मराठी सिनेमा आशयघन असतो यात कोणाचंही दुमत नाही. मात्र आशयघन सिनेमा व्यावसायिक अर्थाने ‘चालतोच’ असं नाही हे मराठी चित्रपटांना सातत्याने ऐकवलं जायचं. त्यामुळे चित्रपट निर्मितीपासून ते मल्टिप्लेक्समध्ये दिवसभराचे शो मिळवण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी झगडत मराठी चित्रपटकर्मीना वाट काढावी लागली. ‘महोत्सवां’पर्यंत पोहोचलेला सिनेमा घराघरात प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचेल, हे अवघड गणित सोडवण्यात गेल्या वर्षी मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना यश मिळालं आहे. यावर्षी या यशाचे पुढचे पाढे प्रेक्षकांना कसे अवगत करायचे याची जाणीव झालेली ही मंडळी अक्षरश: बाह्य़ा सरसावून कामाला लागली आहेत. याची प्रचीती यावर्षीच्या सहा महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांवर सहज लक्ष टाकलं तरी येईल.
‘लोकमान्य-एक युगपुरुष’ या मराठी चित्रपटाने यावर्षीच्या तिकीटबारीची नांदी झाली आहे. गेल्या वर्षीही ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटानेच सरुवात झाली होती. आणि पहिल्या तीन दिवसांत दहा कोटींचा आकडा पार करत ही नांदी मराठी चित्रपटांनी सार्थही ठरवली होती. म्हणजे वर्षांची सुरुवात मराठी चित्रपटांनीच करायची हा पायंडाच सुरू केला आहे की काय.. याबद्दल बोलताना ‘एस्सेल व्हिजन’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी सांगितलं की, हा प्रयोग गेली पाच र्वष सुरू आहे. याची सुरुवात खरं तर ‘नटरंग’पासून झाली होती, असं ते म्हणतात. ‘नटरंग’ हा चित्रपट नव्या वर्षांच्या पहिल्या आठवडय़ातच प्रदर्शित झाला होता. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. होतं काय दरवर्षी शेवट हा आमिर किंवा शाहरूख, सलमानसारख्या खान मंडळींच्या चित्रपटाने होतो. ‘नटरंग’च्या वेळेस राजकुमार हिरानीचा ‘थ्री इडियट्स’ वर्षांचा शेवटचा चित्रपट म्हणून प्रदर्शित झाला होता. तरीही ‘नटरंग’ला मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. त्यामुळे वर्षांच्या सुरुवातीला प्रेक्षक चांगल्या विषयाला प्रतिसाद देतातच हा विश्वास निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी ‘टाइमपास’ होता. अर्थात, ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ या चित्रपटामागचा विचार वेगळा होता. लोकमान्यांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवणारा हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक योग्य वेळ हवी होती. तो योग या नव्या वर्षांरंभाने जुळून आला, असं निखिल साने यांनी सांगितलं. एकटय़ा जानेवारी महिन्यात ‘क्लासमेट्स’, ‘बाळकडू’, ‘बुगडी माझी सांडली गं’ आणि संतोष जुवेकरची मुख्य भूमिका असलेला ‘एक तारा’ असे वेगवेगळे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
या पुढच्या सहा महिन्यांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची नावं ऐकली तरी लोकांचं कुतूहल जागं व्हावं एवढी वैविध्यता असल्याचं लक्षात येतं. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून नावाजला गेलेला अविनाश अरुण दिग्दर्शित ‘किल्ला’, श्रेयस तळपदे साकारत असलेला मराठीतील पहिला सुपर हिरो ‘बाजी’, प्रेमकथांचं वेगळं रूप असलेला स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘मितवा’, रवी जाधव यांचा ‘टाइमपास २’, लोकमान्यांच्या भूमिकेत ठसा उमटवणाऱ्या अभिनेता सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘बाईकर्स अड्डा’सारखे वेगळ्याच नावांचे, विषयांचे मराठी चित्रपट यावर्षी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. कलात्मकता आणि व्यावसायिक यशाचं ‘जंक्शन’ मराठी चित्रपटांनी गाठलं आहे, असं मत दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केलं. ‘गेल्या वर्षी ‘टाइमपास’ आणि ‘लय भारी’ या चित्रपटांनी ३० कोटींचा पल्ला गाठला. दिसताना हे दोन चित्रपट असले तरी मुळात मराठी चित्रपट कोटींच्या घरात पोहोचला हे एक सत्य आहे. दुसरीकडे ‘फँ ड्री’, ‘किला’, ‘कोर्ट’सारखे नवख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांनीही आंतरराष्ट्रीय महोत्सवांवर गारूड केलं आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मल्टिप्लेक्सचं बॉक्स ऑफिस दोन्हीकडे मराठी चित्रपटांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. २०१० पर्यंत मराठी चित्रपटांचं महोत्सवांमधलं स्थान सातत्याने राहिलेलं होतं. मात्र, आशयघन सिनेमा आणि व्यावसायिक यश हे ‘जंक्शन’ मराठी चित्रपटांना चांगलं जमतं हे सिद्ध झालं आहे. यावर्षी लोकांना ते जास्त ठळकपणे दिसून येईल’, असं रवी जाधव यांनी सांगितलं. रवी जाधव यांनी स्वत: ‘बायोस्कोप’सारखा महोत्सवातला चित्रपट यावर्षी केला आहे. ‘टाइमपास २’ या व्यावसायिक सिनेमाबरोबरच ‘कॉफी आणि बरेच काही’ या चित्रपटाची प्रस्तुती त्यांची आहे.
मराठी चित्रपट ९० कोटींचा पल्ला गाठेल!
गेल्या वर्षी मराठी चित्रपटांनी ३० कोटींची कमाई केली होती. यावर्षी प्रसिद्धी, मार्केटिंग आणि चित्रपटांचा दर्जा यावर एवढे काम सुरू आहे की मराठी चित्रपट नक्की ९० कोटींचा पल्ला गाठेल, असा विश्वास रवी जाधव यांनी व्यक्त केला आहे. मराठी प्रेक्षकांना गृहीत धरू नका, हे म्हणणं आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. आणि हे किती खरं आहे ते गेल्या वर्षीच्या मराठी चित्रपटांना मिळालेल्या प्रेक्षक प्रतिसादाने दाखवून दिलं आहे, असं निखिल साने म्हणतात. एकीकडे ‘टाइमपास’ आणि ‘लय भारी’सारखे तद्दन व्यावसायिक सिनेमांना मिळालेलं यश होतं. तर दुसरीकडे नागराजचा ‘फँ ड्री’, ‘यलो’,  ‘प्रकाश बाबा आमटे’सारख्या सामाजिक चित्रपटांनाही चांगलं यश मिळालं. ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘हॅप्पी जर्नी’सारख्या चित्रपटांनाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीही ‘क्लासमेट’, ‘बाजी’, ‘किल्ला’ असे वेगवेगळ्या विषयांवरच्या ‘कलरफुल’ मराठी चित्रपट प्रेक्षकांची वाट पाहात आहेत. हेही वर्ष मराठी चित्रपटांसाठी अत्यंत आश्वासक असल्याचा विश्वास साने यांनी व्यक्त केला.