18 November 2019

News Flash

‘खळी’ रखडलेल्या लग्नाची नेटकी गोष्ट

परिस्थिती, अवास्तव अपेक्षा, रंग-रूप, लग्नाबद्दलचे वेगळे विचार अशा नाना कारणांनी अनेकांची लग्नं रखडतात.

|| रवींद्र पाथरे

परिस्थिती, अवास्तव अपेक्षा, रंग-रूप, लग्नाबद्दलचे वेगळे विचार अशा नाना कारणांनी अनेकांची लग्नं रखडतात. काहींना घरच्या जबाबदाऱ्यांमुळे लग्नाचा विचार पुढे ढकलावा लागतो, तर काहींना आर्थिक परिस्थितीमुळे. काहींच्या बाबतीत जोडीदाराबद्दलच्या अवास्तव अपेक्षा लग्न जमण्यात अडथळे निर्माण करतात, तर काहींची कसलीच तडजोड करायची तयारी नसल्याने त्यांचं लग्न जमत नाही. काही जणांच्या बाबतीत रंग-रूप आडवं येतं. काहींच्या घराण्याची प्रतिष्ठा लग्नात मोडता घालते. जातपात, धर्म, प्रदेश, भिन्न संस्कृती या बाबीही कधी कधी लग्नात खोडा घालतात. काहींना प्रचलित विवाहसंस्थेतले दोष खडय़ासारखे बोचत असल्याने ते लग्न या विषयापासून दूर राहतात. परंतु जसजसं वय वाढत जातं तसतसं एकाकीपण खायला येतं त्यांना. आणि मग वय उलटून गेल्यानं लग्न होणं दुरापास्त होतं. हल्ली लग्नापेक्षा ‘लिव्ह इन्’मध्ये राहणं तरुणाई पसंत करते. अशा संबंधांत उभयतांचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याची पूर्वअट असल्याने कुणी कुणाच्या अवकाशावर आक्रमण करणं त्यांना मंजूर नसतं. अशा नात्यात लग्नातून येणाऱ्या टिपिकल जबाबदाऱ्यांचा काच नसतो. तसंच परस्परांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्यास कुणी बांधील नसतं. पटेल तितके दिवस एकत्र राहायचं; न पटलं तर सरळ वेगळं व्हायचं. लग्नाच्या नवरा-बायकोप्रमाणे एकमेकांच्या पायांत पाय अडकून तीन पायांची शर्यत होण्याची धास्ती नाही. काही कारणाने ओझं होऊ घातलेलं नातं नाइलाजानं निभावण्याची सक्ती यात नाही. परंतु तरीही ‘लिव्ह इन्’ हा लग्नसंस्थेला ‘फूलप्रूफ’ पर्याय  आहे का? तर- ‘नाही’ असंच त्याचं उत्तर मिळतं. असो.

नमनाला हे असं घडाभर तेल ओतायचं कारण.. ‘नाटय़मंदार’ निर्मित, शिरीष लाटकर लिखित-दिग्दर्शित ‘खळी’ हे नाटक! हे नाटक रखडलेल्या लग्नाची गोष्ट पेश करतं. मानव हा रेशनिंग खात्यात नुकताच ऑफिसरपदी पोचलेला पस्तीशीचा तरुण. मोठा भाऊ या नात्यानं घरच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता लग्नाचं वय उलटून गेलेलं. तशात धाकटी बहीण- चिंगी दिसायला डावी असल्यानं तिचं लग्न जमवण्याच्या खटपटी करताना त्याचं वय आणखी वाढत गेलेलं. तिचं लग्न जमावं म्हणून मानव तिला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जातो. उपासना नावाची तरुणी हे पार्लर चालवते. तीही पस्तीशीकडे झुकलेली. जोडीदाराबद्दलच्या तिच्या अपेक्षांमुळे तिचंही लग्न अद्याप झालेलं नाहीए. उपासना गोरीपान, सुंदर. स्वत:च्या हिमतीवर पार्लर चालवणारी. एकेकाळी कॉलेजात असताना ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाणारी. साहजिकपणेच तिच्या अपेक्षा आपल्यापेक्षा जोडीदार कांकणभर जास्त देखणा, उत्तम आर्थिक स्थितीतला असावा.. वगैरे असण्यात गैर ते काय? अर्थात तिच्या या अपेक्षा अवाजवी म्हणता येणार नाहीत. परंतु तरीही या अपेक्षांमुळेच तिचं लग्न रखडलंय.

मानव चिंगीला घेऊन उपासनाकडे येतो तो तिनं चिंगीच्या रंगरूपात डागडुजी करून तिला आकर्षक, लग्नायोग्य करावं म्हणून! उपासनाला जरी हे (लग्न जमण्यासाठी मुलींना असं ‘नटवणं’!) भयानक वाटत असलं तरीही तेच समाजवास्तव आहे, हे मानव तिला समजावतो. तिला ते पटलेलं नसलं तरीही चिंगीचं लग्न व्हावं म्हणून ती तिच्यावर सौंदर्योपचार सुरू करते.

यादरम्यान, मानव उपासनाशी जवळीक साधण्याचा खूप प्रयत्न करतो. तिच्या एकारलेल्या आयुष्यातलं वैय्यथ्र्य जाणवून देण्याचा प्रयास करतो. पण ती आपल्या विचारांशी ठाम असते. केवळ लग्न व्हावं म्हणून आपण आपल्या अपेक्षांशी तडजोड करणं तिला मान्य नसतं. तरी मानवचे प्रयत्न जारी राहतात. तिच्या दगडी मुखवटय़ावर एखादी तरी स्मितरेषा उमटावी म्हणून तो भरपूर प्रयत्न करतो. परंतु ती त्याचे प्रयत्न हाणून पाडते. चिंगीला आपल्या भावाच्या उपासनाप्रतीच्या भावना समजून चुकतात. तथापि, कान आणि मन बंद केलेल्या व्यक्तीची कवाडं उघडणं अवघड असतं हे मानव जाणून असतो. मात्र, तरी त्याचं उत्खनन सुरूच राहतं. एक दिवस या दगडाला पाझर फुटेल अशी त्याची श्रद्धा असते.

उपासनेच्या ‘कारागिरी’ला यश येतं आणि चिंगीचं लग्न ठरतं. मानव सर्वप्रथम ही आनंदाची बातमी उपासनाला जाऊन सांगतो. ही बातमी ऐकूनही तिचं शुष्क, कोरडं वागणं बदलत नाही. मग चिंगीच पुढाकार घेऊन उपासनावर ‘उपचार’ करते..

लेखक-दिग्दर्शक शिरीष लाटकर यांनी एका सामाजिक समस्येला हात घालणारं हे नाटक हलक्याफुलक्या शैलीत लिहिलं व बसवलं आहे. फक्त गोची अशी झालीय, की या कथाबीजाला अन्य मितीच (डायमेन्शन्स) नाहीत. ते एका ठरावीक चाकोरीत रेंगाळत राहतं. उपासना आणि चिंगी ही पात्रं लाटकर यांनी नैसर्गिक शैलीत चितारली आहेत. तथापि, मानव हा काहीसा रोमॅंटिक रूपात रंगवला आहे. त्याच्या तोंडची भाषा उपमा, अलंकारयुक्त आहे. जी- तो ज्या परिस्थितीतून गेला आहे/ जातो आहे, त्याच्याशी विसंगत आहे.. अनैसर्गिक वाटावी अशी आहे. मानव दिसण्यात सामान्य आहे. त्यातून त्याच्यात एक न्यूनगंड निर्माण झालाय; जो संभाषणातील फुलोऱ्यानं तो सतत नाकारत राहतो. सुभाषितवजा बोलण्यानं समोरचं वास्तव बदलत नसतं. त्यामुळे तो अधिकच केविलवाणा वाटायला लागतो. मात्र, लेखकाला तो तसा अपेक्षित नसावा. प्राप्त परिस्थितीशी सामना करताना त्याने घेतलेली ती पोझ असावी. नाटक उपासनाच्या पार्लरभोवतीच रचलेलं असल्याने प्रसंग रेखाटनाला मर्यादा पडल्या आहेत. ज्यामुळे नाटक ‘प्रेडिक्टेबल’ झालं आहे. उपासनाचे लग्नाबद्दलचे विचार आणि त्यावर तिचं ठाम असणं- यथायोग्यरीत्या नाटकात येतं. मात्र, तिने स्वत:भोवती (आपल्या भावभावनांभोवती!) उभी केलेली दगडी करकरीत भिंत शेवटी ढासळते. तिचा हा विजय म्हणायचा की पराजय, हे निश्चितपणे सांगता येत नाही. नाटकाच्या सुखान्तासाठी ते आवश्यक असेलही; परंतु तिच्या रास्त अपेक्षांचं काय?

नाटक एका संथ लयीत पुढे सरकत राहतं. त्यात चढउतार, नाटय़पूर्णतेचा अंश फार कमी आहे. तरीही ते प्रेक्षकाला धरून ठेवतं ते त्याच्या (पक्षी : प्रेक्षकाच्या) ‘विशफूल थिंकिंग’मुळे! नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी उभारलेलं ब्युटी पार्लर व मानवचं सूचक घर नाटकाची मागणी पुरवणारं आहे. महेश नाईक यांचं संगीत आणि शीतल तळपदेंची प्रकाशयोजना नाटकातले तणावपूर्ण क्षण अधोरेखित करतात.

संदेश जाधव यांनी साकारलेला मानव परिस्थितीनं पिचलेला, तरीही आला दिवस हसून साजरा करणारा आहे. मानवची सकारात्मक वृत्ती, आपल्या आतल्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी त्याने स्वीकारलेला फुलोरायुक्त भाषेचा अट्टहास, त्याला जगण्यातून आलेली शहाणिव, घरातल्या थोरल्या भावाच्या वाटय़ाला येणारे अटळ भोग जबाबदारी म्हणून पत्करण्याची त्याची वृत्ती, उपासनाबद्दल त्याला वाटणारी आसक्ती हे सारं संदेश जाधव यांनी कुठल्याही अभिनिवेशाविना सहज व्यक्त केलं आहे. पूजा रायबागी यांची उपासना वरकरणी कठोर, शुष्क; परंतु अंतर्यामी खचत चाललेली अशी आहे. मानवच्या रूपात एक आशा तिच्यापाशी चालत येते आणि तिने स्वत:भोवती उभारलेलं काटेरी कुंपण हळूहळू तिच्याही नकळत वितळत जातं. मानव आपल्या अपेक्षांच्या आसपासही नाहीए याची तिला स्वच्छ जाणीव आहे. त्यामुळेच ती त्याला प्रारंभी धुत्कारत राहते. पण एका क्षणी तिला वास्तव स्वीकारणं भाग पडतं. आपल्यावर अबोल प्रेम करणारा हा माणूस आपल्या अपेक्षांना उतरणारा नसला तरीही सच्चा आहे. तो आपल्याला सुखी करण्यासाठी नक्कीच धडपडेल, हे तिला जाणवतं. त्याच्या दिसण्याकडे थोडा काणाडोळा करावा लागेल, हे खरंय; पण आपलंही वय उताराकडे चाललंय याची जाणीव तिला आहे. या साऱ्याचा परिणाम उपासनाने मानवला स्वीकारण्यात होतो. चिंगीची भूमिका साकारणाऱ्या नेहा तेलवणे भूमिकेनं फारसं काही दिलेलं नसतानाही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात.

First Published on June 15, 2019 11:36 pm

Web Title: marathi natak 9
Just Now!
X