|| रवींद्र पाथरे

भूप्रदेश कुठलाही असला तरीही मानवी नातेसंबंधांची वीण तीच असते. चाळीसेक वर्षांपूर्वी नाटककार महेश एलकुंचवार यांनी विदर्भातील धरणगावकर देशपांडे या जमीनदार कुटुंबातील नातेसंबंधांचं आणि बदलत्या काळाबरोबर होणाऱ्या ऱ्हासाचं हृदयस्पर्शी, तितकंच वास्तवदर्शी चित्रण ‘वाडा चिरेबंदी’ नाटय़त्रयीमध्ये केलं होतं. अगदी तशाच तऱ्हेचं चित्रण लेखक-दिग्दर्शक-नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार आणि पाश्र्वसंगीतकार अशा ‘सब कुछ’ भूमिकेतील प्रदीप वैद्य यांनी ‘काजव्यांचा गाव’ या नाटकात केलेलं आहे. फक्त माती बदलली आहे. विदर्भाऐवजी कोकणच्या तांबडय़ा मातीत हे नाटक घडतं, इतकंच. ‘काजव्यांचा गाव’ बघताना ‘वाडा..’ मनाच्या पाश्र्वभागी सतत निनादत राहतं. याचं कारण ‘वाडा’तले अनेक संदर्भ जवळजवळ जसेच्या तसे इथंही समांतरपणे आलेले दिसतात. म्हणजे गावाकडे मागे राहिलेला भाऊ, शहरात राहणाऱ्या भावाला तो एकटाच गावचं उत्पन्न खातोय असं वाटणं, ‘वाडा’मध्ये जशी उपेक्षित धाकटी बहीण प्रभा आहे, तशीच इथंही शांता आहे (मात्र, शांता थोडीशी वेगळी आहे. तिला ‘स्व’चं भान आहे. आणि ती खंबीरपणे उभी आहे!). इथे शहरातला मोठा भाऊ परस्परच घरचा सागवान विकतो. गावातील धाकटय़ाला या गोष्टीचा पत्ताच नसतो. ‘वाडा’मध्ये अभय परदेशी जातो, इथं एक बहीण प्रतिभा ‘स्व’च्या शोधार्थ अमेरिकेला गेली आहे. ‘वाडा’त आप्पाजींचं निधन झाल्याने सगळे जण एकत्र आलेत, तर इथं आईच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं सारे एकत्र आलेत. परंतु भावाभावांतील भांडणामुळे उद्वेगग्रस्त झालेली आई अचानक जाते. तिच्या पश्चात वाटणी करण्यावरून भावंडांत बेबनाव उभा राहतो. ‘वाडा’प्रमाणेच इथंही पुढच्या पिढीतील चुलत-आत्ये-मामे भावंडांचं एकमेकांत छान गूळपीठ आहे..

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
Construction of 121 artificial reefs on Konkan coast for fish conservation
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी

थोडक्यात, ‘काजव्यांचं गाव’ हे कोकणच्या तांबडय़ा मातीतलं ‘वाडा चिरेबंदी’च आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. फक्त काळ वेगळा आहे. २००७ चा. म्हणजे बराच अलीकडचा. तरीही कोकणातील या खेडय़ात विजेचा लपंडाव सुरूच आहे. फोन उठसूठ ‘डेड’ होतात. गावातल्या दोन-चार जणांकडे मोबाइल आले असले तरी त्याची रेंज मिळणं दुष्प्राप्य. अशा गावातलं एक कोकणस्थ ब्राह्मण कुटुंब. आई ऐंशीच्या घरातली. मोठा मुलगा भाऊ चिपळुणात नोकरी करणारा. त्याचा अधूनमधून फिट्स येणारा मुलगा गणेश याला त्यानं गावीच ठेवलेलं. धाकटा आप्पा गावचं सारं बघतो. त्याची बायको वसुधा आणि मीना व दीपा या दोन मुली. शाळेत जाणाऱ्या. शांता ही त्यांची लग्न न झालेली आत्या. ती गावात शिक्षिका आहे. तिचं आणि शाळेतले गडकरी नावाचे एक मुस्लीम शिक्षक यांचं प्रेम असल्याची गावात कुजबूज आहे. मात्र, त्यांनी लग्न न करता फक्त मित्र म्हणूनच राहण्याचं ठरवलेलं. मोठी बहीण ताई लग्न होऊन पुण्यात स्थायिक असलेली. तिची कॉलेजवयीन मुलगी श्वेता तिच्या एका मित्राला- चिन्मयला घेऊन आजीच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याकरता गावी आलीय. आणखी एक बहीण प्रतिभा खूप वर्षांमागे कुणाला न सांगतासवरता गाव सोडून मुंबईला गेलेली.. अन् तिथून अमेरिकेला. तिथं तिचं आज व्यवस्थित बस्तान बसलंय. ती अमेरिकी अल्बर्टबरोबर लिव्ह-इन्मध्ये राहतेय.

प्रतिभा आणि ताईनं मिळून आईचा ऐंशीवा वाढदिवस साजरा करण्यााचा घाट घातलेला. सगळा खर्च आपण दोघीनी करायचा असं त्यांचं आधीच ठरलेलं. आपल्याला या समारंभात काही स्थान नाही म्हणून भाऊ आणि आप्पा नाराज झालेले. आईचा वाढदिवस साजरा करण्याला म्हणून त्यांचा विरोध आहे. पण पैसेवाल्या बहिणींपुढे त्यांचं काही चालत नाही. म्हणून त्यांनी मग शरणागती पत्करलेली. आईकडे मात्र  ते आपली ही नापसंती बोलून दाखवतात. तेव्हा आई ‘नको आहे मलाही हा वाढदिवस. रद्द करा तो..’ असं त्राग्यानं म्हणते. परंतु ताई आणि प्रतिभानं काहीही झालं तरी आईचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा करायचाच, हा निर्धार केलेला.

बिचाऱ्या वसुधाची (आप्पाची बायको) यात कोंडी होते. ती सर्वाना समजून घेणारी. समंजस स्वभावाची. पण घरीदारी कसलाच हक्क नसलेली. नातवंडांना मात्र आपल्या आज्जीचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून कोण आनंद झालेला! खरं तर आप्पालाही आईचा वाढदिवस साजरा करायला हवा असं वाटतं. परंतु पैशाकडनं त्याचं घोडं पेंड खात असलेलं. तशात भाऊच्या सततच्या आडमुठय़ा वागण्यानं तो आधीच करवादलेला. आतल्या आत धुमसत असलेला.

एकेक करून सगळे जण गावी येऊन पोहोचलेले. अशात ताईने आईच्या वाढदिवसाकरता म्हणून पाठवलेले दहा हजार रुपये फडताळातून गायब झाल्याचं वसुधाच्या लक्षात येतं. पैसे गेले कुठे, तिला कळत नाही. ते भाऊनंच घेतल्याचा आप्पाला पक्का संशय. कारण गावी आला की तो हाताला लागेल ते घेऊन चिपळुणास जातो, हे त्याला ठाऊक. आता तर हा कडेलोटच झालेला. भाऊचं हे कर्म आप्पा बहिणींच्या कानी घालतो. आणि भांडणाला तोंड फुटतं. आपल्यावर आता प्रकरण शेकणार असं दिसताच भाऊ सरळ ‘इस्टेटीची वाटणी करा’ची भाषा काढतो. त्यांच्यातल्या भांडणास आवर घालायचा आई आपल्या परीनं प्रयत्न करते, पण तिचं कुणीच ऐकत नाही. अशात हृदयविकाराचा झटका येऊन ती कोसळते. तिला चिपळुणात हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं, परंतु ती जातेच. तिचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा करण्याची दोघा बहिणींची इच्छा अधुरीच राहते.

आईचं कार्य उरकेतो सर्वानाच तिथं थांबणं भाग असतं. या दरम्यान ताई आणि प्रतिभाला आपल्या घराचं, तिथल्या माणसांचं जे दर्शन घडतं, ते म्हणजेच ‘काजव्यांचा गाव’!

शीर्षकावरून हे एखादं रोमॅण्टिक नाटक असावं असा समज होतो. परंतु प्रत्यक्षात गतरम्यतेचा एक तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली धरून तो अवलोकणारं हे नाटक आहे. यातली माणसं मूलत: वाईट नाहीत. परिस्थिती, एकमेकांबद्दल करून घेतलेले समज-गैरसमज, ग्रह-पूर्वग्रह त्यांच्यात बेबनाव निर्माण करतात. परस्परांशी संवाद न साधता आपल्याला वाटतं तेच खरं असं समजून जो वर्तनव्यवहार सर्वाकडून होतो, त्यातून ही दरी आणखीन रुंदावत जाते. ताई आणि प्रतिभा या सर्वापासून दूर असल्याने त्या त्रयस्थ तटस्थतेनं घडलेल्या गोष्टींकडे पाहू शकतात.. त्या आकळून घेऊ शकतात. यातल्या प्रत्येकानं आपल्या वर्तनव्यवहारासाठी आपल्यापुरता तार्किक आडोसा शोधलेला असतो. आणि तेच वास्तव आहे असं समजून ते चाललेले असतात.

यानिमित्तानं आई, शांता, प्रतिभा, वसुधा, श्वेता, मीना, दीपा, गणेश, भाऊ, आप्पा, ताई अशा सगळ्यांचीच आयुष्यं परस्परांसन्मुख येतात. त्यांच्यात संवाद-विसंवाद होतो. परस्परांचं म्हणणं सामोरं येतं. दुसऱ्याला समजून घेण्याची प्रक्रिया सुरू होते. ग्रह-पूर्वग्रहांची जळमटं थोडी दूर होतात. त्यामुळे याउपरान्त या सर्वाची आयुष्यं आधी होती तशीच राहण्याची शक्यता राहत नाही..

‘काजव्यांचा गाव’मध्ये या कुटुंबाबाहेरचीही माणसं आहेत.. चिन्मय, कासीम, देवळातले भटजी आणि गडकरी सर! त्यांच्यायोगे या कुटुंबाचा भोवतालही स्वच्छपणे समोर येतो. हे गाव परंपरानिष्ठ असलं तरीही शांता आणि मुस्लीम गडकरी सर यांच्यातलं नातं कुजबुजीच्या पलीकडे जात नाही. उभय समाजांत द्वेष पसरवीत नाही, ही दखलपात्र बाब आहे. लाकडांचा व्यापारी कासीम हा व्यवहारी असला तरी अडेलतट्टू नाही. भटजी मात्र कर्मठ आहेत. पण त्याने फार फरक पडत नाही. एकुणात, कोकणातल्या एका प्रातिनिधिक कुटुंबातले ताणेबाणे ‘काजव्यांचा गाव’मध्ये पाहायला मिळतात.

नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनासह ‘सब कुछ’ जबाबदाऱ्या पेलणाऱ्या प्रदीप वैद्य यांच्यावरील ‘वाडा चिरेबंदी’चा गहिरा प्रभाव दृष्टीआड करता येत नाही. किंबहुना, रंगमंचावर प्रेक्षकांना बसवून त्यांच्या अवतीभवतीच नाटक घडवण्याचा त्यांचा अट्टहास वगळता ‘वाडा’च्या पल्याड हे नाटक जात नाही. मात्र, प्रेक्षकांना रंगमंचावर बसवण्याच्या त्यांच्या निर्णयाने कलाकार आणि नाटकावरही अन्याय झाला आहे. एक चांगली कलाकृती पुरेपूर न आस्वादता येण्याची चुटपूट प्रेक्षकांना लागून राहते. नाटकातील घटना वेगवेगळ्या स्थळी घडत असल्याने आणि प्रेक्षकांच्या अवतीभोवतीच त्या घडवण्याच्या अट्टहासापायी काही कोनांतून प्रेक्षकांना त्या नीटशा अनुभवता येत नाहीत. हे कलाकारांवरही अन्याय करणारं आहे. त्यांच्या पाठमोऱ्या प्रसंगांत फक्त संवादांतून तो प्रसंग आकळून घ्यावा लागतो. या प्रयोगासाठी ‘प्रयोग’ हट्टाग्रहाची काहीच गरज नव्हती.

कोकणातलं खेडं वैद्य यांनी सूचक नेपथ्यातून आकारलं आहे. पूर्वीच्या काळी जसे स्थलनिदर्शक पडदे वापरत, तसे नारळी-पोफळीची बाग वगैरे दाखवणारे रंगवलेले पडदे, गोधडी, आंब्याच्या पेटय़ांनी विभागलेला प्रेक्षकवर्ग, जागोजागी लावलेले वातीचे कंदील, देऊळ, घराचा व्हरांडा दर्शवणारी जाळीदार फ्रेम आदींचा वापर वैद्य यांनी नेपथ्यासाठी केला आहे. गोधडीची प्रतीकात्मकताही चपखल. प्रेक्षक रंगमंचावरील आसनव्यवस्थेकडे जाताना नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारापाशीच्या काजू, आंब्याची साटं वगैरे कोकणी वाळवणाने प्रेक्षकांना आपण कोकणात आल्याची जाणीव करून देणारी क्लृप्ती दाद देण्याजोगी. प्रकाशयोजनेतून प्रदीप वैद्य यांनी तरल वातावरणनिर्मिती केली आहे. दिवस-रात्रीचे विविध प्रहर आणि मूड्स त्यातून संक्रमित होतात. मोजक्याच पाश्र्वसंगीताचा खुबीने वापर केला गेला आहे. दिग्दर्शक म्हणून हा सारा पसारा वैद्य यांनी प्रेक्षकांना विश्वासात घेत योजला आहे. नाटकात प्रेक्षकांनाही सहभागी करून घेण्याची संकल्पना मात्र अनाठायी आहे. तरी नाटक प्रेक्षकांना बांधून ठेवतं ते त्यातल्या आशयाने आणि सादरीकरणातील उत्कटतेमुळं!

कलाकारनिवडीचे शंभरपैकी दोनशे मार्क्‍स प्रदीप वैद्य यांना द्यायला हवेत. त्या- त्या भूमिकेत दुसऱ्या कुणाची कल्पनाच करता येऊ नये इतकी मन:पूत कामं सर्व कलाकारांनी केलेली आहेत. राधिका हंगेकर (आजी), रूपाली भावे (ताई), आशीष वझे (आप्पा), निखिल मुजुमदार (भाऊ), मधुराणी प्रभुलकर (प्रतिभा), सायली सहस्रबुद्धे (शांता), प्रिया नेर्लेकर (वसुधा), संयोगिता पेंडसे (श्वेता), सौरभ मुळे (चिन्मय), यश पोतनीस (गणेश), मयुरी चौधरी (मीना), मुक्ता सोमण (दीपा), विक्रांत ठकार (गडकरी सर), समीर जोशी (कासीम/ भटजी) या सर्वाचंच त्यासाठी मनापासून कौतुक. कोकणच्या नितांतसुंदर भूमीतलं ‘वाडा..’ अनुभवण्यासाठी हे नाटक नक्की पाहायला हवं.