दुसऱ्या महायुद्धाची अखेर जर्मनीने ऐन कडाक्याच्या थंडीत रशियावर केलेल्या आत्मघातकी आक्रमणामुळे आणि अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे घडून आली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या अणुबॉम्ब हल्ल्याने सगळे जग हादरले. लाखो माणसे त्यात मृत्युमुखी पडली. त्याहून कितीतरी जास्त होरपळून, जायबंदी होऊन आयुष्यातून उठली. इथल्या दोन-तीन पिढय़ा अणुस्फोटाने झालेल्या किरणोत्सर्गामुळे उद्भवणाऱ्या दुर्धर व्याधी, शारीरिक-मानसिक व्यंगे आणि विकृतींच्या शिकार झाल्या. इतका भीषण नरसंहार घडवून आणणाऱ्या अणुबॉम्बनिर्मितीचं संशोधन दुसऱ्या महायुद्ध काळातच जर्मनी व अमेरिकेत सुरू होतं. मानवी आयुष्य अधिक सुकर, संपन्न व्हावं यासाठी खरं तर वैज्ञानिक संशोधन होत असतं. पण हे संशोधन कधी कधी दुधारीही ठरतं. एकीकडे त्याने मानवी जीवन संपन्न, समृद्ध होतं, तर दुसरीकडे ते मानवी अस्तित्वाच्या मुळावरही येऊ शकतं. अणुशक्तीचा वापर जसा विधायक गोष्टींसाठी करता येतो, तसाच विध्वंसासाठीसुद्धा! आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लोनिंग तंत्रज्ञान वा यंत्रमानवात मानवी भावभावना ओतणारं संशोधन असो; त्यातून मानवी जीवन जसं सुकर होऊ शकतं, तसंच त्यातून हाहाकार माजवणाऱ्या गोष्टीही निष्पन्न होऊ शकतात. याचं भान संशोधकांना असतं का, असा प्रश्न बऱ्याचदा केला जातो. त्यांचं त्यावरचं उत्तर : वैज्ञानिक मंडळी संशोधनाचं काम करतात. त्याचा विधायक गोष्टींसाठी उपयोग करायचा की विध्वंसक, हे वापरदारावर अवलंबून असतं. खरंय ते.

विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात अणुसाखळी आणि त्यातील वैज्ञानिक तत्त्वाचा वापर करून मानवी जीवन सुकर करण्याचं संशोधन जर्मनीत आणि पाश्चात्त्य जगात सुरू होतं. डेन्मार्कचे नोबेलविजेते शास्त्रज्ञ निल्स बोर व जर्मन शास्त्रज्ञ वर्नर हायझेनबर्ग हे गुरू-शिष्यही अणुस्फोटासंबंधीचं संशोधन करीत होते. हिटलरच्या नाझी फौजांनी आपल्या टाचेखाली चिरडलेल्या डेन्मार्कचे निल्स बोर हे नागरिक. त्यामुळे त्यांना जर्मनीबद्दल शत्रुत्वाची भावना असणं साहजिकच. शिवाय मातुल बाजूकडून ते अर्धे ज्यू असल्याने हिटलरच्या पराकोटीच्या ज्यू-द्वेषाबद्दल त्यांच्या मनात प्रक्षोभ असणं स्वाभाविकच. दुसरे महायुद्ध ऐन भरात असलेला तो काळ. निल्स बोर यांच्यावर जर्मन गुप्तहेर यंत्रणांचं बारकाईनं लक्ष होतं. जर्मन शास्त्रज्ञ हायझेनबर्ग हा एकेकाळचा निल्स बोर यांचा शिष्य, मानसपुत्र आणि संशोधनातील सहकारी. मात्र, आता तो जर्मनीच्या अणुसंशोधन कार्यक्रमाचा प्रमुख संशोधक झालेला.

दुसरं महायुद्ध जिंकायचं तर असं एखादं निर्णायक शस्त्र हाती हवं- की ज्यामुळे शत्रू सपशेल गुडघे टेकेल. असं निर्वाणीचं शस्त्र होतं- अणुबॉम्ब! त्यावरचं संशोधन जर्मनी आणि दोस्तराष्ट्रांचे संशोधक युद्धकाळात करत होते. १९४१ च्या सप्टेंबर महिन्यात जर्मन शास्त्रज्ञ हायझेनबर्ग आपले गुरू निल्स बोर यांना भेटण्यासाठी अचानक जर्मनीव्याप्त कोपनहेगन येथे गेला होता. त्यांच्या त्या भेटीत नेमकं काय घडलं याबद्दलचं गूढ आजही कायम आहे. कारण अणुसंशोधनावर काम करणाऱ्या शत्रूराष्ट्रांतील शास्त्रज्ञांची ती महत्त्वपूर्ण भेट होती. उभयतांनी या भेटीसंबंधातील संदिग्धता गडद होईल अशी वक्तव्यं नंतर केल्याने हे रहस्य अधिकच गूढ बनलं.

हायझेनबर्ग हा निल्स बोर यांच्याकडे अणुसंशोधन प्रकल्पात त्यांनी जर्मनीला सहकार्य करावं अशा तऱ्हेचा प्रस्ताव घेऊन गेला होता का? की त्यांनी दोस्तराष्ट्रांना अणुबॉम्बनिर्मितीत साहाय्य करू नये अशी विनंती करायला तो गेला होता? की जर्मन अणुप्रकल्पातील अडचणींसंबंधी चर्चा करण्यासाठी तो बोर यांना भेटला? निल्स बोर यांनी त्याला काय सल्ला दिला किंवा नेमकं काय उत्तर दिलं? त्यांनी याकामी जर्मनीला साहाय्य करण्याचा त्याचा प्रस्ताव नाकारला का? तसं असेल तर त्यांच्यावर नाझी गुप्तहेरांनी लगेचच कारवाई केली नसती का? हायझेनबर्गवरही नाझी गुप्तहेरांची नजर असणार. त्यानं बोर हे त्याचे गुरू असल्यानं त्यांचं रक्षण करण्यासाठी जर्मनीविरोधी कृत्य केलं असतं तर तोही अडचणीत आला असता. मग यापैकी नेमकं काय घडलं उभयतांच्या भेटीत?

निल्स बोर यांची पत्नी मार्गारेथ बोर हीसुद्धा या भेटीच्या वेळी उपस्थित होती. तिला हायझेनबर्ग आणि निल्स बोर यांचे आत्मीय संबंध ठाऊक होते. त्यांच्या एकत्रित संशोधनाची तीही साक्षीदार होती. तशीच त्यानंतरच्या उभयतांमधील दुराव्याचीही! त्यामुळे या दोघांतील चर्चेत तिने काही भूमिका निभावली का? याबद्दलही संशयाचं धुकं अद्याप कायम आहे.

म्हणूनच ‘कोपनहेगन भेट’ आजही एक रहस्य बनून राहिली आहे. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरीही! ब्रिटिश नाटककार मायकल फ्राइन यांनी या भेटीवर ‘कोपनहेगन’ नावाचं नाटक लिहिलं. १९९८ साली लंडनमध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला. कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ नाटय़संस्थेनं त्याचा मराठी प्रयोग मंचित केला आहे. तो पाहण्याची संधी नुकतीच मिळाली. डॉ. शरद नावरे अनुवादित आणि डॉ. शरद भुथाडिया दिग्दर्शित ‘कोपनहेगन’चा हा प्रयोग म्हणजे एक बौद्धिक मेजवानी आहे. वैज्ञानिक संज्ञा-संशोधनावरचं हे नाटक क्लिष्ट व कंटाळवाणं होण्याची शक्यता असताना प्रत्यक्षात मात्र ते खिळवून ठेवतं, हे नाटककर्त्यांचं यश आहे. क्वान्टम फिजिक्स, त्याची सैद्धान्तिक, गणिती मांडणी, त्याचे व्यावहारिक उपयोग, त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या अणुबॉम्बची प्रचंड संहारक शक्ती आणि त्याचे दुष्परिणाम, दुसऱ्या महायुद्धात या विघातक शस्त्राचा वापर झाल्यास त्यातून मानवी अस्तित्वाचीच होणारी राखरांगोळी या सगळ्याची चर्चा या नाटकात होते.

नाटक सुरू होतं ते या घटनेशी संबंधित व्यक्ती स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या परलोकात झालेल्या भेटीने! निल्स बोर आणि हायझेनबर्ग यांच्या कोपनहेगन भेटीत नेमकं काय घडलं, कुणाची भूमिका नेमकी काय होती, त्यातून काय निष्पन्न झालं, हे त्यांना आता तटस्थपणे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांना भूतकाळात जाणं भाग आहे. त्याप्रमाणे ते मागे जातात. कोपनहेगन भेटीचा ट्रेलर पुन्हा एकदा सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पाहतात. त्यावेळी हायझेनबर्गचा निल्स बोर यांना भेटण्यामागे काय उद्देश होता, शत्रूराष्ट्रांचे नागरिक या नात्याने एकमेकांबद्दल त्यांचे कोणते समज (आणि गैरसमज!) होते, त्यामुळे या भेटीत काय घडलं, वा काय घडू शकलं नाही, याचं सिंहावलोकन ते करू जातात. पहिल्या अंकात या दोघांच्या १९४१ च्या भेटीत काय घडलं असावं हे दाखवलेलं आहे. तर दुसऱ्या अंकात त्या भेटीतील दुर्लक्षित कंगोऱ्यांवर प्रकाश टाकून त्यांचं स्पष्टीकरण परस्परांकडून मागत या भेटीवर नव्याने दृष्टिक्षेप टाकला गेला आहे. ज्यातून एक वेगळंच वास्तव समोर येतं. एखादा सिद्धान्त आणि त्याची वैज्ञानिक उकल या पद्धतीनं नाटकाची रचना केलेली आहे. त्यामुळे कसलेल्या वकिलांच्या वाद-प्रतिवादयुक्त चकमकी उभयतांमध्ये झडतात. मार्गारेथही या भेटीचा हिस्सा असल्यानं तिचंही काहीएक म्हणणं असतं. त्यानं या चकमकीत भरच पडते. हे वाग्युद्ध उत्तरोत्तर रंगत जातं. आणि एकाएकी आभाळात दाटून आलेले ढग हळूहळू दूर होऊन ते लख्ख प्रकाशमान व्हावं तसं अखेरीस घडतं.

डॉ. शरद नावरे यांनी केलेला अनुवाद उत्तम, ओघवता असला तरी क्वचित कुठं कुठं एखाद्या शब्दातून ते ‘भाषांतर’ आहे हे जाणवतं. दिग्दर्शक डॉ. शरद भुथाडिया यांनी प्रयोग अत्यंत बंदिस्तपणे बांधला आहे. संवादांतील आरोह-अवरोह आणि विरामांतून बोर-हायझेनबर्ग भेटीतील गूढ अलवारपणे उकलत जातं. अनेक वैज्ञानिक संज्ञा-संकल्पनांचे उल्लेख नाटकात येतात. त्या सोप्या करून मांडल्याने दाताखाली खडा येत नाही, वा ते क्लिष्ट, न आकळणारेही झालेले नाही. पात्रांच्या हालचाली मर्यादित ठेवून त्यांच्या बोलण्याकडे, त्यातून व्यक्त होणाऱ्या मत-मतांतराकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं राहील याची दक्षता दिग्दर्शकानं घेतली आहे. मोजक्या प्रॉपर्टीतून स्थल-कालाचे संदर्भ यथार्थपणे सूचित केले आहेत.

युरोपातील कुंद, ढगाळ, विमनस्क करणारं वातावरण नेपथ्य (अभय मणचेकर-समीर पंडितराव) आणि प्रकाशयोजनेतून (साहिल कल्लोली-समीर पंडितराव) निर्माण केलं गेलं आहे. पात्रांच्या मन:स्थितीचं निदर्शक काळपट राखाडी रंगांचा वापर वेशभूषेसह (अभय मणचेकर-स्वरूपा फडके) सर्वच गोष्टींत हेतुत: करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रयोगालाच आर्त, उदासवाणेपणाची किनार आहे. पाश्र्वसंगीतातून (नरहर कुलकर्णी- रोहित पोतनीस- ऋषिकेश जोशी) ती खोलवर जाणवत राहते.

शास्त्रज्ञ निल्स बोर यांची तगमग, तडफड व घुसमट, हायझेनबर्गबद्दल मधेच उफाळून येणारा स्नेहभाव, आपुलकी, त्याला समजून घेणं, बोर यांचं साधेपण डॉ. शरद भुथाडिया यांनी अंतरात्म्याच्या सच्चेपणातून व्यक्त केलं आहे. त्यांचं वैज्ञानिक पारदर्शीपणही हृदयास स्पर्शून जातं. द्विधा, दुभंग मन:स्थितीत सतत वावरणारा हायझेनबर्ग- सागर तळाशीकर यांनी अवघ्या देहबोलीतून साकारला आहे. आपण जर्मनीचे प्रतिनिधी आहोत याचं सतत भान बाळगत बोर यांच्याशी होणारा त्यांचा संवाद, त्यातले निरुत्तर करणारे क्षण, आपल्याला समजून घेण्यात बोर पती-पत्नीकडून गफलत होतेय हे कळत असूनही काही करता न येण्यातली हताशा.. या साऱ्या भावभावनांचे आंदोळ त्यांनी समूर्त केले आहेत. मार्गारेथ झालेल्या मेघना भागवत आपल्या उपजत व्यक्तिमत्त्वानंही या भूमिकेत फिट्ट बसल्या आहेत. नवऱ्याच्या साधे-सरळपणामुळे मार्गारेथला त्यांच्याबद्दल वाटणारी काळजी, त्यातून हायझेनबर्गसंबंधी कडवट झालेलं तिचं मन, गुरू-शिष्यातील मनोज्ञ नात्याचं दर्शन घडल्यावर तिला वाटणारी खुशी त्यांनी संयत, पण उत्कटपणे व्यक्त केली आहे.

आगळ्या धाटणीचं हे नाटक दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहील यात काहीच संशय नाही.