मस्त टाइमपास!

जगातल्या यच्चयावत नवऱ्यांना सुखी व्हायचं असेल तर आपल्या बायकोला ‘तू म्हणशील तसं!’ असं म्हणण्यावाचून प्रत्यवाय नाही असं पुलंनीच सांगून ठेवलंय. मग ती बायको साधी असो, व्यवहारी असो, भांडकुदळ, समंजस- कशीही असो; संसारात आपल्या डोक्याला कटकट नको असेल तर ‘ती जे म्हणेल ती(च!) पूर्व दिशा’ यावर समस्त नवरे मंडळींचं एकमत असतं. जे या मताशी सहमत होत नाहीत, त्यांचे हाल तेच जाणोत. असो. त्यात नवरा-बायको दोघंही नोकरी करणारे असतील आणि घरातलीच ‘बॉस’ ऑफिसातही ‘बॉस’च असेल तर मग काय विचारूच नका. त्या बापडय़ा नवऱ्याचं जे काय होत असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी! संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘तू म्हणशील तसं..’ हे नाटक दोन्हीकडे बायकोच ‘बॉस’ असणाऱ्या नवऱ्यांची सहानुभूतीनं दखल घेत प्रेक्षकांची मस्त करमणूक करतं. लेखक व दिग्दर्शक (या भूमिकांत बहुधा) पहिलटकर असले तरी नाटक पाहताना ते जाणवत नाही.

Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
vidya balan express adda
Video: विद्या बालन व प्रतीक गांधी यांची ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निमित्तानं खास मुलाखत, पाहा LIVE
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
this reason Vijay Chawan wife vibhavari chawan exit the acting field
…म्हणून विजय चव्हाणांच्या पत्नीने सोडलं अभिनय क्षेत्र, विभावरी चव्हाण म्हणाल्या….

अदिती आणि गौरव. दोन भिन्न स्वभावांचं जोडपं. लग्नाला दोन वर्ष झालेली. अदिती घरात टिपिकल पत्नी. गौरव मात्र अघळपघळ, हॅपी गो लकी कॅटेगरीतला. सर्रास नवऱ्यांप्रमाणे आळशी, घरकामाचं वावडं असलेला. वागता-बोलताना ‘पोलिटिकली करेक्ट’ कसं असावं याची तमा न बाळगता मनात येईल ते स्पष्ट बोलून टाकणारा. अशा वेळी स्थळ-काळाचं भान सुटणारा. आपल्या या वर्तनाने समोरच्यावर काय ‘इम्प्रेशन’ पडेल याच्याशी देणंघेणं नसलेला. त्याने वयानुरूप थोडी तरी मॅच्युरिटी दाखवावी यासाठी अदिती सतत त्याच्या कानीकपाळी ओरडत असते. पण त्याच्यावर काही परिणाम होईल तर शपथ! त्याचं हे निरागस ‘मूल’पण अदितीला आवडतंही. पण त्याच्या या मनात येईल तसं वागण्यामुळे लोक त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतात याची चिंता तिला भेडसावते. तशात तिच्याच बॅंकेत त्याचं असिस्टंट मॅनेजर म्हणून प्रमोशन होतं. अदिती तिथे मॅनेजर असते.. म्हणजे गौरवची बॉस! आता तरी त्याने नीट वागावं अशी तिची अपेक्षा. त्याने ऑफिसमध्ये आणि घरात दोन वेगवेगळ्या भूमिकांत वावरावं, त्यांत गल्लत करू नये असं ती त्याला समजावते. पण गौरव काही ते मनावर घेत नाही.

..आणि मग त्यातून व्हायचं तेच होतं. ते काय, हे नाटकात प्रत्यक्ष पाहणंच योग्य.

लेखक संकर्षण कऱ्हाडे यांनी घरी-दारी (पक्षी : ऑफिसमध्ये!) एकच बॉस असण्यातून जे त्रांगडं निर्माण होतं, त्यातलं भन्नाट नाटय़ अचूक हेरलं आहे. या सिच्युएशनकडे लेखकाला गमतीदार पद्धतीनं बघायचं असल्याने नाटकाची अतिशयोक्त अन् अर्कचित्रात्मक मांडणी अनिवार्यच. त्यातून सिच्युएशनल कॉमेडीचा धम्माल तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. यात विविध रंगढंगांची पात्रं आहेत. अदितीचा बॉस बायकी पद्धतीनं बोलणारा. तर बॅंकेत नवी रुजू झालेली लिपिक अबोली ही धांदरट, फारसा पाचपोच नसलेली. भरीस भर आगाऊ, स्मार्ट शिपाई. त्यात गौरवसारखा मनमौजी अन् कडक शिस्तीची अदिती. सगळाच विचित्रांचा मामला! या सर्वाचं डेडली कॉम्बिनेशन म्हणजेच ‘तू म्हणशील तसं..’! पात्रांचे स्वभावविभाव, त्यांतून घडणाऱ्या प्रासंगिक गफलती, गंभीर प्रसंगांची उडवलेली खिल्ली.. अन्त्यातून निर्माण होणारे नाटय़मय पेच.. असं सगळं विलक्षण रसायन तयार करताना लेखकानं हास्यविनोदांसाठी स्मार्ट क्लृप्त्याही योजलेल्या. नाटक पाहणाऱ्यांच्या त्या लक्षातही येतात. तरीही प्रेक्षक त्या एन्जॉय करतो. टिपिकल असलेली बायको आणि टिपिकल नसलेला नवरा यांच्या वागण्या-बोलण्यातून जे थ्रिल निर्माण होतं तो बघायला कुणालाही आवडतंच. नाटकात काही पात्रं व प्रसंग घिसेपिटेही आहेत. मान्य! पण ते सादरीकरणाची लेखकाची रीत न्यारी असल्याने त्यातून हशे उद्भवतात. कथाबीज व त्याच्या हाताळणीतलं वेगळेपण ही या नाटकाची खासियत होय.

दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी नाटकाचा नूर बरकरार राहील अशा तऱ्हेनं ते पेश केलं आहे. पात्रांचे स्व-भाव, लकबी, व्यक्त होणं यांतून अभावितपणे घडणारा विनोद त्यांनी नाटकात खेळवला आहे. गाण्यातून संवाद साधणारा स्मार्ट शिपाई व सूत्रधार, धांदरट अबोली, ‘हॅपी गो लकी’ गौरव, फोनवरून बायकी आवाजात बोलणारा अदितीचा बॉस या पात्रांच्या वैचित्र्यातूनच नाटकाचं र्अध यश निश्चित झालं आहे. अदिती आणि गौरव यांच्यातील भांडणांतील लॉजिकल उत्स्फूर्तता दिग्दर्शकाने घटना-प्रसंगांच्या फार्सिकल हाताळणीतून ठळक केली आहे.

गौरवच्या भूमिकेत खुद्द लेखक संकर्षण कऱ्हाडे हेच असल्याने संहितेतल्या खाचाखोचा प्रयोगात उतरवण्यात त्यांना कसलीच अडचण आलेली नाही. ‘नाथाघरची उलटी खूण’ तऱ्हेच्या विनोदाची जातकुळी त्यांनी अचूक पकडलीय. ऑफिस व घर यांची गल्लत न करण्याच्या अदितीच्या गंभीर सल्ल्याचा डाव तिच्यावरच उलटविण्यासाठी गौरवने केलेला खुमासदार वापर भन्नाटच म्हणायला हवा. बुमरॅंगचा असा अनुभव विरळाच! भक्ती देसाई यांनी अदितीची पत्नी आणि गौरवची बॅंकेतील बॉस ही दोन भिन्न रूपं लीलया पेलली आहेत. सुशील पत्नी व खमकी बॉस या विरोधाभासी छटा त्यांनी ताकदीनं दाखवल्यात. अबोली झालेल्या प्रिया करमरकर यांनी तिचा धांदरटपणा, अ‍ॅब्सेन्स माइंडनेस छान पकडलाय. अमोल कुलकर्णी आगाऊ शिपाई आणि सूत्रधाराच्या भूमिकेत लोभसपणे वावरले आहेत.

प्रदीप मुळ्ये यांचं घर आणि ऑफिसचं लवचीक नेपथ्य नाटकाची मागणी चोख पुरवतं. संकर्षण कऱ्हाडेंच्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताने आणि मयूर वैद्य यांच्या नृत्यांनी न्याय दिला आहे. किशोर इंगळेंची प्रकाशयोजना, श्वेता बापट यांची वेशभूषा आणि भरत वर्दम यांची रंगभूषा नाटकाच्या तांत्रिक बाजू चोख सांभाळतात.

चार घटका मस्त टाइमपास = ‘तू म्हणशील तसं’!