News Flash

‘लेट्सफ्लिक्स’ : मराठी मनोरंजनाचा नवीन फलाट

या ओटीटी माध्यमांतर्गत काही वेबमालिका तसेच चित्रपटाची निर्मिती करण्यात येईल.

टाळेबंदीच्या काळात चित्रपटगृह सुरू नसल्याने अनेक प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट तसेच वेब मालिका पाहण्यास पसंती दिली. ओटीटीला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत राहुल नार्वेकर आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे ‘लेट्सफ्लिक्स’ या नवीन मराठी ओटीटी माध्यमाची निर्मिती करत आहेत.

आतापर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’, ‘नेटफ्लिक्स’ तसेच ‘डिस्ने हॉटस्टार’ या ओटीटी माध्यमांवर दर्जेदार आशय उपलब्ध आहे. मात्र मराठी चित्रपटांसाठी हक्काचे स्वतंत्र असे ओटीटी माध्यम सध्या तरी अस्तित्वात नाही. टाळेबंदीच्या काळात मराठी चित्रपटांना ओटीटीवर पुरेसा प्रेक्षकवर्ग मिळत नाही. त्यामुळे आघाडीची ओटीटी माध्यमे चित्रपटाचे हक्क घेण्यास तयार नसल्याने अनेक मराठी चित्रपट प्रदर्शनाअभावी रखडलेले आहेत. या परिस्थितीत लेट्सफ्लिक्सच्या निर्मितीने मराठी प्रेक्षकांसाठी हक्काचे ओटीटी माध्यम उपलब्ध होईल. ‘लेटसअप’ या इन्फोटेन्मेंट आणि न्यूज अ‍ॅपच्या यशानंतर उद्योजक आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि राहुल नार्वेकर ‘लेट्सफ्लिक्स’ची निर्मिती करत आहेत. या ओटीटी माध्यमावर पाच भारतीय भाषांतील आशय उपलब्ध असणार आहे. याची सुरुवात मराठी भाषेपासून करण्यात येईल. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘अहमदनगर करंडक’ या नाटय़स्पर्धेतील एकांकिकाही दाखवण्यात येतील. तसेच तेथील नवेदित कलाकारांनाही संधी मिळेल, असे फिरोदिया यांनी सांगितले. या ओटीटी माध्यमांतर्गत काही वेबमालिका तसेच चित्रपटाची निर्मिती करण्यात येईल. तसेच काहींचे हक्क विकत घेतले जातील. ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’ या दोन चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या नरेंद्र फिरोदिया यांच्याकडे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी आहे. याबद्दल नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, ‘ओटीटी माध्यमाच्या उदयानंतर मराठी भाषेसाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे, ही माझी इच्छा होती. आता ती प्रत्यक्षात उतरत आहे. लेट्सफिल्क्स या अ‍ॅपवर तरुणाईशी संबंधित आशयाला प्राधान्य देण्यात येईल. सध्या याचे तांत्रिक साहाय्याचे काम सुरू असून पुढील वर्षी हे ओटीटी माध्यम प्रेक्षकांच्या भेटीला येईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या ओटीटी माध्यमाच्या निर्मितीमुळे मराठी चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ निर्माण होईल. पाच भारतीय भाषेत उपलब्ध असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये मराठी आशयाला प्राधान्य दिले जाईल, असे निर्माते राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2020 3:06 am

Web Title: marathi ott platform letsflix coming soon zws 70
Next Stories
1 चित्ररंजन : ‘चंचल’ भूत
2 ‘करोनाकाळात नायिका किल्ला लढवतायेत’
3 करोनाचं बिंब-प्रतिबिंब नाटकांतून उमटणार?
Just Now!
X