02 March 2021

News Flash

स्मार्ट प्रेमाख्यान!

सत्तर-ऐंशीच्या दशकांत कथाकार व. पु. काळे यांनी वाचकांवर भलतंच गारुड केलं होतं.

सत्तर-ऐंशीच्या दशकांत कथाकार व. पु. काळे यांनी वाचकांवर भलतंच गारुड केलं होतं. चाकोरीबाहेरचे स्मार्ट नायक/ नायिका, नाकासमोरचा रस्ता सोडून अनवट वाटेनं त्यांना खुणावणं, त्या वाटेवरचं त्यांचं जगणं, विचार करणं.. आणि या सगळ्या गोष्टींची सांगड घालत योजलेलं चमकदार कथाबीज व त्याची आकर्षक मांडणी आणि चमत्कृती यांतून मध्यमवर्गीय वाचकांना एका आभासी विश्वात घेऊन जाण्याचं सामर्थ्य वपुंच्या लेखणीत होतं. याच काळात विजय तेंडुलकर, गंगाधर गाडगीळ प्रभृती लेखक मंडळी मध्यमवर्गीय जीवनाचं रोखठोक वास्तव मांडत असताना व. पु. मात्र मध्यमवर्गाच्या मनातील स्वप्नांना पंख देत आपल्या लेखनातून (आणि कथाकथनाद्वारे!) त्यांची नजरबंदी करीत होते. वपुंच्या आकर्षक, डौलदार शैलीचेही बरेच चाहते होते. पहिलटकर वाचक, तसंच डोक्याला ताप देणारं साहित्य नको वाटणारे वाचक वपुंच्या कथांनी मंत्रमुग्ध होत. आपल्या जाणिवा विस्तारू इच्छिणारे, मानवी जीवनातील सूक्ष्म पदर जाणून घेऊ पाहणारे वाचक मात्र यथावकाश वपुंना ओलांडून पुढे जात. अर्थात आजही वपुंचा मोठा चाहतावर्ग आहे.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांत काळ बदलला, जीवनाची गती बदलली.. प्रचंड वेगवान झाली. त्याबरोबरच माणसाचं जगणंही खूप व्यामिश्र, गुंतागुंतीचं झालं. मूल्यांची पडझड झाली. जागतिकीकरणापश्चात काळाची पावलं ओळखून मध्यमवर्गानं आपल्या जगण्याची दिशा बदलली. ‘मी, माझं, मला’ याभोवतीच त्याचं विश्व केंद्रित झालं. अशा आमूलाग्र बदललेल्या काळात वपुंचं साहित्य कालबाह्य़ होणं स्वाभाविक होतं. तसं ते अनेकांचंच झालंय. आज वपुंचं साहित्य वाचताना आपण हे जग मागे सोडून कितीतरी पुढे आलो आहोत याची तीव्रतेनं जाणीव होते. आज हे ‘वपु’पुराण लावलं आहे ते अशाकरता- की त्यांच्या ‘तू भ्रमत आहासि वाया’ या कादंबरीवर आधारित ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे. जगण्यातील मूल्यांसंबंधी काहीएक भाष्य करू पाहणारं हे नाटक आहे. काळावर मात करून टिकू शकणाऱ्या वपुंच्या मोजक्या लेखनापैकी ही एक कादंबरी. विशेषत: त्यातलं आशयसूत्र! सगळ्या गोष्टी पैशांत आणि व्यवहारवादी फुटपट्टीनं तोलणाऱ्या आजच्या जगाचं दर्शन त्यात आहे. यातला ओंकारनाथ हा एक यशस्वी व्यावसायिक. पैशानं काहीही विकत घेता येतं असं मानणारा. प्रत्येक गोष्ट व्यावहारिक लाभ-हानीचा विचार करूनच करणारा. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांशी त्याची वागण्याची पद्धतही तशीच. तुसडी. त्यांना कस्पटासमान लेखणारी. प्रत्यक्ष लग्नाच्या बायकोसोबतचा त्याचा व्यवहारही असाच. भावनाहीन. व्यापारी वृत्तीचा. विनिता (त्याची बायको) हीसुद्धा जणू त्याचीच प्रतिकृती. नवऱ्याला त्याच्या कलानं थोडंसं ‘सहन’ केलं की बाकी मग आपलंच राज्य.. आपण म्हणू ती पूर्व दिशा.. असं मानणारी.

अशात सायरा नावाची एक मुलगी ओंकारनाथच्या ऑफिसमध्ये त्याची स्वीय साहाय्यक म्हणून रुजू होते आणि ऑफिसमधलं सगळं वातावरणच बदलतं. स्पष्टवक्ती, विचारी आणि कुणालाही तोंडावर खरं-खोटं सुनावू धजणारी सायरा ओंकारनाथलाही आरसा दाखवायला कमी करत नाही. प्रारंभी तिच्या या उद्धटपणामुळे संतापणारा ओंकारनाथ तिच्या बोचऱ्या प्रश्नांतील सत्य जाणवू लागल्यावर हळूहळू अंतर्मुख होत जातो. आपला बेमुर्वतखोरपणा, समोरच्याचा उठसूट पाणउतारा करण्याच्या आपल्या स्वभावाची त्याला जाणीव होते. सुरुवातीला सायराची चीड येणारा ओंकारनाथ नंतर तिच्याच आरशातून स्वत:कडे पाहू लागतो, तशी त्याला आपल्या माणुसकीहीन वागण्याची शरम वाटते. आपली व्यापारी वृत्ती आणि ‘सब घोडे बारा टक्के’ ही वागण्याची पद्धत अनुचित आहे हे त्याला जाणवतं. आणि आपल्या या वागण्यामुळे निर्माण झालेल्या व्यक्तिगत आयुष्यातील रीतेपणाचीही तीव्र जाणीव होते.

आणि मग तो स्वत:ला बदलू इच्छितो.. बदलतोही. आयुष्यात प्रेमाची माणसाला आत्यंतिक गरज असते आणि ते मिळवण्यासाठी आपण स्वत:ही दुसऱ्यावर तितकंच निरपेक्ष प्रेम करावं लागतं, ही जाणीव त्याला आमूलाग्र बदलवते. आणि मग सायराही आपलं विहित कार्य संपवून त्याच्यापासून दूर जाते..

वपुंच्या ‘तू भ्रमत आहासि वाया’ या कादंबरीचं दिग्पाल लांजेकर यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटय़रूपांतर (आणि त्याचं दिग्दर्शनही!) केलं आहे. खरं तर ओंकारनाथच्या मनात द्वंद्व निर्माण करणारं त्याचं ‘प्रति-मन’च सायराच्या रूपानं यात अवतरलं आहे. नाटकात सायराचं आयुष्यही समांतरपणे आपल्यासमोर येत राहतं; मात्र ते पाश्र्वभूमीला आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या नाटय़-रूपांतरात  कथेतील पात्रांना आपापला यथार्थ सूर आणि नूर(ही) सापडलेला नाही. ओंकारनाथच्या ऑफिसमधील मनोज व वाकनीस या पात्रांना नाटकात कसलीच ‘भूमिका’ नाही. मग त्यांचं प्रयोजन काय, असा प्रश्न पडतो. हेच मंडलिकांच्या (अतुल महाजन) बाबतीतही. त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान नेमकेपणानं नाटकात व्यक्त होत नाही. ते काहीसं सबगोलंकारी बोलत राहतात. त्यात सायराला विशेष असं काय आढळतं, तिचं तीच जाणो. खरं पाहता हे अडीचच पात्रांचं नाटक आहे. ओंकारनाथ, सायरा आणि विनिता यांचं. त्यातही ओंकारनाथ आणि सायरा यांच्याभोवतीच ते बहुश: फिरतं. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना या नाटकात प्रेमाचं तत्त्वज्ञान लोकांसमोर मांडायचं आहे खरं; परंतु त्यांना ते अपेक्षित परिणामकारकतेनं मांडता आलेलं नाही. लेखक म्हणून याकामी ते थोडेफार यशस्वी झाले असले तरी दिग्दर्शक म्हणून मात्र कमी पडले आहेत. ओंकारनाथ हा अत्यंत निष्ठुर, आपमतलबी आणि व्यापारी वृत्ती हाडीमासी भिनलेला माणूस आहे. प्रयोगात मात्र अजय पूरकर जो ओंकारनाथ रंगवतात तो कमालीचा स्वार्थी, स्वकेंद्री आणि पुरेपूर ‘व्यापारी’ असायला हवा होता. प्रत्यक्षात ओंकारनाथ आपण तसे असल्याचं ‘नाटक’ करतो आहे असं वाटतं. हा पूरकरांच्या अभिनयातला दोष आहे. ‘कोडमंत्र’मधील कर्नल त्यांनी ज्या निष्ठुर आणि भावनाहीन वृत्तीनं वठवला आहे, यातला ओंकारनाथही तसाच असणं अपेक्षित आहे. तर आणि तरच त्याचं नंतरचं हृदयपरिवर्तन स्वीकारार्ह वाटलं असतं. उत्तरार्धात मात्र अजय पूरकर बदललेल्या ओंकारनाथला योग्य तो न्याय देतात. तीच गोष्ट सायराची (किरण खोजे)! ती ज्या ‘टोन’मध्ये बॉस ओंकारनाथशी बोलते तो सरळसरळ उद्धटपणाचा नमुना आहे. त्याला स्पष्टवक्तेपणा म्हणत नाहीत.

स्पष्टवक्तेपणा आणि उद्धटपणा यांत बराच फरक आहे. प्रमुख पात्रांच्या या गैर अभिनयशैलीमुळे नाटक कृतकतेकडे झुकलं आहे. यातलं विनिता (अश्विनी कुलकर्णी) हे एकमेव पात्र तिच्या ‘असण्या’शी प्रामाणिक राहिलं आहे. दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांचं हे अपयश आहे. सचिन देशपांडे (वाकनीस), तेजस कुलकर्णी (मनोज), नितीश घारे (पंकज) या कलाकारांनी आपलं विहित काम चोख केलं आहे. बाकी तांत्रिक बाबी नाटकाची मागणी पुरवतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 1:42 am

Web Title: marathi natak dhaai akshar prem ke
Next Stories
1 खेळापलीकडचा चरित्रपट!
2 ‘पुष्पावल्ली’च्या करामती
3 अखेर गुप्तहेर ‘कॉनन’ची केस क्लोज
Just Now!
X