‘व्हेंटिलेटर’ आणि ‘वजनदार’ला ऑनलाइन बुकिंगने तारले

चलनबंदीमुळे एटीएम आणि बँकांमध्ये रांग लावून पैसे काढण्यात व्यग्र असलेले मुंबईकर चित्रपटांकडे वळणार नाहीत, लोकांकडे रोख पैसे नसल्याने या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होणार, अशी अटकळ होती. मात्र या गोंधळाच्या परिस्थितीतही ऑनलाइन बुकिंग करून प्रेक्षकांनी दोन्ही मराठी चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला असल्याने ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘वजनदार’ या चित्रपटांचे तिकीटबारीवरचे पारडे जड झाले आहे. तर ‘रॉक ऑन २’ हा हिंदी चित्रपट सपशेल आपटला आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

चलनबंदीच्या निर्णयानंतर व्यवहारातून अचानक पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बेपत्ता झाल्यानंतर चित्रपटांची तिकिटे खरेदी करण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत. याचा मोठा फटका एकपडदा चित्रपटगृहांना बसेल जिथे मोठय़ा संख्येने लोक थेट तिकिटे खरेदी करून चित्रपट बघतात, असा चित्रपटगृहांचे मालक आणि व्यावसायिकांचा अंदाज होता. या आठवडय़ात ‘रॉक ऑन २’ आणि सई ताम्हणकर-प्रिया बापट जोडीचा ‘वजनदार’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, तर राजेश मापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’चा हा दुसरा आठवडा आहे. पैसे नसल्याने लोकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवू नये, यासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी ऑनलाइन तसेच डेबिट-क्रेडिट कार्डवर लोकांनी तिकिटे खरेदी करावीत, यासाठी प्रयत्न केले होते. चलनबंदीचा सर्वसाधारण परिणाम या चित्रपटांच्या व्यवसायावर झाला आहे. मात्र ‘रॉक ऑन २’ हा हिंदी चित्रपट व्हेंटिलेटरवर गेला आहे. पण ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘वजनदार’ दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी ऑनलाइन बुकिंग करून गर्दी केली असल्याने चांगला व्यवसाय झाला असल्याचे ‘सनसिटी’ चित्रपटगृहाचे दामोदर भोयर यांनी सांगितले.

‘वजनदार’ चित्रपटाला शुक्रवारी प्रदर्शित झाल्याच्या दिवशी फारच कमी प्रतिसाद मिळाला होता. शनिवार-रविवारी मात्र राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटासाठी प्रेक्षकांची अनपेक्षितरीत्या गर्दी झाली. त्यामुळे या चित्रपटाने दोन दिवसांत जवळपास एक कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती चित्रपटाचे वितरक ‘रजत एंटरप्राईझेस’चे राहुल हकसर यांनी दिली. त्या तुलनेत फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर अशी चांगल्या कलाकारांची फौज असूनही या तीन दिवसांत देशभरातून ‘रॉक ऑन २’ला अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करता आलेली नाही. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात चांगली कमाई केली होती. चलनबंदीमुळे दुसऱ्या आठवडय़ात चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होणार ही भीतीही प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे दूर पळाली आहे. या चित्रपटाला दुसऱ्या आठवडय़ातही हाऊसफुल्ल गर्दी आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन बुकिंग केल्याचे ‘टिळक’ चित्रपटगृहाचे मालक संजीव वीरा यांनी सांगितले. मुंबई आणि पुण्यात मराठी चित्रपटांनी तीन दिवसांत चांगली कमाई केली असल्याचे चित्रपट व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

६० ते ७० टक्के परिणाम

सुट्टीचे दिवस असूनही चलनबंदीच्या निर्णयामुळे एकपडदा चित्रपटगृहांच्या कलेक्शनवर ६० ते ७० टक्के परिणाम झाल्याचे एकपडदा चित्रपटगृह मालक संघटनेचे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितले. ऑनलाइनवर प्रेक्षकांनी बुकिंग केले असले तरी थेट तिकीट खरेदी करून येणारा मोठा प्रेक्षकवर्ग चित्रपटापासून दूर राहिला. अजून महिनाभर आम्हाला असे नुकसान सहन करावे लागणार आहे. पण त्यासाठी तयारी असून सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.