|| मृणालिनी वनारसे

नाटक आणि अभिनय ही माणसाची उपजत प्रेरणा आहे. तोंडात साखर ठेवून, मिश्कील डोळे करून, ओठांवरचं हसू लपवत ‘मी नाही खाल्ली’ असा ‘अभिनय’ दोन वर्षांचं मूलसुद्धा करतं, हे आपण बघतो. तिथूनच सुरू होतो उत्कृष्ट बतावणीकाराचा प्रवास. हो, नाटक म्हणजे सर्वाच्या अनुमोदनानं केलेली बतावणीच. जे प्रत्यक्षात नाही ते मंचावर उभं करायचं आणि बघणाऱ्या प्रत्येकाला ते आपलंसं वाटेल असं करायचं ही एक प्रकारची बतावणीच. हे नाटकीय बीज कसं पडतं, कसं रुजतं आणि कसं उमलून येतं याच्या कहाण्या आपण आजूबाजूला ऐकतो, आपण स्वत:सुद्धा ते अनुभवलेलं असेल. नाटकाएवढी लवचीक कला दुसरी नसेल. घरात, अंगणात ते हजारो प्रेक्षक मावू शकतील अशा भव्य नाटय़गृहापर्यंत सर्वत्र नाटक सादर होऊ शकते. असं म्हणून सर्व सादरीकरणांना एकाच तराजूत तोलता येईल असं नव्हे. पण नाटक ही अशी कुठेही करा-बघायची गोष्ट आहे एवढं अधोरेखित करायचं आहे. आता जमाना गॅजट्सचा आहे. करमणुकीची व्याख्याच पूर्ण बदलून गेली आहे आणि तरीही नाटक चालूच आहे. आजही रंगमंचावर उन्मेषांची उधळण अविरत चालू आहे आणि त्याला रसिकांची खुली दाद मिळणंही चालूच आहे. नाटक या माध्यमाची ताकद विलक्षण आहे.

मुलांसोबत काम करणाऱ्यांना याचा विशेष अनुभव येतो. ‘चला, नाटक करू या!’ असं म्हटल्यावर ज्यांनी मुलांचे खुललेले चेहेरे पाहिलेत त्यांना हे माहीत आहे. मुलांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसू लागते आणि काहीतरी करून बघण्यासाठी, करून दाखवण्यासाठी ती आतुर असतात. जणू काही आतले कुठले तरी बटण ‘ऑन’ झाल्याप्रमाणे ती नाटक करतात, नाटक घडते. त्यातून मुलं काय काय ‘शिकतात’ याची छाननी करण्यासाठी हा लेख पुरे पडणार नाही. परंतु बरेच काही घडते एवढे निश्चित. एकदा त्याची गोडी लागल्यावर ‘ये दिल मांगे मोअर’ अशीच स्थिती मुलांची असते.

अर्थात हा सगळा अनुभव मी शहरातील किंवा मोठय़ा गावातील मुलांना डोळ्यासमोर ठेवून लिहिते आहे. दूर डोंगरात छोटय़ा छोटय़ा वस्त्यांमधून माणसं राहतात. तशी ती शेकडो र्वष रहात आली आहेत. समाजाच्या मुख्य धारेपासून त्यांचं अस्तित्व काहीसं वेगळं राहिलं आहे. यातल्या काही समूहांना आपण आदिवासी म्हणून ओळखतो. त्यांची भाषा आणि जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळं आहे. तिथल्या मुलांचं काय? तिथे नाटक काय करतं? नाटकाचं तिथे काम काय?

मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर समजावून घेण्यासाठी आधी ‘क्वेस्ट’चं काम समजावून घ्यावं लागेल. क्वेस्ट म्हणजे क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट. म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता साधण्यासाठी आणि राखण्यासाठी काम करणारी संस्था. शिक्षणाचा प्रारंभिक टप्पा पुढील संपूर्ण शिक्षणाचा पाया रचणारा असतो. हा पाया कच्चा राहिला तर शिक्षणाची इमारत कधीच बुलंद होऊ शकत नाही, हे जाणून क्वेस्ट लहान मुलांसोबत मुख्यत: भाषा आणि गणित असे महत्त्वाचे विषय घेऊन काम करते. क्वेस्टचं काम मुख्यत: ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागात चालतं. ठाण्याजवळ वाडा, पालघर या परिसरात मुलांपर्यंत शिक्षणाच्या नव्या कल्पना पोचवण्यासाठी, मुलांसाठी शिक्षण आनंददायी कसं होईल हे बघण्यासाठी क्वेस्टची अविरत धडपड चालू असते. नीलेश निमकर हे शिक्षणतज्ज्ञ क्वेस्टचे संस्थापक, मार्गदर्शक आहेत. त्यांच्यासोबत अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी ही अभिनेता द्वयी आहे. या दोघांच्या सहभागामुळे एक अतिशय वेगळा प्रयोग इथे आकाराला आला आणि तो म्हणजे ‘गोष्टरंग’. नाटक ही वैश्विक भाषा आहे. कोणतंही मूल त्याला प्रतिसाद देऊ शकतं या जाणिवेतून नाटक शिक्षणाशी जोडून घेतलं तर काय होईल? अशा विचारातून ‘गोष्टरंग’ची सुरुवात झाली.

क्वेस्टचं काम ज्या भागांमधून चालतं, तिथली मुलं शहरी, निम-शहरी भागातील मुलांपेक्षा काहीशी वेगळी असतात. त्यांचं जग वेगळं असतं. खुल्या निसर्गाशी त्यांचा संबंध जास्त येतो. पालकत्वाच्या शहरी कल्पना आणि इथलं या मुलांचं वाढणं यातही खूप फरक असतो. ही मुलं, त्यांचं जग आणि औपचारिक शिक्षणप्रक्रिया यांचा एकमेकांशी मेळ बसण्यात अनेक आव्हाने आहेत. नाटक या सर्वामधील पूल ठरू शकतो का? जी मुलं एरवी वर्गात बोलायला कचरतात, फारशी खुलत नाहीत ती नाटकाद्वारे खुलतील का? पुस्तकाच्या जवळ जातील का? या विचारातून  ‘गोष्टरंग’ ही कल्पना आकाराला आली.

कल्पना अशी होती की नाटक करण्यात आणि मुलांसोबत काम करण्यात रस असलेल्या निवडक तरुण मुलांना मुलांसाठी निवडलेल्या गोष्टींवर काम करायला मिळावं, हे करत असताना त्यांना इतर आíथक व्यवधानं नसावीत. वर्षांतले नऊ महिने त्यांनी एकत्र राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने काम करावं. पुस्तकातल्या गोष्टी ‘जिवंत’ कराव्या. त्याचे शाळांमधून प्रयोग व्हावेत आणि मुलांना साहित्याची, नाटकाची गोडी लागावी, त्यांचं शाळेतलं, शिक्षणातलं रमणं वाढावं. या उपक्रमाचं तिसरं वर्ष नुकतंच पार पडलं आणि  जिथे जिथे हा उपक्रम पोचला तिथल्या मुलांचे आनंदी चेहेरे असं सांगतात की ‘गोष्टरंग’चं उद्दिष्ट साध्य होतंय!

आणि का नाही होणार? या सगळ्या प्रक्रियेमागे या सर्व मार्गदर्शक मंडळींनी जो अभ्यास, विचार केलाय, जेवढं नियोजन केलंय ते लक्षात घेता हा उपक्रम एवढा का यशस्वी होतो आहे हे लक्षात यावं. गीतांजली आणि मुलांबरोबर काम करणारे चिन्मय केळकर, प्रसाद वनारसे यांसारखे तिचे दिग्दर्शक मित्र आधी भरपूर गोष्टी वाचतात. विविध भाषांतील उत्तम अशा शंभरेक कथांमधून दरवर्षी सहा गोष्टींची निवड करतात. या निवडीचेही निकष असतात. त्यातील आशय मुलांना, विशेषत: ग्रामीण भागातल्या मुलांना, जवळचा असावा हे बघितलं जातं. विशेष म्हणजे या गोष्टी शहरी भागातली मुलंही बघतात. त्यांनाही त्यात तेवढीच मजा येते. गोष्टीतला एखादा संदर्भ लक्षात नाही आला तरी काही हरकत नाही. नवीन आशय कानावर तर पडतो.

याचीच एक गंमत परवा अनुभवायला मिळाली. २०१८ ते २०१९ या वर्षांत ज्या मुलांनी ‘गोष्टरंग’ उपक्रमात फेलो म्हणून काम केले त्यांचा प्रमाणपत्र प्रदानाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात संपन्न झाला. त्यात ‘गोष्टरंग’च्या कलाकारांनी दोन गोष्टी सादरही केल्या. त्यातील एक गोष्ट होती ‘आमची भन्नाट गाय’. लेखिका महाश्वेता देवी. या गोष्टीतली गाय इतकी भन्नाट आहे की ती एकदा बाहेर पडते ती दिवसभर उंडारून संध्याकाळी घरी येते आणि जिन्याच्या पायऱ्या चढून चक्क गच्चीवर जाते आणि तिथला चारा खाऊ लागते असा उल्लेख आहे. आदिवासी भागातील मुलांना म्हणजे काय झालं असेल हे कळायला अजिबात वेळ लागत नाही. शहरी मुलांना मात्र नेमकं काय झालं हे कसं बरं कळावं! पण त्यानं फार काही अडत नाही. गमतीचा खेळकर वारा कुठेसुद्धा अडत नाही. हे गमतीचं उदाहरण झालं परंतु विविध वयोगटांसाठी गोष्टीचा आशय कसा असावा यावर खूप विचार या उपक्रमात केला जातो.

गोष्टीचं नाटक कसं होतं हा तर स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल इतकं भरभरून याविषयी बोलण्यासारखं आहे. मुलांना पुस्तकाजवळ घेऊन जायचंय. गोष्ट सांगायची आहे, तर त्या गोष्टीतले कळीचे शब्द, गोष्टीतल्या पायाभरणीच्या विटा, आधी नेमक्या हेरल्या जातात. पुस्तकातला शब्द आणि  शरीर, हालचाल, आवाज वापरून पोचवलेला शब्द यांच्यात माध्यमांतर कसे घडते याचा वस्तुपाठच या गोष्टी बघताना मिळतो.

२०१६ साली क्वेस्टचा ‘गोष्टरंग’ हा उपक्रम सुरू झाला, तेव्हापासून दरवर्षी २५०००हून जास्त ग्रामीण आणि आदिवासी मुलांपर्यंत हा उपक्रम पोचला आहे! २०१८-१९ या वर्षांत, ‘गोष्टरंग’ टीम १२००० किलोमीटरचा प्रवास करून, महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे. २०१८-१९ या वर्षांत उर्वराज गायकवाड, गणेश जाधव, दीपाली काळे, ऋचिका खोत, सागर लांडगे या मुलांनी ‘गोष्टरंग’ उपक्रमात फेलो म्हणून काम केलं. विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की ही मुलं महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेली होती. या गोष्टींचं दिग्दर्शन केलं होतं गीतांजली कुलकर्णी आणि चिन्मय केळकर यांनी. मुलांच्या तोंडी सहज खेळू लागेल असं संगीत दिलं होतं शंतनू हेल्रेकर यांनी. चित्रपडदे आणि हस्तवस्तू  बनवून गोष्टी ‘देखण्या’ बनवण्याचं काम केलं होतं पायल पाटील यांनी. प्रकल्पाचे समन्वयक होते पंकज नागपुरे आणि प्रतीक पाटील.

गीतांजली सांगते की, ‘या सगळ्यातून काय हाती लागतं? मुलं गोष्ट बघून झाल्यावर पुस्तक बघायला मागतात. पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला सांगतात. स्वत: वाचतात. अक्षराप्रत एक पाऊल मत्रीचं पडतं. ग्रामीण आणि आदिवासी भागात लेखन आणि वाचन ही काही शहरी भागाइतकी सरसकट आढळणारी गोष्ट नाही. शहरातूनही ती झपाटय़ाने लुप्त होते आहे. पण आजमितीस औपचारिक शिक्षण ही गरज मानली तर लेखन-वाचन कौशल्याला पर्यायही नाही. तिथे या दुर्गम भागातल्या मुलांना ‘गोष्टरंग’ एक मजेचा, प्रेमाचा, उल्हासाचा हात देते आहे. आणि मुलं तो हात पकडून अक्षराच्या वाटेवर खेळीमेळीत चालताना दिसताहेत. ‘गोष्टरंग’कडून अजून काय हवं होतं?’

आता या उपक्रमाला गरज आहे ती आíथक पाठबळाची आणि मुलांसाठी काही करू इच्छिणाऱ्या सुहृदांच्या सक्रिय सहभागाची. हा उपक्रम आता मूळ पकडतो आहे, पण तो असा निदान दहा र्वष चालला तर त्याचे परिणाम दिसू लागतील. त्यासाठी पुढे येणाऱ्यांचं ‘गोष्टरंग’ स्वागत करतं.