News Flash

शैलीच्या धुक्यात हरवलेलं ‘सुसाट’

ठेविले अनंते तैसेचि राहावे..

| September 6, 2015 02:05 am

‘माणसानं कशाचाही ध्यास घेऊ नये. जे आणि जसं आयुष्य समोर येईल ते तसं स्वीकारावं. त्याबद्दल कसली कुरकूर करू नये. आणि खरं तर आपल्याला असंच आयुष्य जगायचं होतं असं म्हणावं. म्हणजे मग कसलाच त्रास होत नाही..’
‘ठेविले अनंते तैसेचि राहावे..’ छापाचं जीवनाबद्दलचं असं तत्त्वज्ञान मांडणारं नाटक आध्यात्मिकच असलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी ‘मुंबईला जातो मी..’ नावानं प्रायोगिक रंगभूमीवर येऊन गेलेलं हे नाटक आता ‘सुसाट’ या नव्या नावानिशी व्यावसायिक रंगभूमीवर अवतरलं आहे. मात्र, त्याचा बाह्य़ परिवेश काहीसा बदलला आहे, एवढंच. अजित देशमुख लिखित आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित हे नाटक मुख्य धारेतील प्रचलित नाटकांच्या पठडीतलं नक्कीच नाहीए. गेल्या वर्षी प्रियदर्शन जाधव यांनीच मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी या नाटकाचा प्रयोग बसवला होता. त्यातली अ-वास्तवता शाबूत ठेवून! आता मात्र व्यावसायिक रंगभूमीवर ते नव्याने करताना त्यांनी नाटकाच्या हाताळणीत काहीसे बदल केले आहेत. परंतु ते करताना त्यांच्या मनात वास्तव-अ-वास्तवाचा काहीतरी घोटाळा झालेला आहे. म्हणजे नाटकाच्या संहितेनुसार ते अ-वास्तव शैलीतच सादर व्हावं अशी अपेक्षा आहे. परंतु व्यावसायिक रंगभूमीच्या प्रेक्षकाला ती पचेल की नाही, या आशंकेपोटी असावं, किंवा ते रंजक करण्याच्या नादात असेल; परंतु नाटकाचं सादरीकरण ना धड वास्तववादी झालं आहे, ना अ-वास्तव! परिणामी प्रेक्षकांचाही गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. वास्तववादी चौकटीतून नाटक पाहू गेलं तर अनेक गोष्टींचे तार्किक संदर्भ लागत नाहीत. अनेक प्रश्न पडतात. त्यांची पटणारी उत्तरं मात्र नाटकात सापडत नाहीत. आणि ते अ-वास्तव आहे म्हणावं, तर यातल्या अनेक गोष्टी चक्क वास्तवदर्शी आहेत. या दोहोंची संगती कशी लावायची? परिणामी नाटक कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं, असा प्रश्न पडतो. तर ते असो.
नाटकाची संक्षिप्त गोष्ट अशी : एका दूरस्थ खेडेगावातल्या कुणा राजा नामक तरुणाच्या गेल्या काही पिढय़ांतल्या कर्त्यां पुरुषांनी आपल्या मनातली स्वप्ननगरी असलेल्या मुंबईला जायचा ध्यास कायम उरी बाळगला होता. परंतु पिढय़ांवर पिढय़ा गेल्या तरी कुणीच या ना त्या कारणामुळे आपला हा ध्यास पूर्ण करण्यात यशस्वी ठरला नव्हता. तथापि, प्रत्येकानं आवर्जून आपल्या मुलाच्या मनात मुंबईला जाण्याचं आपलं वेड जाणीवपूर्वक रुजवलं.. त्याला खतपाणी घातलं. जरी ते स्वत: हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकलं नसलं तरी प्रत्येकाने त्याकरता जीव तोडून प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना यश मिळालं नाही. राजाने मात्र पक्काच निर्धार केलेला- की लग्न झाल्याक्षणी आपण मुंबईला जायचं. जायचं म्हणजे जायचंच. आपल्या पूर्वजांचं (आणि आपलंही!) मुंबईला जाण्याचं स्वप्न पुरं करायचं. त्यामुळे लग्न झाल्या दिवशीच तो बायकोला- राणीला घेऊन मुंबईला निघतो. लग्नादिवशीच मुंबईला जाण्याच्या त्याच्या या विक्षिप्तपणाला सर्वाचा विरोध असतानाही तो घरच्यांचं काहीएक न ऐकता मुंबईला जायला बाहेर पडतो. भावनिक गुंत्यांत अडकून पडलो तर आपल्याला कधीच मुंबई गाठता येणार नाही हे त्याला पुरेपूर ठाऊक असतं. म्हणूनच तो कुणाचंही ऐकत नाही. कुणात गुंतत नाही. तडक मुंबईला निघतो.गाडीत तो बायकोला मुंबई कशी स्वच्छ, सुंदर आहे, तिथं माणसांच्या गुणांचं कसं चीज होतं, सगळी माणसं कशी सदाचारी आहेत, तिथं माणसाच्या उन्नयनाच्या कितीतरी गोष्टी आहेत.. वगैरे वगैरे रंगवून रंगवून सांगतो. तिच्याही मनात मुंबईचं सुंदर चित्र उभं करू पाहतो. बिचारी नवी नवरी असल्यानं मुकाटय़ानं त्याचं म्हणणं शक्य तितक्या गंभीरपणे ऐकते. त्याच्या स्वप्नातली ही मुंबई तिलाही भावते. पण तो काही तिचा ध्यास होत नाही. पुरोगामी राजाला सामान्यांसारखा संसार करण्यात रस नसतो. त्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात असतात- ज्या आपण दोघांनी मनसोक्त करायच्या, असं तो राणीला बजावतो. तिला आपल्या बरोबरीनं, समानतेनं वागवण्याची ग्वाही देतो. राणीला मात्र चारचौघांसारखा आपलाही उबदार संसार असावा असं वाटत असतं. राजाची याला तीव्र हरकत असते. इतरांप्रमाणेच क्षुद्र संसारात अडकून पडणं त्याला मंजूर नसतं. तो तिला तसं त्वेषानं सांगतो. ती त्याला आपल्या समान हक्कांचं काय झालं, असं त्यावर विचारते. पण याबाबतीत तो तिला स्वातंत्र्य द्यायला तयार नाही.. तर ते असो.मधेच गाडी एका अडनिडय़ा स्टेशनात थांबते. त्या स्टेशनाला नावही नसतं. दोन तास गाडी इथं थांबणार असल्याचं टीसी सांगतो. राणी ‘आपण थोडा चहा घेऊया..’ म्हणत राजाला खाली उतरायला भाग पाडते. पण स्टेशनवर एका चहाची किंमत हजार रुपये असल्याचं ऐकताच तो चहा प्यायचं रद्द करतो. चहा एवढा महाग का, असं तो कॅन्टीनवाल्या मावशींना विचारतो. याचं कारण- या स्टेशनवर सहसा कुठली गाडी थांबत नाही, त्यामुळे क्वचित एखादी गाडी थांबली तरच धंदा होत असल्यानं चहा एवढा महाग असल्याचं त्या सांगतात.एवढा महागडा चहा परवडणारा नसल्यानं ते चहा रद्द करतात. एवढय़ात राणीला स्टेशनच्या पलीकडे सुंदर हिरवळ दिसते. ती त्याला- तिथं थोडा वेळ जाऊन आपण बसूया म्हणून गळ घालते. पण तेवढय़ात गाडी निघून जाण्याची भीती राजाला वाटते. परंतु त्याचवेळी स्टेशनवर आलेले गावचे सरपंच त्यांना सांगतात की, तुम्ही बिनघोर जा. मी गाडी निघण्याची वेळ झाली की तुम्हाला सांगायला येतो. मात्र, गाडी सुटून निघून जाते आणि दोघं तिथंच अडकून पडतात. त्यामुळे राजा भयंकर संतापतो. सरपंच त्यांना पुढची गाडी दहा मिनिटांतच येईल असं सांगतात. टीसीही त्यांना दुजोरा देतो. ती गाडी त्या स्टेशनात थांबतच नाही. राजा जाम पिसाटतो. टीसीच्या अंगावर धाऊन जातो. पुढची गाडी आता एकदम दुसऱ्याच दिवशी दुपारी येणार असते. नाइलाजानं त्यांना तिथं थांबण्यावाचून गत्यंतर उरत नाही…आणि मग दुसऱ्या.. तिसऱ्या.. चौथ्या.. प्रत्येक दिवशी या ना त्या कारणानं त्यांचं मुंबईला जाणं रहितच होत जातं. राजा जंग जंग पछाडतो; पण त्यांना मुंबईला जाता येत नाहीच. राजा आपलं हे स्वप्न पुरं करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. तडफडतो. तळमळतो. परंतु..लेखक अजित देशमुख यांनी हे रूपकात्मक नाटक अनेक आशयसूत्रांत बांधलं आहे. वरकरणी जरी ते एका माणसाचं स्वप्न असलं तरी त्यात अनेक व्यापक, व्यामिश्र अर्थवर्तुळं अनुस्यूत आहेत. माणसाच्या जगण्यावर.. त्याच्या जीवनावर ते काहीएक भाष्य करू इच्छितं. एखाद्या गोष्टीचा कितीही ध्यास घेतला तरी ती प्रत्येकाला साध्य होईलच असं नाही, ही नियतीशरणता जशी नाटकात आहे, तसंच समोर येईल ते आणि तसं आयुष्य स्वीकारलं तरच मनाची फरफट, तगमग शांत करता येते, हे जीवनविषयक तत्त्वज्ञानही त्यात आहे. यातली पात्रं आणि त्यांचं जगणं ही कशाची तरी प्रतीकं आहेत. मग ती विचारांची असतील, वृत्तीची असतील, वा मग जीवनाकडे पाहावयाच्या दृष्टिकोनाची असतील! अ-वास्तव चित्रणातून लेखकानं या जीवनचिंतनाकडे निर्देश केला आहे.नाटक सादर करताना दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी वास्तववादी आणि अ-वास्तव रंगशैलीची सरमिसळ केल्यानं प्रेक्षकांच्या मनात नाटकाबद्दल अनेक प्रश्न उभे राहतात. खरीखुरी ट्रेन आणि त्यातून उतरणारी खरीखुरी माणसं नाटकाची शैली वास्तववादी असल्याचं अधोरेखित करतात. पण पात्रांच्या बोलण्यातली असंगतता काही वेगळंच सुचवू पाहते. ‘शॉर्टकट’ किंवा ‘संधी’च्या रूपात कुणीएक सुंदर तरुणी राजाला भुलवून आपल्यासोबत मुंबईला घेऊन जाऊ पाहते तेव्हा पुन्हा ते अ‍ॅब्सर्डिटीचाच भाग ठरतं. मग हे नाटक नेमकं आहे तरी कसं? वास्तववादी की अ-वास्तव? यापैकी कुठल्याही तऱ्हेनं त्याकडे पाहिलं तरी बरेच प्रश्न उपस्थित होतात; ज्यांची उत्तरं नाटकातून सापडत नाहीत. हे झालं आशय आणि सादरीकरणाच्या अंगानं. परंतु पात्रांच्या अभिनयातही तोच गोंधळ जाणवतो. आणखीन एक खटकणारी गोष्ट म्हणजे कॅन्टीनवाल्या मावशींना राजा ज्या अर्वाच्य भाषेत त्यांच्या शारीर व्यंगावर बोट ठेवत (त्यांना ‘म्हैस’ म्हणणं, वगैरे.) हडतूड करतो, हातातलं काही फेकून मारतो, तेही आक्षेपार्ह आहे. या सगळ्याचा दिग्दर्शकानं पुन्हा एकदा शांतपणे विचार करायला हवा.मीरा वेलणकर यांनी नाटकाचं नेपथ्य अतिशय वास्तवदर्शी केलं आहे; जे संहितेच्या दृष्टीनं उचित नाही. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेच्या बाबतीतही तेच. नाटक वास्तववादी असतं तर या सगळ्या गोष्टी यथार्थ ठरत्या. तर ते असो.प्रियदर्शन जाधव यांनी राजाचं मुंबईचं पराकोटीचं वेड ज्या तीव्रतेनं अन् कमालीच्या असोशीनं दाखवलं आहे, ते दाद देण्याजोगं आहे. पण काही वेळा ते नको इतक्या वरच्या सुरात जातात. तीच गोष्ट टीसी झालेल्या सुशील इनामदारांची. त्यांचं पालुपदासारखं गोल गोल आणि तेच ते बोलणं कधी छद्मीपणाकडे, तर कधी हास्यास्पदतेकडे झुकतं. गौरी सुखटणकर यांनी राणीचं सरळ-साधेपण आणि नवऱ्याला त्याच्याच बोलण्यातल्या विसंगतीकडे निर्देश करून जमिनीवर आणणं- त्यातल्या सुप्त उपरोधासह नेमकेपणानं व्यक्त केलेलं आहे. पूर्णिमा अहिरे यांनी आईच्या भूमिकेत अ-वास्तववादी आणि कॅन्टीनवाल्या मावशींच्या अवतारात वास्तववादी शैलीचा वापर केला आहे.प्रिया तेंडोलकर यांनी मात्र राजाची बहीण आणि ‘शॉर्टकट’ या दोन्ही भूमिकांत अ-वास्तवतेत सातत्य राखलं आहे. सरपंच झालेले प्रभाकर मोरे नको इतक्या वरच्या पट्टीत बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात कृत्रिमता डोकावते. त्यांनी वास्तव-अवास्तवाचा खेळ बेमालूम जमवला आहे. हरीश कस्पटे यांनी मुलाचं छोटंसं काम शैली उमजून घेऊन चोख केलेलं आहे. असं असलं तरीही नाटकाची शैली नेमकी काय असायली हवी, याचा पुनर्विचार झाल्यास नाटक नक्की रुळावर येऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 2:05 am

Web Title: marathi new play susaat
Next Stories
1 लेखकालाही प्रसिद्धी आणि पैसा मिळायला हवा
2 आशा भोसलेंच्या चाहत्यांसाठी ‘पर्वणी’
3 ‘फॅण्टम’ खूश हुआ!
Just Now!
X