे.

मालिकेच्या वेगळेपणाविषयी समीर सांगतात, ही मराठवाडय़ाच्या सुशिक्षित मुलांची आणि त्यांच्या आईची कथा आहे. आज ग्रामीण भागातील व्यथा आणि विवंचना आपल्या समजुतीच्या पलीकडे जाऊन पोहोचल्या आहेत. पाण्यापासून ते जीवनावश्यक गोष्टींच्या उपलब्धतेबद्दल नाना प्रश्नांना ते सामोरे जात आहेत. त्यातही मराठवाडय़ासारख्या ग्रामीण भागात तरुणांकडे शिक्षण असूनही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही ही गंभीर बाब झाली आहे; परंतु ही समस्या कुठेही रटाळ आणि रडक्या सुरात न मांडता जर प्रहसनात्मक पद्धतीने मांडण्याचे ठरवले, कारण उपरोधिक विनोद प्रेक्षकांना सहज समजतात, असं ते सांगतात; किंबहुना इतर मालिकांच्या बाबतीतही त्यांचे मत काहीसे वेगळे आहे. ‘‘आपण प्रेक्षकांना ‘त्याच-त्या’ स्वरूपात आखलेल्या मालिका पाहण्याची सवय लावली आहे. म्हणून यापलीकडे प्रेक्षकांना काही आवडूच शकत नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळे आहे,’’ असं ते म्हणतात. लोक बदल स्वीकारतात; किंबहुना लोकांना नव्या आशयाची आणि नव्या मांडणीची अधिक आस असते. त्यामुळे चित्रपटांप्रमाणे मालिकेतही वेगवेगळे विषय हाताळायला हवेत. जुन्या मालिकांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, किती वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळले जायचे. त्यासाठी अनेक साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांच्या भूमिका विचारात घेतल्या जायच्या आणि त्याच वातावरणात माझी जडणघडण झाली, असं समीर सांगतात.

समीरच्या बोलण्यात आणि त्यांच्या कलाकृतींमध्ये कायम विनोदाची झालर जाणवते. मांडायचा मुद्दा अचूक असतो, पण तो कुठेही गंभीर न करता सहजतेने मांडण्याच्या त्यांच्या शैलीचं श्रेय मी ‘टिकल ते पोलिटिकल’ या मालिकेला देतो, असं ते म्हणतात. एखाद्या गोष्टीकडे गंभीरतेने बघण्यापेक्षा त्यातून प्रहसन करता येईल का किंवा हे विनोदातून मांडता येईल का हा दृष्टिकोन संजय पवारांच्या लेखणीने दिला. मुंबईत आलो तेव्हा ‘ऑल दि  बेस्ट’ नाटकाचे काही प्रयोग करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विनोदाशी असलेले नाते अधिक घट्ट होत गेले. पुढे ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’सारखे गंभीर नाटकदेखील केले, परंतु मला हवे असणारे समाधान काही अंशी विनोदाने अधिक दिले. कदाचित याच जाणिवेतून ‘पोस्टर बॉईज’सारखा सिनेमा मला सुचला, असं त्यांनी सांगितलं. तीन हमालांना आपले फोटो नसबंदीच्या पोस्टरवर लागल्याचे समजते आणि त्यांची त्रेधातिरपीट उडाली, ही बातमी मी एका वाहिनीवर पाहिली आणि माझ्या डोक्यात चटकन विचार आला, याच्यावर एखादा सिनेमा झाला तर? आणि मी कामाला लागलो. नसबंदी आणि तीन नायकांच्या फोटोचे आशयसूत्र घेऊ न कथा खुलवत गेलो. पुढे चित्रपट आला, तो हिट झाला, पण माध्यम जरी विनोदाचे निवडले तरी त्यातून जो सामाजिक संदेश द्यायचा होता तोदेखील स्पष्टपणे पोहोचवता आला याचे समाधान वाटते, असं ते म्हणतात.

आज समीर पाटील यशस्वी दिग्दर्शक म्हणून या कलाक्षेत्रात उभे असले तरी त्या प्रवासामागेही अनेक गमतीजमती आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ न नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आलेले समीर नोकरी करता-करता नाटकाकडे वळले. त्या आठवणींविषयी बोलताना, ९७ साली मोहन वाघांना भेटण्याचा योग आला. तेव्हा ‘ऑल दि बेस्ट’ नाटक जोरात सुरू होते; पण श्रेयस तळपदेच्या रिप्लेसमेंटला एका अभिनेत्याची गरज होती आणि मोहनकाकांनी मला विचारले. सुरुवातीला मला काहीच कळेना, पण मी होकार देऊ न मोकळा झालो. अवघ्या आठ दिवसांत तयारी केली आणि आमचा दौरा सुरू झाला. पुढे नोकरी आणि नाटक दोघांपैकी एकच काही तरी निवडण्याची वेळ आली आणि नाइलाजाने मला नाटक सोडावे लागले; पण पुन्हा ९८ साली चंद्रकांत कुलकर्णीचा ‘बिनधास्त’ चित्रपट आला आणि त्यात मला साहाय्यक दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि माझी वाट या क्षेत्राकडे वळली. त्या चित्रपटानंतर चंद्रकांत कुलकर्णीबरोबर अनेक मालिका केल्या. त्यातूनच ‘वावटळ’, ‘पिंपळपान’सारख्या उत्तम कलाकृतींचा भाग होता आले. ‘पिंपळपान’च्या आठवणी काहीशा अधिक जवळच्या असल्याचे समीर सांगतात, कारण त्या मालिकेदरम्यान चंद्रकांत कुलकर्णीसोबत अनेक दिग्गजांना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, श्री. ना. पेंडसे अशा दिग्गजांच्या भेटी झाल्या. त्यांचे साहित्य वाचनात आले आणि नवा दृष्टिकोन त्यातून गवसला, असं ते सांगतात. पुढे काही काळ बरीच कामे मिळत गेली; परंतु मनासारखे काम आणि कामाचे पुरेसे पैसे मिळत नसल्याने २००८ साली मला या क्षेत्राचा निरोप घ्यावा लागला. २००८ ते २०११ या तीन वर्षांच्या काळात नोकरीच्या माध्यमातून पुरेशी कौटुंबिक स्थिरता मिळवली. पुन्हा इथे येण्याचा विचारही मनात नसताना तेव्हाच्या ‘स्टार माझा’ वाहिनीवरून ‘वारी विधानसभेची’ या मालिकेसाठी बोलावणे आल्याचे ते सांगतात. तो कार्यक्रम महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाला. तो लोकांच्या इतक्या पसंतीस उतरला की, आजही तो कार्यक्रम सुरू आहे. पुढे यातूनच एकेक काम मिळत गेले आणि पुन्हा या क्षेत्रात पदार्पण झाले, असं त्यांनी सांगितलं.

आज कुठे तरी मागे पडत असलेल्या वाचनसंस्कृतीचा समीर आवर्जून उल्लेख करतात आणि त्यांच्या यशात वाचनाचाही तितकाच सहयोग असल्याचा ते सांगतात. त्यांच्या मते वाचन हे माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना देते. कारण नुसत्याच संकल्पना मांडून चालत नाही तर त्याचा विस्तार होणेही कलाकृतीच्या अनुषंगाने गरजेचे असते. त्यामुळे वाचन प्रगल्भ असेल तर चार पुस्तकांतून चार संदर्भ आपल्याला मिळत जातात आणि कल्पनेला अधिक स्पष्ट आकार येत जातो. आज मराठीत एवढे समृद्ध साहित्य आहे की, त्यातले काही लेखक-कवी जरी अभ्यासले तरी तुमच्या जगण्याच्या जाणिवा समृद्ध होत जातात; परंतु आताच्या पिढीत वाचन दिसत नाही. गूगल हा त्यांच्या ज्ञानाचा एकमेव स्रोत झाला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मराठीतले साहित्य सोडा, मराठीतले शब्दही माहिती नसतात. ‘गावगाडा’सारखा शब्द तुम्ही गूगलवरून समजून घेऊ  शकत नाही. त्यासाठी तुम्हाला शंकर पाटील वाचायलाच हवे, असे मार्मिक उदाहरण पाटील देतात आणि वाचन कमी असल्याने मुलांचे भाषाज्ञान घसरत चालले आहे. आपण बोलू तीच भाषा मराठी असा समज अनेकांचा झाला आहे, हाही मुद्दा ते अधोरेखित करतात. शिवाय दत्ता भट, सतीश दुभाषी, लागू, पणशीकर, विक्रम गोखले, भक्ती बर्वे अशा दिग्गजांना नाटकात काम करताना मी पाहिले आहे. त्यांची भाषा, शब्दफेक अनुभवली आहे. त्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजतो की, अशा ज्येष्ठ रंगकर्मीचे संस्कार माझ्यावर झाले. अभिनेत्याला तर भाषेचा अभ्यास असणे आवश्यकच आहे, कारण भाषेचे सत्त्व राखता आले की, तुम्ही प्रमाण आणि बोली मराठी या दोन्ही भाषांमध्ये चपखल भूमिका साकारू शकता, असंही ते सांगतात.

वेब सीरिज आणि यू टय़ूब शोच्या माध्यमांविषयी समीर सांगतात, एखादी मालिका किंवा एका विशिष्ट भागांपर्यंत अतिरेकी आशय बरा वाटतो; परंतु वेब सीरिज किंवा यू टय़ूब माध्यम असेल तर शिव्या, अश्लाघ्य भाषा, अर्धनग्नता किंवा प्रणय दृश्य हे असायलाच हवे असे नाही आणि नेमका तोच गैरसमज लोकांनी करून घेतला आहे याचे वाईट वाटते. याउलट जे विषय चित्रपट आणि मालिकांमध्ये उघडपणे मांडता येत नाहीत ते मांडण्याचे हे सर्वोत्तम माध्यम आहे, हे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी लक्षात घ्यायला हवे. अन्यथा समाजमाध्यमांचा जसा विपर्यास सुरू  आहे तसा याही माध्यमांचा सुरू व्हायला वेळ लागणार नाही, असे विधान करत समीर यांनी समाजमाध्यमांकडेही लक्ष वेधले. संवाद साधण्याचे माध्यम आज विसंवादाचे आणि मतभेदांचे आगार बनले आहे. समाजमाध्यमांवर  प्रत्येक गोष्टीला उद्विग्न स्वरूप प्राप्त होत आहे, असेही ते म्हणाले.

आगामी कलाकृतींविषयी भविष्यात मला असे विषय मांडायला आवडतील जे आजवर मांडले गेले नाहीत किंवा जे विषय लोक गंभीरतेने मांडतात ते विनोदी शैलीत मांडून लोकांपर्यंत पोहोचवायला आवडतील, असे त्यांनी सांगितले. मराठीत असे नवनवीन प्रयोग होत आहेत तसे हिंदीत व्हायला हवेत आणि त्याचा आपणही एक भाग व्हावे, अशी इच्छा व्यक्त करत हिंदीमध्ये पदार्पण करण्याचा मानसही समीर यांनी बोलून दाखवला.