05 July 2020

News Flash

चित्रचाहूल : वाहिन्यांचा पौराणिक पवित्रा

देवीदेवतांच्या पौराणिक कथांना मालिकाविश्वात महत्त्व प्राप्त झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश अडसूळ

भारतातच नव्हे तर जागतिक साहित्यातही धार्मिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यनिर्मितीची सुरुवातच धार्मिक कथा आणि आख्यायिकांनी झाली आहे, असे म्हणणे हे वावगे ठरणार नाही. मौखिक परंपरेतून चालत आलेल्या धार्मिक कथा पुढे पुस्तकारूढ झाल्या आणि कालांतराने त्याचा प्रसार-प्रचार वाढला. माणसाच्या कलाविष्कारांमध्ये मानवी जगण्याला आणि भावभावनांना स्थान प्राप्त करण्यात बराच काळ गेला. आज काळानुसार विज्ञान तंत्रज्ञानाने जगाचे स्वरूप बदललेले असले तरी माणसाची अभिरुची आजही धार्मिक गोष्टींना प्राधान्य देताना दिसते. महाराष्ट्रात तर ती अधिकच दृढ होत जाते. ही संतांची भूमी असल्याने इथल्या मनामनांत धार्मिकतेचे वेगळे स्थान आहे आणि कदाचित ते ओळखण्यात वाहिन्यांना यश आले आहे. म्हणूनच देवीदेवतांच्या पौराणिक कथांना मालिकाविश्वात महत्त्व प्राप्त झाले आहे.

अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून पौराणिक आशयाला प्राधान्य दिले गेले, परंतु रवी चोप्रा यांचे ‘महाभारत’ आणि रामानंद सागर यांचे ‘रामायण’ या दोन मालिकांनी गाजवलेला सुवर्णकाळ आजही लोक विसरलेले नाहीत. तेव्हापासून सुरू झालेले पौराणिक मालिकांचे सत्र आजही हिंदीमध्ये तसेच सुरू आहे; किंबहुना मधल्या काळातही अनेक पौराणिक मालिका हिंदी वाहिन्यांवर येऊन गेल्या, त्यापैकी ‘महादेव’ आणि ‘हनुमान’ या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सध्या तसाच प्रतिसाद हिंदीतील स्टार प्लस वाहिनीवरील ‘राधा कृष्ण’ या मालिकेला मिळतो आहे. मराठीत मात्र पौराणिक मालिकांना आता कुठे सोन्याचे दिवस येऊ  लागले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ‘झी मराठी’ वाहिनीवर २०१४ ला ‘जय मल्हार’ ही मालिका आली आणि अवघा महाराष्ट्र खंडोबाचे चरित्र घरात बसून पाहू लागला. संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या खंडोबाची महती आजवर लोकसाहित्य आणि लोककलेतून वर्णिली गेली आहे; परंतु अभिजनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मालिकाविश्वात साकारलेली खंडोबाची कथा आतापर्यंतची सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ठरली.

तब्बल साडेतीन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे रंजन केले. पुढे याच धर्तीवर कलर्स मराठीवर ‘गणपती बाप्पा मोरया’ ही गणेशाचे चरित्र सांगणारी मालिका आली. भारतामध्ये इतर देवांपेक्षा गणराय काहीसे अधिक लाडके असल्याने याही मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांची निर्मिती कोठारी प्रॉडक्शन म्हणजे अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केली होती. या मालिकांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर मराठी वाहिन्यांनी कौटुंबिक आशयासोबत पौराणिक आशयाला महत्त्व दिल्याचे लक्षात येते. सध्या झी मराठी वगळता इतर वाहिन्यांवर पौराणिक आशयाचा जोरदार भरणा सुरू आहे. स्टार प्रवाहवर ‘विठू माऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’, तर कलर्स मराठीवर ‘बाळूमामा’ आणि ‘श्री लक्ष्मी नारायण’ या मालिका पौराणिक आशयातून मनोरंजन करत आहेत. त्यापैकी ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि ‘श्री लक्ष्मी नारायण’ या मालिकांनी नुकतेच पदार्पण केले आहे, तर याच सुरात आपला सूर मिसळत सोनी मराठी वाहिनीने त्यांचीच निर्मिती असलेली हिंदीतील ‘महाबली हनुमान’ ही मालिका मराठीत आणली आहे. हिंदीमध्ये या मालिकेने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. मराठी प्रेक्षकांना आवडेल, रुचेल अशा पद्धतीने या मालिकेचे पुर्नसकलन केले आहे, तर या मालिकेसाठी देवेंद्र भोमे यांनी संगीतबद्ध केलेले मारुती स्तोत्र सध्या समाजमाध्यमांवर उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे प्रक्षेपण केवळ शुक्रवारी आणि शनिवारी करण्यात येणार आहे.

हिंदीप्रमाणे थेट गणपती, शंकर, कर्ण, दुर्गामाता अशा मूळ देवतांना हात न घालता महाराष्ट्रात रुजलेल्या ग्रामदेवतांना वाहिन्यांनी प्राधान्य दिल्याने वेगळेपण आढळते आणि म्हणूनच कदाचित त्या मालिका रंजनापेक्षा भक्तिभावातून अधिक पाहिल्या जातात. त्यापैकीच एक मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’. कोल्हापूर येथील आदमपुरात स्थान असलेल्या बाळूमामांची प्रचीती पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचली आहे. धनगर समाजाचे लोक प्रामुख्याने या दैवताची उपासना करताना दिसतात; परंतु बाळूमामांवर श्रद्धा असणारे भाविक सर्व स्तरांत असल्याने या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळाला. मालिकेचे चित्रीकरण मुंबईत सुरू असले तरी मालिकेतील ग्रामीण बाज, पात्रांची अचूक निवड यामुळे मालिका पाहताना मालिकेत क्वचितच आढळणारा कृत्रिमपणादेखील दुर्लक्षित होतो. काहीएक शक्ती घेऊन जन्माला आलेल्या बाळूमामाचे बाळरूप जितके प्रेक्षकांना भावले तितकेच प्रौढ रूपातील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मालिकेत बाळूमामाचे लग्न होणार की नाही? ते कसे, कधी याविषयी मालिका बरीच ताणली गेली; परंतु शिवशक्तीचे मीलन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तग धरला होता. आदमपुरातील बाळूमामांच्या मंदिरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने मालिकेचा प्रभाव रसिकमनावर झाला आहे आहे, असे ठामपणे सांगता येईल. आता बाळूमामा आणि सत्यवाचा विवाह झाला असला तरी साक्षात शिव आणि पार्वती यांचा हा कलियुगी संसार कसा खुलतो आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आगामी भागात बाळूमामा भक्तांचे दु:ख दूर करण्यासाठी त्यांना दाखवणारे मार्ग, त्यांच्या भूतकाळातील रहस्य आणि दिव्य शक्तीने केलेले चमत्कार अशा बाळूमामांच्या लीला पाहायला मिळणार आहेत, तर घराघरांतील गृहलक्ष्मीचे प्रेरणास्थान असलेल्या महालक्ष्मी आणि नारायण यांच्या संसाराची गाथा पाहण्याकडे महिला वर्गाचा अधिक कल दिसतो आहे. मालिकेत आलेले अलक्ष्मी हे पात्र अधिक रंजक आणि कृत्रिम झाल्याने मालिका पाहताना काहीशी पकड सुटते; परंतु लक्ष्मीनारायण यांचा विवाह आणि पौराणिक कथांचा आधार घेत सुरू असलेली मांडणी पाहताना मनोरंजनाची काहीशी धरपकड सुरू असल्यासारखे वाटते.

सहाशे भागांचा विक्रम करणारी स्टार प्रवाहवरील ‘विठू माऊ ली’ ही मालिका विठ्ठलाभोवती फिरणारी असली तरी सध्या मालिकेच्या अग्रस्थानी फक्त पुंडलिक असल्याचे जाणवते. मध्यंतरी दाखवण्यात आलेला ‘पुंडलिक फॅमिली ड्रामा’ ओढूनताणून सुरू होता. मालिकेतील नारद, सत्यभामा तसेच सरस्वती, सोम, उद्धव, सोपान, कणिका, नंदिनी, शेवंता, मदना ही पात्रे कुठे गायब झाली याचाही संभ्रम प्रेक्षकांना पडला आहे. सध्या विठ्ठलाने आपली सर्व शक्ती चंद्रभागेला अर्पण केली असून ‘कळशीतला विठ्ठल’ या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. आगामी भागात कळशीत स्थित झालेल्या विठ्ठलाला मूर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी पुंडलिकाला कैलासावर जाऊन अमृत आणावे लागेल, असे साक्षात महादेव रुक्मिणीला संकेत देतात. आता ते मिळवण्यासाठी पुंडलिकाचा खडतर प्रवास, वाटेतली संकटे आणि कल्लेश्वराचे आसुरी डाव यात पुन्हा ‘पुंडलिक पुराण’ सुरू होणार असे दिसते आहे. दत्तकथा आणि चरित्राचा आधार घेत सुरू असलेली ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिकाही दिवसेंदिवस रंगत चालली आहे. पुढे मालिकेत दत्तगुरूंचे विविध अवतार पाहायला मिळणार आहेत. आता सुरू झालेल्या पीठापुरातील श्रीपाद वल्लभ या अवताराची लीला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

मालिका जगतात सुरू झालेला पौराणिक पवित्रा आध्यात्मिक आणि अवतारांची माहिती देणारा असला तरी प्रत्येक वाहिनीवर असा पौराणिक आशयाचा भडिमार सुरू झाला तर कोणत्या मालिकेला प्राधान्य द्यावे या विचाराने प्रेक्षक काहीसे दुरावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:02 am

Web Title: marathi mythology serial jai malhar balumama abn 97
Next Stories
1 ‘चाची ४२०’मधली बालकलाकार आता आहे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री
2 हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा – अजय देवगण
3 Photo : चेहरा झाकून व्हिलचेअरवर दिसला इरफान; चाहत्यांमध्ये संभ्रम
Just Now!
X